जेव्हा 'सामना'साठी डॉ. लागूंनी सर केल्या होत्या 600 पायऱ्या...

बुधवार, 18 डिसेंबर 2019 (18:35 IST)
- पराग फाटक
'सामना' चित्रपटाचं शूटिंग जामखेड परिसरात सुरू होतं. रखरखीत प्रचंड उकाड्याचा असा हा प्रदेश.
 
जामखेडपासून जवळ रामेश्वर नावाचं ठिकाण आहे. बीड जिल्ह्यात येतं. तिथं खोल दरीत रामाचं मंदिर आहे. 300 पायऱ्या उतरून जावं लागणार होतं. शूटिंग झाल्यावर परत 300 पायऱ्या चढून यावं लागणार होतं.
 
लागूंना याबद्दल कल्पना होती. त्यांना त्यावेळी थोडा शारीरिक त्रास होता. मात्र चित्रपटाच्या कथानकासाठी लोकेशन चपखल असल्याने त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तिकडे येण्याचा निर्णय घेतला.
 
'सामना' चित्रपटाचे निर्माते आणि कवी रामदास फुटाणे याबद्दलचा किस्सा सांगतात. "300 पायऱ्या उतरून आम्ही सगळे खाली गेलो. तो सीन चित्रित केला आणि सगळं युनिट पुन्हा 300 पायऱ्या चढून वर आलं. मोठी माणसं मोठी का असतात, याचा प्रत्यय या घटनेने दिला."
 
डॉ. लागू यांचं मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. अभिनयसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या योगदानाने आपला एक अमीट ठसा उमटवला.
 
'सामना'च्या चित्रीकरणाची प्रक्रिया आनंददायी होती, फुटाणे सांगतात, "दिवसभराच्या शूटिंगनंतर निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्यातलं संभाषण ऐकायला मिळणं, हा भाग्याचा क्षण होता. निळूभाऊ राम मनोहर लोहियांच्या विचारांनी भारलेले होते. ते समाजवादी भूमिकेतून बोलायचे. डॉ. लागू तर्कशुद्ध आणि कोणत्याही इझम-विचारधारा यांच्या पल्याडचा रॅशनल विचार मांडायचे. त्या दोघांची विचारसरणी परस्परभिन्न होती. मात्र ते एकमेकांना शांतपणे ऐकून घ्यायचे."
डॉ. लागू यांच्या अभिनयाबद्दल फुटाणे सांगतात, "शूटिंग सुरू असताना निळूभाऊ कशा पद्धतीने आवाज लावतात, त्यांच्या आवाजातले चढउतार कसे होतात, देहबोली कशी आहे, याचा डॉ. लागू निरीक्षणातून अभ्यास करायचे. समोरच्या माणसाची भूमिका काहीही असली तरी डॉ. लागू यांच्या मनात त्या माणसाविषयी द्वेष किंवा तिरस्कार नसे. सुखदु:खाच्या पल्याड असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं."
 
"डॉ.लागू अतिशय शास्त्रोक्त विचारसरणीचे होते. नव्या पिढीविषयी त्यांना ममत्व होतं. काय वाचावं आणि काय वाचू नये, यासंबंधीचे त्यांचे मापदंड चोखंदळ होते. त्यांच्याकडून ही मोठीच शिकवण मिळाली.
 
"विचारांप्रमाणे त्यांची राहणी साधी असायची. भाकरी-भाजी पसंत करायचे. त्यांची सामाजिक बांधिलकी विलक्षण होती. परंतु याचा ते कधीही गाजावाजा करायचे नाही. आयुष्यभर त्यांनी सातत्याने विविध स्तरातल्या माणसांना निरलसपणे मदत केली. इतका दिग्गज माणूस परंतु संयोजकांनी संपर्क करून कार्यक्रमाला बोलावलं तर आवर्जून जायचे," ते सांगतात.
 
डॉ. लागूंचं वेगळेपण कशात होतं, याबद्दल फुटाणे म्हणाले, "'देवाला रिटायर करायला हवं' यासंदर्भात त्यांनी सांगितलेला एक किस्सा अंतर्मुख करणारा आहे. त्यांचा घराजवळ मंदिर होतं. तिकडचा पुजारी बिड्या ओढायचा. गलिच्छ राहायचा. डॉ. लागूंना ते जराही आवडत नव्हतं. त्यांनी म्हटलं, की देव बुद्धी देतो, असं सांगितलं जातं. हा मनुष्य दररोज देवाची पूजा-अर्चा करतो. देव त्याला बुद्धी देत नाही, मग तुम्हा-आम्हाला काय देणार?"
 
आढावांच्या संस्थेसाठी काढला नाटकाचा दौरा
ग्रामीण भागात सामाजिक विषयांवर पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फेलोशिप द्यायला त्यांनी सुरुवात केली. डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी अचंबित करणारी होती.
 
बाबा आढाव यांच्या संस्थेसाठी त्यांनी 'लग्नाची बेडी' नाटकाचा दौरा काढला. गावोगावी नाटकाचे प्रयोग झाले. यातून 2-3 कोटींचा निधी उभा राहिला. तो त्यांनी आढाव यांच्या संस्थेला दिला, असं ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी सांगितलं.
 
"आणीबाणीच्या काळात डॉ. लागू अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. आणीबाणीला त्यांनी कडाडून विरोध केला. याविरोधात निषेध म्हणून त्यांनी 'एक होती राणी' नाटक बसवलं. त्या काळात पत्रकं वाटणारे, निर्भीडपणे म्हणणं मांडणारे डॉ. लागू आम्ही पाहिले," अशी आठवण आळेकरांनी सांगितली.
 
