मानसी जोशी : BBC Indian Sportswoman of the Year पुरस्कारासाठी नामांकन

सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:19 IST)
- दीप्ती बत्थिनी
एका शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान आम्ही मानसी गिरीशचंद्र जोशीला हैदराबादमधल्या तिच्या घरी भेटलो. तिच्या सोबत या फ्लॅटमध्ये आणखी दोघी जणी राहतात.
 
दुपारचं जेवण संपवून मानसी स्वतःच्या मोबाइल फोनवर चित्रपट पाहण्याच्या तयारीत होती. तिने आत्मीयतेने आमचं स्वागत केलं आणि आम्हाला सांगून तिचा कृत्रिम पाय बसवण्यासाठी आतमध्ये गेली.
 
आठवड्याभराच्या कठोर प्रशिक्षणानंतर तिची आराम करायची वेळ शनिवारी दुपारनंतर सुरू होते, असं ती म्हणाली. "दिवसाचं 7-8 तास ट्रेनिंग चालतं. दुपारनंतर थोडा वेळ मी विश्रांती घेते. संध्याकाळी पुन्हा ट्रेनिंग असतं, त्यामुळे शरीराला विश्रांती गरजेची असते. शनिवारी मी फक्त सकाळच्या वेळी ट्रेनिंगला जाते. त्यामुळे शनिवार आणि रविवार एकतर पुस्तक वाचत बसते किंवा बागकाम करते," मानसी सांगते.
 
आमच्यासाठी तिने आल्याचा चहा केला. किचनमध्ये जमिनीवर थोडं पाणी सांडलेलं होतं. "माझ्यासाठी हे धोकादायक आहे," मानसी सांगते. एका फडक्याने तिने ते पाणी पुसून टाकलं. तिच्या हातचा चहा पीत आम्ही बोलायला सुरुवात केली.
 
तीस वर्षीय मानसी गिरीशचंद्र जोशी भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. पॅरा-बॅडमिंटनच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. ऑगस्ट 2019मध्ये तिने जागतिक विजेतेपद मिळवलं. ती 2015 सालापासून पॅरा-बॅडमिन्टन खेळते आहे.
 
2011 साली झालेल्या एका अपघातात मानसीला डावा पाय गमवावा लागला. ती म्हणते, "मैदानात उतरून बॅडमिन्टन खेळल्यामुळे मला यातून सावरायला बरीच मदत झाली."
 
लोकांमध्ये मिसळून मन रमवण्याऐवजी झोपून शरीराला विश्रांती देण्याला आपलं प्राधान्य असल्याचं मानसी सांगते.
 
सहाव्या वर्षापासून मानसी बॅडमिन्टन खेळतेय. "नृत्य, बॅडमिंटन अशा अनेक उपक्रमांमध्ये मी सहभागी व्हायचे", मानसी सांगते. तिने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या मानसीने सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केलं आहे. अपघातानंतर तिने कार्यालयीन स्पर्धेतील एका सामन्यात खेळून पाहिलं. "तेव्हा माझ्या लक्षात आलं की, एका पायानेही मी खेळू शकते," मानसी सांगते.
 
लहानसहान गोष्टींमधून आपल्याला भरपूर आनंद मिळतो, असं ती म्हणते. ती बहिणीसोबत हैदराबादमधल्या गोलकोंडा किल्ल्यावर गेली होती, तेव्हाचा एक प्रसंग सांगताना मानसी म्हणाली, "मी आधीही या किल्ल्यावर गेले होते. पण एकदा मला किल्ल्याच्या माथ्यावर जायचं होतं."
 
या किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी तीनशेहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. "मी आणि बहिणीने चढायला सुरुवात केली. माझा वेग अगदी हळू होता. पण कुटुंबातल्या लोकांचं हेच वैशिष्ट्य असतं- ते बिनशर्त पाठबळ आणि प्रेम देतात. शेवटी आम्ही माथ्यावर पोचलो. मला प्रचंड आनंद झाला. तर, आधी न जमलेली एखादी गोष्ट साध्य केल्यावर मला आनंद होतो. मी आणखी काहीतरी करू शकते, अशी आशा त्यातून निर्माण होते," ती सांगते.
 
संभाषणादरम्यान मी तिच्या अपघाताचा उल्लेख केला, तेव्हा आपण त्या घटनेला मागे टाकून बरंच पुढे निघून आल्याचं ती म्हणाली. "माझ्या अपघाताविषयी तोच तोच प्रश्न माध्यमं विचारतात, त्याने मला नकोसं होतं. मी तिथून बरंच पुढे आलेय, बरंच काही साध्य केलंय. त्यामुळे मी प्रशिक्षण कसं घेते, मी कोणती तंत्रं शिकलेय, हे लोकांनी मला विचारलं तर बरं होईल. पण मला अपघाताबाबत पहिल्यांदा काय आठवतं, हाच प्रश्न लोक मला कायम विचारतात. मी जिवंत राहिले, याचं मला समाधान वाटतं. अजून काय वाटणार?" ती हसत म्हणते. "पण लोकांनी अपघाताविषयी विचारल्यावर निर्विकार चेहऱ्याने द्यायची काही उत्तरं मी तयार ठेवायला हवीत, असं माझी बहीण मला सांगत असते." चहाचे घोट घेत मानसी बोलत असते. "त्या विषयावर बोलताना अर्थातच भावूक व्हायला होतं. पण मला माझ्या खेळाविषयी आणि माझ्या आदर्शांविषयी व मी करत असलेल्या दानकार्याविषयी बोलायला जास्त आवडेल."
 
पॅरा-बॅडमिन्टन वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये मानसीने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. ऑगस्ट 2019मध्ये तिने जागतिक विजेतेपदक मिळवलं. 2015 सालापासून ती पॅरा-बॅडमिन्टन खेळते आहे.
 
इंग्लंडमध्ये 2015 साली मिश्र दुहेरी गटातून तिने पहिल्यांदा पॅरा-बॅडमिन्टन चॅम्पिअनशिप स्पर्धेत सहभाग घेतला. त्या वेळी तिला रौप्य पदक मिळालं. तेव्हापासून विविध स्पर्धांमध्ये पदक पटकावण्याचा तिचा प्रवास सुरू आहे. 2016 साली एशियन पॅरा-बॅडमिन्टन चॅम्पिअनशिपमध्ये महिला एकेरी गटात तिने कांस्य पदक मिळवलं. 2017 साली पॅरा-बॅडमिन्टन वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये तिला कांस्य पदक मिळालं. त्यानंतर 2018 साली थायलण्ड पॅरा-बॅडमिंटन इन्टरनॅशनल स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकलं, 2018 सालच्याच एशियन पॅरा गेम्समध्ये तिला कांस्य पदक मिळालं. 2019 साली स्विझर्लंडमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटन चॅंपिअनशीप स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं.
 
आता या वर्षीच्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिकसाठी मानसी जोशी तयारी करते आहे. पॅरालिम्पिकमध्ये एकेरी गट नसल्यामुळे मिश्र दुहेरी गटातील स्पर्धेसाठीचं प्रशिक्षण मानसी घेतेय.
 
जून 2018 पासून तिने हैदराबादेतील गोपिचंद अकॅडमीत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. मानसीने अनेकांना नवीन वाट दाखवली आहे, असं तिचे प्रशिक्षक व विख्यात माजी बॅडमिन्टनपटू पी. गोपीचंद अनेकदा म्हणाले आहेत.
 
अकॅडमीमध्ये मानसीचं प्रशिक्षण सत्र पाहायलाही आम्ही गेलो. प्रोस्थेटिक / कृत्रिम पाय बदलून तिला सुरुवात करावी लागते. "मी प्रोस्थेटिक बदललंय. नवीन प्रोस्थेटिकमुळे मला मैदानावर अधिक क्षमतेने हालचाल करणं शक्य झालं. दैनंदिन वापरासाठी मी एक प्रोस्थेटिक ठेवलेलं आहे. प्रशिक्षणासाठी आणि खेळण्यासाठी दुसरं आहे. प्रोस्थेटिकमुळे तिथल्या वरच्या उरलेल्या पायावरचे टाके काही वेळा दुखतात. पण कधी थांबायचं आणि कधी आणखी प्रयत्न करत राहायचा, हे मला कळतं", ती सांगते. मग मानसी वॉर्म-अप करते आणि निर्धारपूर्वक मैदानात प्रवेश करते. प्रशिक्षणाच्या वेळी ती अधिकाधिक प्रयत्न करून ती स्वतःचा खेळ अधिक उंचावू पाहते. नवीन काही सूचना असतील तर त्याबद्दल ती प्रशिक्षकांकडे विचारणा करते.
 
मैदानावरची मानसी स्वतःच्या सीमा रुंदावण्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतं. मैदानावर काही ती विश्वविजेती नाहीये. शिकण्याचा निर्धार केलेल्या इतर प्रशिक्षणार्थींप्रमाणे ती एक आहे. "प्रशिक्षण सत्रं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी नवीन तंत्रं शिकून, प्रयत्नपूर्वक ती अंमलात आणू पाहते," मानसी सांगते. कुटुंबं आणि मित्रमैत्रिणींनंतर "या अकॅडमीने माझ्या यशात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. माझ्या स्पॉन्सर्सनेही बराच पाठिंबा दिला.
 
"आम्ही प्रशिक्षण सत्रादरम्यान तिची भेट घ्यायला गेलो, तेव्हा एक लहान मुलगा तिची सही घेण्यासाठी तिथे आला. तिने त्याला नाव विचारलं, तो कितवीत शिकतोय ते विचारलं, आणि त्याने आणलेल्या कागदावर सही केली. "तरुण लोक भेटायला येतात तेव्हा चांगलं वाटतं," मानसी म्हणते.
 
कोणत्याही स्पर्धेपूर्वी केवळ शारीरिक तयारी करून भागत नाही, असं मानसी सांगते. "मला अनेक गोष्टींचं नियोजन करावं लागतं. माझ्या प्रवासाचा कालावधी किती असेल, याचा अंदाज घ्यावा लागतो. मग त्यानुसार मला प्रवासादरम्यान किती वेळ बसावं लागेल याचं गणित आखून मला ब्रेकच्या वेळा ठरवाव्या लागतात."
 
विमानतळांवर सुरक्षा छाननीवेळी कृत्रिम पाय काढायला सांगितलं जातं, त्याबद्दल मानसीने बहुतांश विमानतळांवर लेखी तक्रार दाखल केली आहे. "प्रोस्थेटिक काढून त्यांच्याकडे दिल्यावर ते त्याची तपासणी करत असतील तितका वेळ लंगडत चालणं मला प्रत्येक वेळी शक्य नसतं. बाकीचे लोक आपापले लॅपटॉप व हँडबॅग घेत असताना माझ्या प्रोस्थेटिकचं सिक्युरिटी स्कॅन होत असतं, याने कधीकधी शरमल्यासारखं होतं. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी प्रवास असेल, तर ही परिस्थिती आणखी बेकार होते. काही वेळा सुरक्षा अधिकारी मला सांगतात की, त्यांनी मला बातम्यांमध्ये बघितलंय. पण तरीही मला नेहमीचीच प्रक्रिया पार पाडावी लागते. यासंबंधी जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे, असं मला वाटतं," मानसी म्हणते.
 
हैदराबादमध्ये मानसी एकटी राहाते. दररोज अकॅडमीला जाताना ती कॅब किंवा ऑटोरिक्षाने प्रवास करते. मग मैदानापर्यंत जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. खेळ फक्त स्पर्धेसाठीच असतात, या लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे, असं ती म्हणते. "प्रत्येकानेच एखादा खेळ खेळायला हवा. ते महत्त्वाचं असतं. खेळात सहभागी झाल्यावरच आपल्याला चांगल्या पायाभूत सुविधांची मागणी करणं शक्य होईल. प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असेल, तरच सरकारं खुल्या जागांविषयी आणि मैदानांविषयी विचार करतील," मानसी म्हणते.
 
मानसी अंतर्मुख असल्यासारखी वाटते. "मी चिडत नाही. मी आचरणात आणत असलेली मूल्यं आणि माझा खेळ याची आठवण लोकांनी ठेवावी, एवढंच मला वाटतं," ती म्हणते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती