लंडन ब्रिज हल्ला: 2 मृत्युमुखी, पोलिसांच्या गोळीने हल्लेखोर ठार
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (09:26 IST)
शुक्रवारी दुपारी लंडन ब्रिजवर झालेल्या चाकू हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांच्या गोळीने संशयित हल्लेखोरही ठार झाला.
पोलिसांनी ही घटना 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं आहे. ठार झालेला हल्लेखोर हा 28 वर्षांचा उसमान खान असल्याची माहिती लंडन पोलिसांनी दिली. तो 2012 साली केलेल्या दहशतवादी गुन्ह्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असताना परोलवर बाहेर होता, असंही मेट्रोपॉलिटन पोलीस उपायुक्त नील बसू यांनी सांगितलं.
"डिसेंबर 2018 मध्ये तो परोलवर बाहेर आला पण त्यानंतर त्याने ही कृती कशी केली, याचा आम्ही सखोल तपास करणार आहोत," बसू एका निवेदनात म्हणाले.
पोलीस सध्या त्याच्या स्टॅफर्डशायर येथील घराची झाडाझडती घेत आहेत. "या हल्ल्यात आणखी कुणी सामील होतं का, याचा आम्ही तपास करत आहोत, मात्र सध्या कुणी इतर संशयित नाही."
स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर लंडन अंडरग्राउंडचं ब्रिज स्टेशन बंद करण्यात आलं होतं.
गेल्या तीन वर्षात लंडन ब्रिजवर झालेला हा दुसरा हल्ला आहे.
नेमकं काय घडलं?
दुपारी 2ची वेळ होती. लंडनच्या फिशमाँगर्स हॉलमध्ये तुरुंगावासाची शिक्षा भोगून आलेल्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाची एक पुनर्वसन परिषद सुरू होती. साहजिकच अनेक माजी कैदी या परिषदेत होते, तसंच काही विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते.
'टाइम्स'च्या बातमीनुसार, संशयित हल्लेखोरही या परिषदेत एक इलेक्ट्रॉनिक टॅग बांधून होता, जे परोलवर बाहेर आलेल्या कैद्यांना बांधणं बंधनकारक असतं. यामुळे पोलीस त्यांच्या हालचालींवर नजर ठेवू शकतात.
मात्र काहींना त्याच्या या टॅगवर संशय आला आणि तो एकप्रकारचा बाँब असल्याची तक्रार पोलिसांना केली. त्यानंतर पाच मिनिटातच अधिकाऱ्यांनी संशयिताला विचारपूस करायला सुरुवात केली, असं पोलीस आयुक्त क्रेसिडा डिक यांनी सांगितलं. नेमकं काय झालं, याचा पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या हल्ल्यात ठार झालेल्या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
'गाडी बंद करा आणि पळा'
"एक पोलीस अधिकारी माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला 'गाडी बंद करा, गाडीतून बाहेर पडा आणि पळा'," मुस्तफा सालिह सांगत होते. ते लंडन ब्रिजच्या दिशेने जाणारी एक बस चालवत होते. त्यांना मग अचानक अनेक लोक पुलापासून दूर पळताना दिसले.
दुपारी दोनची वेळ म्हटल्यावर पर्यटक आणि आसपासच्या कार्यालयांमधले कर्मचारी रेस्टराँमध्ये गर्दी करतात, मात्र त्याच वेळी लोकांना असं पळावं लागल्याचं ते सांगतात.
"मी लोकांना तिथून पळताना पाहिलं. एक बाई रडत होती... सगळं अचानक खूप भयंकर वाटू लागलं. काही कळतच नव्हतं," ते म्हणाली.