'नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात' - राज ठाकरे

सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (10:16 IST)
अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या प्रयोगाचे सादरीकरण रविवारी (6 नोव्हेंबर) मुंबईत पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
 
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. शिंदे-फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे हे फ्री असतील असा लोकांचा समज होऊ शकतो, असे ते आपल्या खुमासदार शैलीत म्हणाले.
 
ते म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबत असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात. या कार्यक्रमाला आज मी येणारच नव्हतो. पण प्रशांत यांच्यासाठी आलो. नाहीतर उगाच लोकांना वाटायचं की हे एकावर एक फ्री मिळतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबतच असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात."
 
यावेळी राज ठाकरे यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचं कौतुल केलं. ते म्हणाले, "प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील खूप वेळ नाटकांसाठी दिला आहे. सरासरी तीन तासांचं नाटक असतं. 12 हजार 500 प्रयोग झाले म्हणजे दामले 37 हजार म्हणजे ते 1562 दिवस रंगमंचावर आहेत. एवढी वर्षं स्वत:बाबत कुतहल कायम ठेवणं ही सोपी गोष्ट नाही." एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
 
"मराठी माणूस नाटक वेडा आहे. परंतु आपल्याकडे कलाकरांचा आदर केला जात नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती