शरद पवार म्हणतात, 'मोदींची माझ्यावरील टीका म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचं बरं चाललंय'
शनिवार, 13 एप्रिल 2019 (17:54 IST)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येतात आणि प्रत्येक सभेत मला टार्गेट करतात, याचा अर्थ आमचं बरं चाललं आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकांना प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, " संसदेला आणि राज्यघटनेला ज्या प्रवृत्ती घातक आहेत, त्यांना पराभूत करण्याचं आव्हान आहे. काश्मीर प्रश्नावर मोदी देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. लष्कर म्हणजे मोदी सेना म्हणणं हे राजकीय फायदा उचलणं आहे."
मोदी मूळ प्रश्नांना बगल देत वेगळ्या प्रश्नांची चर्चा करत आहेत. ते प्रत्येक वाक्यात संभ्रम निर्माण करतात कारण त्यांनी बोलण्यासारखं काहीही काम केलेलं नाही. त्यामुळे मोदींना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पाच वर्षं मोदींकडे काम करण्याची संधी होती, पण त्यांनी या संधीचं सोनं केलं नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फायदा होत नाही म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका करू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पवार म्हणाले, "मोदी-शाह ही जोडी देशासाठी घातक आहे. जे चुकीचं सुरू आहे, ते राज ठाकरे समोर आणत आहेत. त्यांना सत्तेवरून हाटवणं हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम आहे."
भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांनी EVM बाबत तक्रार करणारं सह्यांचं पत्र राष्ट्रपतींना लिहिलं आहे, असं ते म्हणाले. निवडणूक आयोग भाजपला झुकते माप देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.