डॉ. लागूंच्या सामाजिक बांधिलकीविषयी आळेकर सांगतात, "त्यांचं घराणं गांधीवादी विचारांचं होतं. त्यांचे वडील डॉक्टर होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते. महात्मा गांधी पुण्यात असले, की त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. लागूंच्या वडिलांचा समावेश असायचा. समाजाकरता काम करण्याचं बाळकडू डॉ. लागूंना घरातूनच मिळालं होते.
 
"हिंदी चित्रपटांमध्ये ते प्रामुख्याने पैसे मिळवण्यासाठी काम करायचे. या पैशाचा अतिशय काटेकोर विनियोग ते करायचे. रंगभूमीवर बॅकस्टेजचं काम करणाऱ्या मंडळींच्या औषधोपचाराचा खर्च ते उचलायचे. नवीन नाटककारांना मदत करायचे," आळेकर सांगतात.
 
तरुण पिढीसंदर्भात डॉ. लागू यांचा दृष्टिकोन कसा होता, याबद्दल बोलताना आळेकरांनी म्हटलं, "नवीन मुलांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहायचे. 1974 मध्ये आम्ही 'महानिर्वाण' नाटक करायला सुरुवात झाली. डॉ. लागू आमच्या नाटकाला तिकीट काढून यायचे. ते अनेकदा नाटकाला यायचे. अनेकांना आमच्या नाटकाबद्दल सांगायचे. काम करणाऱ्या मंडळींना पत्रं लिहून आम्हाला प्रोत्साहन द्यायचे.
 
"त्यांच्या आणि माझ्या वयात अंतर होतं. त्यांच्याशी बोलताना आदरयुक्त भीती वाटायची. परंतु अतिशय प्रेमळ होते. व्यवस्थित गप्पा मारायचो. आम्ही त्यांच्या घरी जेवायला जायचो."
 
डॉ. लागू आणि विजयाबाई मेहता यांनी विजय तेंडुलकरांची नाटकं श्रुतिकेच्या रूपात आणली. रंगभूमीसंदर्भात त्यांनी संस्था स्थापन केल्या, जोपासल्या. व्यावसायिक पातळीवर व्यग्र असतानाही त्यांनी समांतर चळवळीचं काम नेटाने सुरू ठेवलं.
 
डॉ. लागू अत्यंत वक्तशीर होते. संयोजकांनी बोलावल्यावर ते कोणतेही आढेवेढे न घेता कार्यक्रमाला जायचे. मात्र कार्यक्रमाला थोडा जरी उशीर झाला तरी त्यांची चुळबूळ सुरू व्हायची. डॉ. लागूंचा वक्तशीरपणा जाणून संयोजक त्यांना पुढची वेळ द्यायचे.
 
'त्यांना पाहिलं आणि भारावून गेलो'
ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनीही डॉ. लागूंबद्दलच्या आपल्या आठवणी सांगितल्या: "वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात आलो होतो. 'वेड्याचं घर उन्हात' हे डॉ. लागूंचं नाटक गाजत होतं. मी माझ्यापरीने नाटकाचा प्रयोग बसवला. त्यांना भेटण्याची इच्छा होती.
 
"त्यांना पाहिलं आणि अक्षरक्ष: भारावून गेलो. ते अतिशय देखणे होते. त्यांचा चेहरा लालबुंद होत असे. त्यांचा खर्जातला आवाज आकर्षून घेई. ज्ञानाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. त्यांना माझ्याबद्दल सांगण्यात आलं. हा का तो जब्बार, असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं. त्यानंतर त्यांच्याशी स्नेह जुळला तो आयुष्यभर.
 
"त्यांचं कुठलंही वागणं तर्कसुसंगत असे. त्यांना घरातूनच उच्च मूल्यांचा वारसा मिळाला होता. जे करायचं ते बावनकशी. बुद्धिनिष्ठतेच्या पातळीवर तावून सुलाखून घेतलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं," असं पटेल यांनी सांगितलं.
 
जब्बार पटेल यांनी पुढे सांगितलं, ''नव्या पिढीचं काम पाहायला त्यांना आवडायचं. नवीन नाटकं, नवीन सिनेमे याकरता ते आवर्जून उपस्थित असायचे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला येऊन विदेशी चित्रपट पाहायचे.
 
"ते डॉक्टर होते. डॉक्टर व्यक्तीच्या ठायी जो सुसंस्कृतपणा असतो, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांना संगीताचं वेड होतं. कुमार गंधर्व यांना ते तन्मयतेने फॉलो करायचे. अभिनेता म्हणून बहरत असतानाच त्यांनी सामाजिक भान जपलं. या कामाचा त्यांनी कधीही टेंभा मिरवला नाही. कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. लागू, निळूभाऊ फुले, नरेंद्र दाभोळकर यांनी शेकडो जणांना मदत केली. मुलाच्या अकाली निधनानंतर त्यांनी तन्वीर पुरस्कार सुरू केला."
 
"गिधाडे नाटकाच्या वेळी सेन्सॉर बोर्डने एका दृश्याला आक्षेप घेतला होता. त्यांनी सेन्सॉरशी लढा दिला. ते ठामपणे भूमिका घ्यायचे. कोणत्याही विषयावर त्यांचं बोलणं ऐकत राहणं हा मंतरलेला अनुभव होता," असं पटेल यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती