किरीट सोमय्याः दापोलीत हातोडा कुणाचा चालणार? सोमय्यांचा की शिवसेनेचा?

शनिवार, 26 मार्च 2022 (15:26 IST)
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे असलेलं रिसॉर्ट तोडण्यासाठी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या निघाले आहेत.
 
प्रतीकात्मक असा मोठा हातोडा सोमय्या यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनांचं प्रतीक असल्याचं सोमय्या म्हणाले.
 
अनिल परब यांचं कथित अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार रोड शो करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा दिल्या. यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता.

सोमय्या यांचे कोल्हापूर, पुणे, रायगड हे सगळे दौरे वादग्रस्त ठरले होते. दापोली दौऱ्यातही भाजप-शिवसेना संघर्ष तापण्याची शक्यता आहे.
 
मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:च दापोलीतला बंगला पाडला होता.
 
आम्ही जनतेची भाषा बोलतो, जनतेची ताकद दाखवायला दापोलीला जात आहे असं सोमय्या यांनी सांगितलं.
 
दरम्यान सोमय्यांनी दापोलीत येऊन दाखवावं, आम्ही त्यांना रोखणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय कदम यांनी म्हटलं आहे.
 
हे गुजरात नाही तर कोकण आहे. आम्ही कोकणातील लोक पर्यटकांच्या साथीने त्यांना रोखणार. यांच्या राजकारणाचा मोठा फटका इथल्या पर्यटनाला बसला आहे. स्थानिकांनी कर्ज काढत, कोरोनातून सावरत घसरलेला गाडा रुळावर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला असं कदम म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती