"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः शेतकरी असूनही त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. 10 वर्षे कृषिमंत्रीपदी असताना महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहिल्या", अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मावळच्या शेतकऱ्यांनी आपल्या अधिकारांसाठी मागणी केल्यानंतर त्यांच्यानंतर गोळ्या झाडण्याचे आदेश पवार कुटुंबानं दिले होते अशीही टीका पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान किसान निधी योजनेद्वारे आपल्या सरकारने महाराष्ट्रातील सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत देण्यात आली. गेल्या 70 वर्षांमध्ये काही पक्षांनी गरिबांना नेहमीच गरीब ठेवलं तसेच फक्त स्वतःची तिजोरी भरली. कर्जमाफी, पाण्याची योजना, सिंचन योजनेच्या नावाखाली काँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांन लुटले अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी विरोधकांचा समाचार घेतला.