किरण पटेल PMO अधिकारी असल्याचं सांगून केला काश्मीर दौरा, अनेकांना घातलेला गंडा

गुरूवार, 23 मार्च 2023 (09:10 IST)
Twitter
अहमदाबाद जिल्ह्यातील नाज गावातून स्थलांतर करून अहमदाबादच्या इसनपूर परिसरात वास्तव्याला असलेल्या किरण पटेल यांनी कथित रित्या भाजप नेत्यांच्या कुटुंबातील असल्याच्या दावा केला आहे.
 
2003 पासून किरण पटेल अहमदाबाद येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात सातत्याने उपस्थित राहायचे. ते स्वतः भाजप कार्यकर्ते असल्यासारखे भासवत असत.
 
शिवाय टोंगो देशाच्या कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये सल्लागार असल्याचं एक ओळखपत्रही ते नेहमी दाखवायचे.
 
आपल्याकडे पीएचडी असून दिल्लीच्या मीनाबाग परिसरात आपण राहतो, असाही त्यांचा दावा होता.
 
हेच किरण पटेल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. श्रीनगरच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे.
 
किरण पटेल यांनी स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी असल्याचं भासवून काश्मीरमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा आणि झेड प्लस सुरक्षा मिळवली होती.
 
या प्रकारामुळे देशभरात गदारोळ माजला आहे. पण किरण पटेल यांची राष्ट्रीय माध्यमांमध्ये पहिल्यांदाच चर्चा होत असली तरी यापूर्वीही त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप लावण्यात येतच होते.
 
पण पूर्वी या सगळ्या गोष्टी राज्य पातळीवरच मर्यादित होत्या.
 
माध्यमांशी बोलताना काश्मीर पोलिसांचे सहायक पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं, “पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी हॉटेलवर धाड टाकण्यात आली. तिथेच पटेल यांना अटक करण्यात आली. धाडीदरम्यान किरण पटेल यांच्याकडून 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले. किरण पटेल यांच्याविरुद्ध जम्मू काश्मीर पोलिसांनी IPC च्या कलम 419, 420, 467 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
पण, केवळ काश्मीरमध्येच नव्हेत तर गुजरातमध्येही किरण पटेल यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
अनेक जण त्यांच्या फसवणुकीला बळी पडले आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनी बीबीसी गुजरातीशी बोलताना किरण पटेल यांच्यासंदर्भात अधिक माहिती दिली.
 
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात येणं-जाणं
बीबीसी गुजरातीशी बोलताना डॉ. अतुल वैद्य यांनी सांगितलं, “किरण यांना मी पहिल्यांदा 2003 मध्ये भेटलो. ते नेहमी नेत्यांसमोर झुकायचे. ते स्वतःला भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याचं सांगायचे. कार्यालयात येऊन ते सगळ्यांची ख्याली-खुशाली विचारायचे. पण त्यांचे कुणासोबतही जवळचे असे संबंध नव्हते.”
 
ते पुढे म्हणतात, “आचार्य धर्मेंद्रजी (विश्व हिंदू परिषदेचे नेते) यांच्या निधनानंतर अहमदाबादमध्ये जगन्नाथ मंदिरात त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी किरण माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांना परदेशी विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. आता त्यांना पंतप्रधान कार्यालयात नियुक्त करण्यात आलं असून याठिकाणी उपसंचालक पदावर आपण काम करत आहोत, असं किरण यांनी मला सांगितलं होतं.”
 
डॉ. अतुल वैद्य यांच्या म्हणण्यानुसार, किरण यांनी त्यांना सांगितलं की काश्मीर आणि उत्तराखंडमधील विकास प्रकल्पांचं काम त्यांना देण्यात आलं आहे. त्यावेळी किरण पटेल यांनी डॉ. वैद्य यांना दिल्लीच्या अनेक नेत्यांसोबत काही फोटोही दाखवले होते.
 
किरण पटेल यांच्यावर CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या निगराणीत काश्मीरमध्ये अनेक रेसॉर्ट्समध्ये सुविधा मिळवल्याचा आरोप आहे.
 
या भेटींदरम्यान त्यांनी स्वतःचे अनेक फोटो आणि व्हीडिओही काढले आहेत. त्यापैकी काही फोटो-व्हीडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
 
किरण पटेल यांच्या काश्मीर दौऱ्यात त्यांना संरक्षण आणि बुलेट प्रूफ वाहनही पुरवण्यात आलं होतं.
 
काश्मीरमध्ये काय केलं?
किरण पटेल यांनी काश्मीरमध्ये केलेल्या कृत्यांबाबत एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.
 
ते म्हणाले, “अटकेच्या पूर्वीही किरण पटेल यांनी पीएमओचे अतिरिक्त संचालक असल्याचा दावा करत दोन वेळा काश्मीरचा दौरा केला होता.”
 
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, “काश्मीर दौऱ्यात किरण पटेल यांना अनेक खास सोयीसुविधा पुरवण्यात यायच्या.”
 
पटेल यांच्याविरुद्ध दाखल पोलीस तक्रारीत हासुद्धा आरोप आहे की त्यांनी पैसे आणि सुविधांचीही मागणी केली.
 
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांनुसार, किरण पटेल यांचा हा तिसरा काश्मीर दौरा होता. या दौऱ्यात त्यांना अटक करण्यात आली.
 
सरकारने आपल्याला दक्षिण काश्मीरमधील सफरचंदाच्या शेतीसाठीचे खरेदीदार शोधण्याच्या कामाची जबाबदारी दिल्याचा दावा किरण पटेल यांनी केला होता.
 
अशा प्रकारे विविध बहाणे वापरून त्यांनी मोठे शेतकरी नेते आणि अनेक आयएएस अधिकाऱ्यांवर प्रभाव पाडला होता.
 
किरण पटेल यांच्याविरुद्ध 2 मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पुढच्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली.
 
पूर्वीही लोकांना गंडवलं
अशा प्रकारे फसवणुकीचा प्रकार आपल्यासोबत घडल्याचा दावा गुजरातमधील एका भाजप कार्यकर्त्याने केला आहे.
 
पशुपालन संबंधित काम करणारे भाजप कार्यकर्ते आशिष पटेल यासंदर्भात बीबीसीशी बोलताना म्हणाले, “एका लग्नसमारंभात किरण पटेल आणि माझे भाऊ मनिष यांचा परियच झाला. आम्ही पशुपालनसंदर्भात व्यवसाय करतो. आमच्या मित्रांकडेही 30-40 गाय आहेत. त्यामुळे आम्हाला चाऱ्याची गरज पडते.”
 
“किरण यांनी पीएमओमध्ये काम करत असल्याचं आम्हाला सांगितलं. तसंच गांधीनगरच्या अनेक मंत्र्यांसोबत चांगला परिचय असल्याचंही ते म्हणाले. आम्हाला स्वस्त दराने चारा उपलब्ध करून देऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आम्हाला सुरुवातीला स्वस्त चारा उपलब्धही करून दिला. त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला.”
 
आशिष पटेल यांच्या माहितीनुसार, काही काळ हे काम सुरू होतं. त्यानंतर किरण यांनी आशिष आणि त्यांच्या मित्रांना तंबाखूसंबंधित व्यवसायात एक कोटी 75 लाख रुपये गुंतवण्यास सांगितलं. यानंतर ते गायब झाले.”
 
याविषयी आशिष पटेल सांगतात, “मी पैशांची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे लोक मला येऊन पैसे मागू लागले. त्यामुळे मी किरण पटेल यांच्याकडे पैशाची मागणी केली. पण त्यानंतर ते लाल दिव्याची गाडी घेऊन माझ्याकडे यायचे आणि मला धमकवायचे. सुरुवातीला मी शांत राहिलो. पण नंतर पोलीस तक्रार करून त्यांना तुरुंगात पाठवलं.”
 
या प्रकरणात किरण पटेल यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीची सुनावणी कोर्टात प्रलंबित आहे.
 
आशिष पटेल यांच्या नुसार, पोलीस तक्रारीनंतर किरण पटेल यांनी त्यांना 50 लाख रुपये परत दिले मात्र इतर पैसे अजूनही त्यांच्याकडे अडकलेले आहेत.
 
किरण पटेल यांच्या पत्नीचं म्हणणं काय?
किरण पटेल यांच्याविरुद्धचं काय हे एकमेव प्रकरण नाही. यापूर्वीही त्यांनी भाजप आमदारांच्या मदतीने वडोदरामध्ये गरबा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण लोकांचे पैसे घेऊन ते गायब झाले. यानंतर किरण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु, कोर्टाबाहेर या प्रकरणाचा तोडगा काढण्यात आला.
 
किरण पटेल यांचे वकील निसार व्होरा म्हणतात, “काश्मीर प्रकरणाबाबत आम्हाला विशेष माहिती नाही. पण मला जेवढं माहीत आहे, किरण पटेल यांचा एक मित्र काश्मीरमध्ये राहतो. त्यांना झेड प्लस संरक्षण मिळालेलं आहे. त्यांच्यासोबत किरण दौऱ्यावर जातात. काश्मीरमध्ये हॉटेल ललित पॅलेसच्या मालकाविरुद्धच्या वादानंतर त्यांनी तक्रारही दाखल केलेली आहे.”
 
इतर प्रकरणांबाबत बोलताना ते म्हणतात, “नरोडा स्वामीनारायण मंदिरासाठी बस भाड्याने घेतल्यासंदर्भात एक प्रकरण आहे. तसंच बायडमध्ये 13 चेक रिटर्न झाल्याचं एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.”
 
किरण पटेल यांच्या एका मित्राच्या मदतीने बीबीसीने त्यांची पत्नी डॉ. मालिनी पटेल यांच्याशी संपर्क साधला.
 
पत्नी मालिनी यांच्या मते, किरण पटेल हे देशाची सेवा करत असून त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं आहे.
 
एका माध्यमाशी बोलताना त्यांनी म्हटलं, “माझे पती एक इंजिनिअर आहेत. मी एक डॉक्टर आहे. इंजिनिअर असल्यामुळे माझी पती विकास कामांसाठी तिथे गेले होते, इतकंच. त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही. आमचे वकील हे प्रकरण पाहत आहेत. माझ्या पतीविरुद्ध काहीही चुकीचं करता येणार नाही.”
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती