कमला हॅरिस शपथथविधी: अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची सद्यस्थिती काय?
गुरूवार, 21 जानेवारी 2021 (19:55 IST)
शादाब नाजमी
बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची ज्यावेळी जो बायडन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली, तेव्हा अचानक अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांभोवतीची चर्चा वाढू लागली.
कमला यांचा जन्म जमैकन वंशाचे अमेरिकन वडील डोनाल्ड हॅरिस आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन श्यामला गोपालन या दाम्पत्याच्या पोटी झाला. श्यामला गोपालन म्हणजे कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतातील चेन्नई इथं झाला.
डोनाल्ड हॅरिस 1964 साली अमेरिकेत स्थलांतरित झाले. म्हणजे, अमेरिकेत इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट ऑफ 1965 मंजूर होण्याच्या बरोबर एक वर्षापूर्वी. या कायद्याने अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आलेल्यांना त्यांच्या मूळ राष्ट्रीयत्वापेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व दिलं. या कायद्यामुळे आशियातून अधिकाधिक कुशल कामगार अमेरिकेकडे वळू लागले.
अमेरिकेत आता भारतीय वंशाचे किती लोक राहतात?
1957 साली अमेरिकेच्या संसदेत दिलीप सिंग सौंद हे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. अमेरिकेच्या संसदेत पदार्पण करणारे सौंद हे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन ठरले.
त्यानंतर बरेच जण निवडून येते गेले. त्यामध्ये पियुष 'बॉबी' जिंदाल आणि प्रमिला जयपाल यांची नावं आपल्याला घेता येतील.
अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची संख्या केवळ 1.5 टक्के एवढीच आहे.
अमेरिकेच्या जनगणनेनुसार, 2000 साली अमेरिकेत 19 लाख भारतीय राहत होते, तीच संख्या 2015 साली जवळपास दुप्पट झाली. म्हणजे, 39 लाख 82 हजार एवढी झाली.
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गेलेल्या इतर देशांमधील लोकांची भारतीय वंशाच्या लोकांशी तुलना केली, तर भारतीय लोक हे केवळ पैशाने श्रीमंत नव्हते, तर ते चांगलं शिक्षण घेतलेले म्हणजे सुशिक्षितही होते.
प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी 40 टक्के लोक हे मास्टर्स डिग्री असलेले आहेत. तर अमेरिकेतील 15.7 टक्के गरिबांच्या तुलनेत केवळ 7.5 टक्के भारतीय लोक हे गरिबीत मोडतात.
पण इथेच खरा प्रश्न आहे. तो म्हणजे, इतकी कमी लोकसंख्या असतानाही, हे लोक अमेरिकेच्या राजकारणावर परिणाम करू शकतात? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांच्या मतांबाबत समजून घ्यावं लागेल.
भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांची रचना
अमेरिकेत राहणाऱ्या मेक्सिकन लोकांपाठोपाठ 40 लाखांहून अधिक असलेले भारतीय वंशाचे अमेरिकन लोक सर्वाधिक वाढ होणाऱ्या अनिवासींचा समूह आहे.
अमेरिकेतील जनगणनेनुसार, 2000 ते 2018 या कालावधीत एकट्याने किंवा गटाने अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या लोकांची संख्या 137.2 टक्क्यांनी वाढली.
यातले बरेचजण न्यूयॉर्क, शिकागो, सॅन जोस आणि सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या मेट्रोपोलिटन शहरांमध्ये राहतात. एकट्या न्यूयॉर्कमध्ये सहा लाखांहून अधिक भारतीय राहतात, तर शिकागो मध्ये दोन लाखांहून अधिक भारतीय राहतात.
मतदानासाठी पात्र असणाऱ्या, मात्र अमेरिकेच्या बाहेर जन्मलेल्या लोकांचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा मात्र भारतीय वंशाच्या लोकांचा क्रमांक मेक्सिकन आणि फिलिपिन्स यांच्यानंतर म्हणजे तिसरा ठरतो, असं प्यू रिसर्चचं म्हणणं आहे.
2016 च्या निवडणुकीनंतर झालेल्या नॅशनल एशियन अमेरिकन सर्व्हेनुसार, 48 टक्क्यांहून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकन हे डेमोक्रॅट्स किंवा डेमोक्रॅट्सकडे झुकणारे, तर केवळ 22 टक्के भारतीय वंशाचे अमेरिकन हे रिपब्लिकन्स होते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅट्स आणि रिबल्किन्स यांच्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना आपलसं करण्यासाठी शर्यत लागते.
याचं कारण सरळ आणि साधं आहे, ते म्हणजे, अमेरिकन अध्यक्षपदाच्या लढाईत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फ्लोरिडा, पेन्सिल्वेनिया आणि मिशिगन या राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची संख्या अधिक आहे. हे तीन राज्य निवडणुकीचा निकाल फिरवण्याची क्षमता राखून असतात.
नुकत्याच झालेल्या इंडियन अमेरिकन अॅटिट्युड सर्व्हेनुसार, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 70 टक्क्यांहून अधिक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी जो बायडन यांच्या पारड्यात आपली मतं टाकली.
H1B : ट्रंप विरुद्ध बायडन
जगभरात H1B व्हिजा बाळगणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. थोडं आकडेवारीतच बोलायचं झाल्यास, एका वर्षात काढण्यात येणाऱ्या 85 हजार H1B व्हिसांमध्ये भारतीयांची संख्या जवळपास 70 टक्के असते.
मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रंप यांनी भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रिम्स'वर गदा आणली.
मूळच्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी ट्रंप यांनी गेल्या वर्षाच्या सुरुवातीला एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली, या आदेशानुसार, परदेशी कामगारांसोबत करार किंवा उपकरार करण्यास फेडरल एजन्सीना रोखलं गेलं.
यातही विशेषत: त्यांचा H1B व्हिजा असणाऱ्यांबाबत रोख होता. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील लोकांना हा जबर धक्का होता. कारण या क्षेत्रातील मंडळीच या व्हिसामार्फत जास्त प्रमाणात अमेरिकेत जात असतात.
या सर्व गोष्टीचा सप्टेंबरमधील AAPI च्या सर्व्हेमध्ये प्रतिबिंब दिसलं. या सर्व्हेच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रंप यांना किती मान्यता आहे, हे तपासलं गेलं होतं. त्यात अमेरिकेत राहणाऱ्या 35 टक्के आशियाई भारतीयांनी डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्षपदासाठी नामंजूर केलं होतं.
आता अमेरिकेतील भारतीयांची किंवा नव्याने जाऊ पाहणाऱ्या भारतींयाची जो बायडन यांच्याकडे नजर लागून आहे. कारण गेल्यावर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनी बायडन यांनी H1B व्हिजा प्रकरणावर भाष्य केलं होतं.
बायडन म्हणाले होते की, "ज्यांनी अनेक दशकांपासून अमेरिकेला कणखर करण्यात योगदान दिलं, त्यांच्याविरोधात द्वेषपूर्ण गुन्हे, कायदेशीर स्थलांतरितांवरील संकट, H1B व्हिसाविरोधात अचानक केलेली कारवाई यांमुळे माझं हृदय पिळवटून निघतं."
इथे एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे, ओबामा यांना जवळपास 84 टक्के भारतीय वंशाच्या अमेरिक नागरिकांनी मतं दिली होती.
गेल्या अनेक दशकांपासून अल्पंख्यांक आणि स्थलांतरितांप्रती रिपब्लिकन्सपेक्षा डेमोक्रॅट्स अधिक दयाळू असल्याचंच दिसू आलं आहे. आता कमला हॅरिस या उपाध्यक्ष झाल्या असताना, तसंच बायडन प्रशासनात इतर अनेक भारतीय वंशाची लोक आल्यानंतर अमेरिकेतील भारतीय आणखी उठून दिसतील.