'प्रणय रॉय यांच्यावरील कारवाई म्हणजे मीडियाला दिलेला इशारा'

शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (13:12 IST)
राधिका आणि प्रणय रॉय यांना परदेशात जाण्यापासून रोखणं, हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. हा प्रकार म्हणजे मीडियाला दिलेला इशारा आहे, असं NDTVनं एका निवेदनात म्हटलं आहे.
 
राधिका आणि प्रणय रॉय या दोघांना एका खोट्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलं, असं NDTVनं वेबसाइटवरील निवेदनात म्हटलं आहे.
 
सीबीआयनं 2 वर्षांपूर्वी हे प्रकरण दाखल केलं होतं, त्याला रॉय दाम्पत्यानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.
 
2 वर्षांपूर्वी सीबीआयनं दिल्ली आणि डेहराडूनमध्ये NDTVचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या निवासस्थानांवर छापेही टाकले होते.
 
एका बँकेला कथितरित्या नुकसान पोहोचवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असं तेव्हा सांगण्यात आलं होतं.
 
कारवाईची माहिती दिली नाही
अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत रॉय दाम्पत्यापैकी कुणाला काहीच माहिती दिली नव्हती, असं NDTVनं म्हटलं आहे.
 
सरकारच्या मागे सरपटत जा, अथवा परिणाम भोगायला तयार राहा, असा माध्यमांना दिलेला हा इशारा आहे, असं NDTVनं म्हटलंय.
 
राधिका आणि प्रणय रॉय एका आठवड्यासाठी परदेशात चालले होते. 15 ऑगस्टला ते पुन्हा भारतात येणार होते. यापूर्वीही हे दोघं परदेशात गेले आहेत, असा दावा NDTVनं केलाय.
 
त्यामुळे त्यांचं परदेशात जाणं धोकादायक ठरू शकतं, असं म्हणणं हास्यास्पद आहे, असं NDTVचं म्हटलं आहे.
 
यावर सरकारकडून अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाहीये. पण, #SupportNDTV हा हॅशटॅग ट्वीटरवर टॉप ट्रेंड आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वकील करुणा नंदी यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे, "भारतातील काहीच माध्यम समूह स्वतंत्र आहेत. पण, अशा समूहाला ते तोडायचा प्रयत्न करत आहे. पण, तुम्ही स्वतंत्र असाल आणि देशात काय सुरू आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर एनडीटीव्हीला पाठिंबा द्या."
 
"NDTVला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आज देशातील आवाज नसणाऱ्यांचं हे चॅनेल आवाज आहे, " असं अमिय पात्रा यांनी लिहिलंय.
प्रदीप चौधरी यांनी लिहिलंय, "रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या रवीश कुमार यांच्यासाठी NDTVला पाठिंबा द्या. "
तर ऋषभ शर्मा यांनी म्हटलंय, "मला एक कारण सांगा ज्यामुळं मी NDTVला पाठिंबा देऊ शकेन. पत्रकारितेच्या नावाखाली त्यांनी काळा पैसा जमवला आहे. तुमचा भारतविरोधी अजेंडा समोर आला आहे. मी तुम्हाला पाठिंबा देऊ शकत नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती