Man vs. Wild: जेव्हा बेअर ग्रिल्सला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं तेव्हा

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (11:36 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेअर ग्रिल्स यांच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतामध्ये या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. पण ग्रिल्स यांना एकदा डिस्कव्हरी चॅनेलकडूनच नारळ देण्यात आला होता.
 
हा कार्यक्रम जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. नद्या-नाल्यांमध्ये भर पाण्यातून प्रवास करणं, वाटेतच अग्नि पेटवून स्वयंपाक करणं किंवा प्राणी कच्चेच खाऊन टाकणं हे सगळं चकीत वाटत असलं तरी या कार्यक्रमाचे जगभरात प्रेक्षक आहेत.
 
आजच्या एपिसोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या जिम कॉर्बेट जंगलामध्ये बेअर ग्रिल्सबरोबर सफर केली.
 
बेअर हा कार्यक्रम 2006 पासून सादर करत आहे. जंगलामध्ये राहण्याची वेळ आली तर जिवंत राहाण्यासाठी काय काय करावं लागतं आणि कठीण परिस्थितीमधून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची हे बेअर सांगतो.
 
याआधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही सहभाग घेतला होता.
 
बेअर ग्रिल्सला डिस्कव्हरी चॅनेलमधून काढून टाकले होते
2012 मध्ये बेअर ग्रिल्स आणि डिस्कव्हरी चॅनेलचे संबंध बिघडले होते. 2006 पासून हा कार्यक्रम सादर करणाऱ्या बेअर तोपर्यंत चांगलाच लोकप्रिय झाला होता.
 
मात्र डिस्कव्हरी चॅनेल आणि बेअर यांच्यामध्ये नोकरीच्या कॉन्ट्र्क्टवरून मतभेद निर्माण झाले. तसेच त्यांच्यामध्ये एकमत होणं अशक्य वाटलं. शेवटी बेअर ग्रिल्स आणि डिस्कव्हरीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून त्याचा कार्यक्रमच रद्द करण्याचा निर्णय डिस्कव्हरी चॅनलने घेतला.
 
बेअरने माफी मागितली
2008 साली बेअर ग्रिल्सच्या कार्यक्रमासंदर्भात आणखी एक वाद निर्माण झाला. या वादामध्ये बेअर ग्रिल्सला माफी मागावी लागली होती. या कार्यक्रमामध्ये जंगलात सफर करत असताना रात्री झोपण्यासाठी तो एका मोटेलमध्ये झोपण्यासाठी गेला अशी माहिती प्रसिद्ध झाली होती. तसेच त्याच्या कार्यक्रमाच्या कन्सल्टंटनेही बेअर जंगल सोडून मोटेलमध्ये झोपण्यासाठी गेला होता असा दावा केला होता.
 
त्यावेळेस बीबीसीशी बोलताना बेअर म्हणाला होता, "जर लोकांना या कार्यक्रमामध्ये आपली दिशाभूल झाली असं वाटलं असेल तर मी त्यांची माफी मागतो." तसेच ट्वीटरवर मला आपल्या टीमचा अभिमान वाटतो आणि नवे साहस करण्यासाठी मी सज्ज आहे असं त्यानं लिहिलं होतं.
कोण आहे बेअर ग्रिल्स?
बेअर ग्रिल्सचा जन्म 7 जून 1974 साली लंडनमध्ये झाला. बेअर ग्रिल्सच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती दिली आहे.
 
बेअर ग्रिल्सचे वडील हे रॉयल नेव्हीत कमांडो म्हणून कार्यरत होते. ते राजकारणातही होते. त्यांनीच बेअरला गिर्यारोहण आणि बोटिंगसारखे साहसी खेळ शिकवले.
 
त्याच्यामध्ये साहसाची आवड रुजवण्यामध्ये या खेळांचा खूप मोठा वाटा होता. वडिलांसोबत हायकिंग आणि समुद्र किनाऱ्यावर बोटी बनवणं या बेअरच्या लहानपणाच्या सर्वांत सुंदर आठवणी आहेत.
 
तरूणपणी बेअरनं युके स्पेशल फोर्सेस रिझर्व्हच्या 21 व्या बटालियनमध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यानं तीन वर्षांचं कठोर प्रशिक्षण पार पाडलं.
 
साउथ आफ्रिकेमध्ये पॅराशूटमधून उडी मारताना बेयर ग्रिल्सला जीवघेणा अपघात झाला. मणक्यामध्ये त्याला तीन फ्रॅक्चर झाले.
 
डॉक्टरांनी सांगितलं, की यापुढे कदाचित तो धावू शकणार नाही. हा त्याच्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता.
 
पण बेअरनं यावरही मात केली आणि वर्षभरातच आपल्या पायांवर उभा राहिला. तो केवळ हिंडायला-फिरायला लागला नाही, तर त्यानं नेपाळमध्ये गिर्यारोहणही केलं. 16 मे 1998 साली त्यानं माउंट एव्हरेस्टही सर केलं.
विक्रमांची मालिका
त्याचा हा साहसी प्रवास इथेच थांबला नाही. त्यानंतर 2000 साली आपल्या मित्रासाठी त्यानं अजून एक धाडस केलं. त्यानं मोजक्याच कपड्यांत बाथटबमध्ये बसून थेम्स नदी पार केली.
 
ब्रिटीश रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्युशनसाठी बेअरनं जेट स्कीईंग टीमही तयार केली होती.
 
2005 साली बेअर ग्रिल्सनं अजून एक विक्रम केला. जमिनीपासून तब्बल 25 हजार फूट उंचीवर हॉट एअर बलूनमध्ये त्यानं डिनर केलं. 'द ड्युक्स अॅवॉर्ड'साठी निधी जमविण्याच्या उद्देशानं त्यानं हे साहस केलं.
 
2008-09 साली त्यानं अंटार्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशात पॅरामोटार चालविण्याचा प्रयोग केला. मात्र त्यावेळी त्याला बर्फाच्या वादळाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.
 
या दुखापतीमुळे बेअर ग्रिल्सला दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तो पुन्हा नवीन जोमानं परतला.
 
2010 साली थंडीनं गोठवणाऱ्या आर्क्टिक सागराच्या वायव्य भागात त्यानं उघड्या जहाजातून अडीच हजार मैलांचा प्रवास केला.
 
2011 साली त्यानं Survival Academy ची सुरुवात केली. 2013 साली त्यानं A Survival Guide for Life हे पुस्तक लिहिलं.
 
2014 साली बेअर ग्रिल्सचं Children's Survival हे पुस्तक प्रसिद्ध झालं. 2018 साली त्यानं How to Stay Alive हे पुस्तक लिहिलं.
 
Man Vs Wild
एकीकडे त्याची ही साहसांची मालिका सुरू असतानाच Man Vs Wildच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला.
 
आधी हा शो युकेमधल्या चॅनेल 4 वर पहिल्यांदा प्रदर्शित झाला. त्यानंतर 2006 साली डिस्कव्हरी चॅनेलनं Man Vs Wild हा शो लाँच केला.
 
या शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि त्याच्या क्रूला जंगल किंवा एखाद्या बेटावर सोडलं जातं. त्यांना फारशा सुविधा नसतात. तिथं त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडा करावा लागतो.
 
आतापर्यंत या शोचे सात सीझन झाले आहेत. बॉर्न सर्व्हायवर, अल्टिमेट सर्व्हायवल, सर्व्हायवल गेम, रिअल सर्व्हायवल अशी यातल्या काही सीझन्सची नावं होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती