डॉ. बाबासासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधल्या स्मारकावर डिसेंबरच्या शेवटी निकाल
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (13:37 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील स्मारकाचा निकाल डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला लागेल, असं कॅमडन काऊन्सिलच्या माध्यम कार्यालयानं सांगितलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये ज्या चार मजली इमारतीत राहिले, त्या इमारतीचं स्मारकात रूपांतर करण्यास कॅमडन काऊन्सिल या लंडनमधील स्थानिक प्रशासनानं आक्षेप घेतला आहे.
लंडनमधील कॅमडन काऊन्सिलच्या अखत्यारितच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली ही चार मजली इमारत आहे.
रहिवाशी परिसर असल्याचं कारण देत कॅमडन काऊन्सिलनं बाबासाहेब राहिलेल्या इमारतीला स्मारकाचा दर्जा देण्यास विरोध केलाय.
1921-22 या कालावधीत लंडनमधील 10, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू 3 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब इथल्या चार मजली इमारतीत राहिले होते.
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने ही इमारत खरेदी केली आहे. त्यानंतर उच्चायुक्तांच्या माध्यमातून इमारतीचं स्मारकात रूपांतर आणि वास्तूचं नूतनीकरणाचं काम सूरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं दिली.
डॉ. आंबेडकर यांचं लंडनमधील ज्या इमारतीत काही वास्तव्य होतं, त्या इमारतीला स्मारकात रूपांतरित करण्यासाठी भारत सरकारने अर्ज केला होता.
मात्र, कॅमडन काऊन्सिलने हा अर्ज फेटाळला असून, ही इमारत रहिवाशी जागेसाठी परत करण्याची काऊन्सिलनं मागणी केलीय.
कॅमडन काऊन्सिलच्या आक्षेपांना महाराष्ट्र सरकारकडून उत्तर दिले जाणार असून, त्यासाठी सिंघानिया अँड कं. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारनं दिली होती.
तसंच, कॅमडन काऊन्सिलसमोर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं समितीही नेमली आहे. यामध्ये स्टीव्हन गॅस्टोवित्झ क्व्यू सी आणि चार्ल्स रोझ या नियोजन तज्ज्ञांचा समावेश आहे.
"महाराष्ट्र सरकार अत्यंत गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण केले जाईल आणि हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जात आहे," असा विश्वास महाराष्ट्र सरकारकडून व्यक्त केला गेला होता.
दरम्यान, 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी डॉ. आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनस्थित स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.
दरम्यान, 2015 साली उद्घाटन करताना पुढे अशा अडचणी येतील, याची खबरदारी घेतली नव्हती का? यावर बीबीसी मराठीशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, तेव्हा आम्ही स्थानिक प्रशासनाला पत्र दिलं होतं.
कॅमडन काऊन्सिलच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त करत रामदास आठवले म्हणाले होते, "1921-22 या काळात बाबासाहेब लंडनमधील त्या इमारतीत राहिले होते. तिथं बाबासाहेबांचे फोटो आहेत, पुस्तकं आहेत. तिथं स्मारक करण्याला विरोध करण्याचा स्थानिक काऊन्सिलचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि सामाजिक जाणीव नसणारा निर्णय आहे."
"स्थानिक लोकांनी तक्रार केली की पर्यटकांचा त्रास होतोय. रोज मोठ्या संख्येत जातात आणि घोषणा देतात, असं होत नाही. कधीतरी पर्यटक जातात आणि तिथं भेट देतात," असंही रामदास आठवले म्हणाले होते.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील निवासस्थानाला स्मारक करण्याच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावनेला अनुसरून, सरकारने लंडनस्थित इमारतीला स्मारक करण्यासाठी योग्य आणि ठोस व्यवस्था करावी, अशी आमची मागणी आहे."