मोहिता शर्मा : केबीसीमध्ये कोट्यधीश झालेल्या IPS ऑफिसरची गोष्ट

गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (14:01 IST)
मधु पाल
हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये राहाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा कौन बनेगा करोडपती (केबीसी) च्या 12 सीझनच्या दुसऱ्या कोट्यधीश ठरल्या आहेत.
 
तीस वर्षांच्या मोहितांचं म्हणणं आहे की केबीसीत जाणं त्यांचं नाही तर त्यांच्या नवऱ्याचं स्वप्न होतं. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या नाजिया नसीम केबीसीच्या या सिझनच्या पहिल्या कोट्यधीश बनल्या होत्या.
 
मोहिता यांची पोस्टींग सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. त्या सांबामध्ये एएसपी पदावर तैनात आहेत. जम्मू-काश्मीरच्या या भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम आहे.
 
बीबीसी हिंदीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "केबीसीत येणं माझ्यासाठी खूप रोमांचकारी होतं. जसं यूपीएससीची परीक्षा देणं माझं स्पप्न होतं, आणि मला ते पूर्ण करायचं होतंच. मला ते स्वप्न साकार करायला 5 वर्षं लागले. सलग चार वर्षं अयशस्वी ठरल्यानंतर पाचव्यांदा मी यशस्वी झाले."
पण केबीसीत येणं हे त्यांच्या पतीचं स्वप्न होतं आणि गेल्या 20 वर्षांपासून ते यासाठी प्रयत्न करत आहेत, असं मोहिता सांगतात.
 
"यंदा माझे पती म्हणाले की तू तुझ्या मोबाईलवरून प्रयत्न कर. मी प्रयत्न केला आणि आमचा केबीसीचा प्रवास सुरू झाला."
 
लॉकडाऊनमध्ये नवऱ्यासोबत राहिल्या आणि केबीसीत पोहचल्या
मोहिता शर्मा आयपीएस आहेत आणि त्यांचे पती रुषल गर्ग इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी आहेत. या दोघांचं लग्न एका वर्षापूर्वी झालं होतं. "आमच्या लग्नानंतर आम्हाला दोन वेगवेगळ्या जागी नियुक्ती मिळाली होती. मी मणिपूरमध्ये होते आणि हे जम्मूमध्ये. लॉकडाऊनमध्ये आम्ही एकत्र राहात असताना केबीसीचे भाग दाखवत होते. आम्ही दोघं हा शो बघायचो आणि बरोबर उत्तर द्यायचा प्रयत्न करायचो."
 
त्या सांगतात की, "आम्ही दोघांनी प्रशासकीय परीक्षा दिलेली आहे त्यामुळे आम्हाला माहिती होतं की या शोमध्ये अशाप्रकारचे प्रश्न येतात. लॉकडाऊनमुळे आम्ही एकत्र राहू शकलो. मग मला परत मणिपूरला जाव लागलं. पण सुदैवाने लवकरच माझी बदली जम्मूला झाली. आता आम्ही दोघं एकत्र राहातो."
दोन लाईफ लाईन आणि एक कोटीचा प्रश्न
केबीसीत एक कोटीच्या प्रश्नापर्यंत स्पर्धकांच्या दोन लाईफ लाईन शिल्लक आहेत असं क्वचित पाहायला मिळतं. पण मोहितांकडे दोन लाईफ लाईन शिल्लक होत्या.
 
त्या म्हणतात की, "जेव्हा मी एक कोटीच्या प्रश्नावर होते, तेव्हा माझ्याकडे फ्लिफ द क्वेश्चन आणि एक्सपर्ट ओपिनियन अशा दोन लाईफ लाईन शिल्लक होत्या. मला वाटलं की यावेळी फ्लिफ द क्वेश्नन लाईफ लाईन वापरावी आणि सात कोटीच्या प्रश्नाला एक्पर्ट अॅडव्हाईस. पण मग अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की तुम्ही सात कोटींच्या प्रश्नाला लाईफ लाईन वापरू शकत नाही. मग मी याच प्रश्नाला एक्पर्ट अॅडव्हाईस ही लाईफलाईन वापरली कारण त्यांची उत्तर कधी चुकत नाहीत."
 
जिंकण्याचा आनंद आहेच पण या गोष्टीचं दुःख
एक कोटी रुपये जिंकण्याच्या आनंदासोबतच अमिताभ बच्चन यांच्याशी हात न मिळवता आल्याचं त्यांना दुःख आहे.
 
त्या म्हणतात, "कोरोनामुळे या शोचं वातावरण आधीपेक्षा खूप वेगळं आहे. आधी कोणताही स्पर्धक आला की बच्चन सर त्यांच्याशी हस्तांदोलन करायचे. त्यांना मिठी मारायचे. पण आता तसं काही नाही. ते यायच्या आधीच आम्हाला आमच्या सीटवर बसवलं जातं. कॅमेरा आमच्याकडे वळला की त्यांना नमस्कार करायचा. हात मिळवायचा प्रश्नच नाही. हे पाहून दुःख झालं खरं पण हे करणंही तितकंच गरजेचं आहे."
 
आईवडिलांचा पाठिंबा
मोहिता पूर्ण शो दरम्यान आत्मविश्वासाने खेळताना दिसल्या. त्यांच्या या स्वभावाबद्दल बोलताना त्या म्हणतात, "मला लवकर हार मानायला आवडत नाही. मी कायम सकारात्मक विचार करते. सगळे दरवाजे बंद झालेत असं मला वाटत नाही तोवर मी प्रयत्न करतच राहाते.
 
मी माझ्या आईवडिलांचं एकुलतं एक अपत्य आहे. आज मी जिथेही आहे फक्त त्यांच्या मेहनतीमुळे आहे. जेव्हा चारदा प्रयत्न करूनही मी यूपीएससीची परीक्षा पास करू शकले नाही तेव्हा मी आतल्या आत तुटून गेले होते. पण माझ्या आईवडिलांनी हार मानली नाही आणि मलाही मानू दिली नाही."
'नियमांच्या बाबतीत मी कडक आहे'
शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हटलं की माझ्यासोबत ज्या बसल्या आहेत त्या आयपीएस अधिकारी आहेत पण मला त्यांची भीती वाटत नाहीये.
 
जेव्हा अमिताभ यांनी मोहितांना विचारलं की त्या ड्युटीवरही इतक्याच मृदू असतात का तर त्यावर मोहितांनी उत्तर दिलं, "मी नियमांच्या बाबतीत तडजोड करत नाही तिथे कडक असते. पण मी कधी आक्रमक खाक्या अंगिकारला नाही आणि तसं वागणारही नाही. मी कधीही कोणावर हात उचलेला नाही, कधी कोणासोबत उद्धटपणे वागले नाही. सरकारने जे कायदे बनवले आहेत मी त्या हिशोबानेच काम करते."
 
मोहिता सगळ्या महिलांना संदेश देताना म्हणतात की तुम्ही स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. "तुम्ही आयुष्यात कितीही उंचावर पोहचलात तरी पाय जमिनीवर ठेवा आणि मग शक्य तितकं उंच उडा."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती