युतीत शिवसेनेचं स्थान मजबूत करण्यासाठी जनआशीर्वाद?

- प्राजक्ता पोळ
"निवडणुकीमध्ये मत मागण्यासाठी नाही तर तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. माझ्यासाठी तुमच्याबरोबरचा संवाद हिच 'तीर्थ यात्रा' आहे. नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीचं आव्हान आपल्यासमोर आहे." युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या सुरवातीला केलेलं हे वक्तव्य आहे.
 
जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे त्यांचा 'आदित्य संवाद' हा कार्यक्रमही करत आहेत.
 
राज्यातल्या विधानसभा निवडणुकांना अवघे अडीच महिने उरले आहेत. जागावाटपापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत 50-50 चा फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे.
 
भाजपचं देशात आणि राज्यातलं स्थान मजबूत असलं तरी युतीमध्ये शिवसेनेला बरोबरीचं स्थान मिळण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केल्याची चर्चा आहे. आदित्य यांच्या या यात्रेमागे शिवसेनेची अजून कोणती गणितं आहेत याचा हा आढावा.
 
लोकांच्या मनात असेल तर 'ते' शक्य आहे!
१८ जुलैला जळगावमधून आदित्य यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरवात केली. जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, शिर्डी या जिल्ह्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधला. या यात्रेदरम्यान शिवसेना नेते वारंवार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचा उल्लेख करत आहेत.
 
जळगावच्या सभेत शिवसेना खासदार संजय राऊत म्हटलं 'महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एका युवा चेहर्‍याची गरज आहे आणि ते नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसतय. विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.'
 
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता 'जर लोकांच्या मनात असेल तर काहीच हरकत नाही. पण याबाबत अजून काही ठरलेलं नाही. सध्या मी लोकांचे आशिर्वाद घेण्यासाठी या यात्रेवर निघालो आहे.'
 
'आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवली तर ते निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरतील. पण आदित्य यांचा चेहरा अद्याप मुंबईपुरता आहे. असं मत मिड-डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर मांडतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना शिवडेकर पुढे म्हणाले, "निवडणूक लढवायची असेल तर त्यांना ग्रामीण महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. पण या धावत्या यात्रेतून ग्रामीण भागातले प्रश्न कितपत समजून घेतले जातायेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण जर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर त्यांना भाजप मुख्यमंत्री पद देईल याबाबत शंका आहे पण जरी मुख्यमंत्रीपद नसेल तरी त्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचं पद द्यावंच लागेल."
 
"त्यासाठी आदित्य ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्रात लोकांमध्ये जावं लागेल. जर ते नाही गेले तर ठाकरेंचा नातू विधानसभा लढून थेट उच्चपदी जाऊन बसला असा शिक्का बसेल. ते टाळण्यासाठी हा आटापीटा आहे," असं ते पुढे सांगतात.
 
युती शेवटच्या क्षणी तुटली तर...?
युतीमधल्या शिवसेनेच्या स्थानाबाबत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, "विधानसभा निवडणूक भाजपसाठी जितकी सोपी आहे तितकी शिवसेनेसाठी नाही. 2014 ला युतीत लढायचं हेच समोर असताना शेवटच्या क्षणी युती तुटली आणि स्वबळावर लढण्याची वेळ शिवसेनेवर आली."
 
"आताही भाजपमधल्या अनेकांना युती होऊ नये असं वाटतं. त्यामुळे दोन्ही पक्ष युती झालीये हे सांगत असले तरी शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं ही शक्यता डोळ्यासमोर ठेवून शिवसेना तयारी करत आहे," देशपांडे सांगतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्रीपदाबाबत निवडणुकीपर्यंत काही बोलायचं नाही असं ठरलेलं असतानाही शिवसेना वारंवार मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करतेय. तसंच आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचं सेना सांगते. यातून शिवसेनेला आम्ही तडजोड करून नाही तर आमच्या मागण्या मान्य करून भाजपसोबत आहोत असं लोकांसमोर दाखवायचं आहे. याचं कारण वारंवार टीका करून लोकसभेच्या युतीनंतर शिवसेना लाचार आहे ही प्रतिमा तयार झाली होती ती खोडून काढायची आहे."
 
"याचबरोबर 2014 च्या निवडणुकीत शिवसेना 63 जागांवर विजयी झाली आहे. जर 135 चा फॉर्म्युला ठरला इतर जागांवर शिवसेनेला जोरदार तयारी करावी लागणार आहे. त्या जागा शिवसेनेला जिंकणं कठीण आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही यात्रा काही प्रमाणात फायदेशीर ठरेल," असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती