अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण राष्ट्राध्यक्ष होऊ शकतं?

अमेरिकेच्या 2020च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकांसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे 20 उमेदवार पहिल्या डिबेटमध्ये सहभागी होणार आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी फ्लोरिडामधल्या रॅलीमध्ये आपण पुन्हा निवडणुकीला उभं राहणार असल्याची घोषणा केलेली आहे.
 
राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची या देशाची दीर्घ प्रक्रिया पुन्हा एकदा वेग पकडत असल्याचं यावरून दिसतंय. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड नेमकी होते कशी?
 
कोण उभं राहू शकतं?
अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हा किमान 35 वर्षांचा असावा, "जन्माने अमेरिकेचा नागरिक" असावा आणि अमेरिकेमध्ये त्याचं किमान 14 वर्षांचं वास्तव्य असणं गरजेचं आहे.
 
बहुतेक उमेदवारांकडे राजकीय पार्श्वभूमी असते आणि त्यांनी सिनेटर, गव्हर्नर, उपाध्यक्ष (Vice President) किंवा काँग्रेस सदस्य (Member of Congress) म्हणून काम केलेलं असतं.
 
पण काही उमेदवार वेगळ्या पार्श्वभूमीचेही होते. काहींना लष्करी पार्श्वभूमी होती, उदाहरणार्थ आर्मी जनरल ड्वाईट आयसेनहॉवर किंवा उद्योगक्षेत्रातून आलेले डॉनल्ड ट्रंप, जे पूर्वी रियल इस्टेट डेव्हलपर आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार होते.
 
बहुतेक उमेदवारांकडे विद्यापीठाची पदवी असते आणि आतापर्यंतचे अर्ध्याहून अधिक अध्यक्ष कायद्याचे पदवीधर होते.
 
अमेरिकेने आतापर्यंत कधीही ख्रिश्चनेतर व्यक्तीची किंवा महिला राष्ट्राध्यक्षाची नेमणूक केलेली नाही.
 
बराक ओबामा असे एकमेव राष्ट्राध्यक्ष होते जे कृष्णवर्णीय होते.
 
प्रचार मोहीम किती काळ चालते?
 
प्रचाराचा कालावधी किती असावा यासाठी काही देशांमध्ये कायदेशीर नियम आहेत, उदाहरणार्थ ब्रिटन आणि फ्रान्स. पण अमेरिकेत मात्र असा कोणताही नियम नाही. त्यामुळे उमेदवार त्यांना हवा तेवढा काळ प्रचार करू शकतो.
 
सध्याच्या घडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा प्रचार 18 महिने चालतो.
 
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना जानेवारी 2017मध्ये पहिल्यांदा व्हाईट हाऊसचा ताबा मिळाला होता, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या पुढच्या उमेदवारीचा अर्ज भरला. तेव्हापासून त्यांनी प्रचाराच्याच स्वरूपाच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' रॅलीज घेतलेल्या आहेत.
 
पण राष्ट्राध्यक्ष होणं किंवा अगदी त्यासाठी प्रयत्न करणं हे भयंकर खार्चिक असतं. म्हणूनच समर्थकांकडून निधी उभा करणं किंवा स्वतःचा पैसा खर्च करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
 
2016मध्ये झालेल्या हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रंप निवडणुकीसाठी एकूण 2.4 बिलियन डॉर्लसचा खर्च झाल्याचं OpenSecrets.org या प्रचारासाठीच्या खर्चावर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईटने म्हटलंय.
 
ट्रंप यांनी त्यांच्या 2020च्या कॅम्पेनसाठी 2019च्या पहिल्या तिमाहीत जवळपास 30 दशलक्ष डॉलर्सचा निधी गोळा केलेला आहे. त्यांच्या मागोमाग आहेत डेमोक्रॅट बर्नी सँडर्स. त्यांनी 20.7 मिलीयन डॉलर्स उभे केले आहेत.
 
मुख्य पक्ष कोणते?
बहुतेक मतदार फक्त दोनच पक्षांना महत्त्वाचं मानतात. डेमोक्रॅट्स (उदारमतवादी पक्ष) आणि रिपब्लिकन्स (उजव्या विचारसरणीचा पक्ष)
 
अमेरिकन टीकाकार अनेकदा रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख त्याच्या टोपणनावाने - GOP (जीओपी) - ग्रँड ओल्ड पार्टी, म्हणून करतात.
 
लिबर्टेरियन पार्टीचा कधी कधी तिसरा उमेदवार असतो. तर ग्रीन पार्टी आणि इंडिपेंडट पार्टी क्वचितच स्वतःचा चौथा उमेदवार उभा करतात.
 
2020च्या स्पर्धेत कोणकोण आहे?
पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून 20पेक्षा जास्त डेमोक्रॅट्स स्पर्धेत आहेत.
 
या प्राथमिक निवडणुकीला फेब्रुवारीत सुरुवात झाली. ही निवडणूक प्रत्येक राज्यात होते आणि त्यातून उमेदवारांची निवड होते.
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्या या निवडणुकीत सध्या आघाडीवर आहेत, जो बायडेन (माजी उपाध्यक्ष), एलिझाबेथ वॉरेन (मॅसेच्युसेट्सच्या सिनेटर) आणि बर्नी सँडर्स (व्हरमाँटचे सिनेटर).
 
या आठवड्यात मायामीमध्ये दोन रात्री या 20 जणांमध्ये 'डिबेट' होईल.
 
जोपर्यंत रिपब्लिकन पक्ष पुढच्या वर्षी घोषणा करत नाही, तोपर्यंत ट्रंप त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरणार नाहीत.
 
त्यांना पक्षातून किमान एकाचं आव्हान नक्की असेल - मॅसेच्युसेट्सचे माजी गव्हर्नर बिल वेल्ड. पण पक्षामध्ये लोकप्रिय असणाऱ्या ट्रंप यांच्यासमोर ते तग धरण्याची शक्यता कमी आहे.
 
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय कसा होतो?
पक्षांनी निवडलेले डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन उमेदवार नोव्हेंबर 2020ला सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होतील.
 
"पॉप्युलर व्होट" (Popular Vote) म्हणजे प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांचा आकडा. यावरून विजयी कोण हे ठरणार नाही.
 
ते ठरेल "इलेक्टोरल व्होट" (Electoral Vote) वरून. एकूण 538 मतांपैकी ज्याला 270 किंवा अधिक मतं मिळतील तो व्हाईट हाऊस जिंकेल.
 
यामुळेच उमेदवारांसाठी काही राज्यं अतिशय महत्त्वाची ठरतात. कारण पॉप्युलर व्होट मिळवणं शक्यं झालं तरी इलेक्टोरल व्होटमध्ये हरण्याची शक्यता असते. 2000 साली डेमोक्रॅट अल् गोअर आणि 2016मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याबाबत हेच झालं होतं.
 
प्रत्येक राज्यासाठी ठराविक "इलेक्टोर्स" (Electors) असतात. काँग्रेसमध्ये या राज्याचं किती प्रतिनिधीत्व आहे त्यावर हे ठरतं.
 
कॅलिफोर्निया (55), टेक्सास (38), न्यू यॉर्क (29), फ्लोरिडा (29), इल्यनॉय (20) आणि पेन्सलवेनिया (20) ही सहा राज्यं सगळ्यांत मोठी आहेत.
 
कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि इल्यनॉय ही राज्य पूर्णपणे डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात आहेत. आणि टेक्सास हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे.
 
राष्ट्राध्यक्षपदासाठीची चुरस मुख्यतः ओहायो आणि फ्लोरिडासारख्या "स्विंग स्टेट्स" (Swing States) मध्ये होते. ही राज्यं (स्विंग स्टेट्स) अशी आहेत ज्यांचा कल उमेदवारानुसार बदलू शकतो. ऍरिझोना, पेनसिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन ही राज्यंही 2020मध्ये स्विंग स्टेट्स ठरू शकतात.
 
ज्या राज्यांमध्ये आपल्याला जिंकणं शक्य नाही अशा राज्यांमध्ये अनेकदा उमेदवारांना प्रचारासाठी पाठवण्यात येत नाही किंवा तिथे फारसा खर्च करण्यात येत नाही.
 
रिपब्लिकन पक्षांचा बालेकिल्ला असणाऱ्या आयडाहो, अलास्का आणि दक्षिणेतल्या अनेक राज्यांना "रेड स्टेट्स" (Red States) म्हटलं जातं. तर डेमोक्रॅट्सचं वर्चस्व असणारा न्यू इंग्लंडच्या भागाला "ब्लू स्टेट्स" (Blue States) म्हणतात.
 
प्रत्येक राज्य तिथली मतमोजणी करतं आणि साधारणपणे मतदान घेण्यात आल्याच्या दिवशीच रात्रीपर्यंत विजेता ठरतो.
 
ट्रांझिशन पीरियड (हस्तांतरणासाठीचा काळ) संपल्यानंतर जानेवारीमध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष (President) सूत्रं हाती घेतो. या कार्यक्रमाला "इनॉग्रेशन" (Inauguration) म्हणतात.
 
काँग्रेसमध्ये समारंभ झाल्यानंतर एक व्हाईट हाऊसपर्यंत परेड काढण्यात येते आणि राष्ट्राध्यक्ष त्याचा चार वर्षांचा कार्यकाळ सुरू करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती