इन्स्टाग्रामवर 'त्यांना' किती लाईक्स मिळाले, हे आता तुम्हाला दिसणार नाही

तुम्ही इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट अपलोड करता. मग थोड्याथोड्या वेळाने चेक करता कुणाचे लाईक्स आलेत, किती कमेंट आल्या. कुणी कुठे मेन्शन करतंय का. पण हे मनासारखं होत नाही तेव्हा निराशा होते.
 
त्यातच तुमच्या पोस्ट्सला मिळणारे लाईक्स इतरांच्या पोस्ट्सला मिळणाऱ्या लाईक्सपेक्षा कमी असेल तर? आणखी निराशा. होतं ना तुमच्याबरोबर असं कधी?
 
म्हणूनच इन्स्टाग्राम आता हे आकडेच दाखवणं बंद करणार आहे. म्हणजे ना लाईक्सच्या तुलनेचं प्रेशर असेल ना कसलीही सेल्फी स्पर्धा.
 
इन्स्टाग्राम आता ऑस्ट्रेलिया आणि जपानसह अनेक देशांमध्ये एखाद्या पोस्टला मिळालेले लाईक्स सार्वजनिकरीत्या दाखवणं बंद करत आहे. गेल्या आठवड्यात यासाठीची चाचणी सुरू करण्यात आली.
 
म्हणजे एखाद्या फोटोखालील 'लाईक्ड बाय'मध्ये तुमच्या ओळखीचं युजरनेम आणि आणखी किती जणांनी तो लाईक केला आहे, याचा आकडा दिसण्याऐवजी आता तुमच्या ओळखीचं युजरनेम आणि इतर, असं दिसेल. कुठलाही दबाव निर्माण करणारा नंबर दिसणार नाही.
 
मात्र तुम्हाला हे नक्कीच दिसेल की तुमच्या स्वतःच्या पोस्टवर किती 'लाईक्स' आले आहेत. फक्त इतरांच्या पोस्टला मिळालेल्या लाईक्सचा आकडा दिसणार नाही आणि तुमच्या पोस्ट्सवरील लाईक्सचा आकडा इतरांना दिसणार नाही.
 
सोशल मीडियामुळे तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो आहे, आपण कमी पडतोय का, अशी भावना त्यांच्या मनात वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
 
इन्स्टाग्रामने मे महिन्यात अशीच एक चाचणी कॅनडामध्ये घेतली होती आणि आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, आयर्लंड, इटली, जपान आणि ब्राझीलमध्येही अशाचप्रकारची चाचणी सुरू करण्यात आल्याचं कंपनीने बीबीसीला सांगितलं.
 
"एखाद्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक्समुळे येणारा तणाव आता येणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. म्हणजे आता युजर्सना कोणत्याही दबावाखाली न येता त्यांना आवडणाऱ्या गोष्टी शेअर करता येतील," असं फेसबुक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या धोरण प्रमुख मिया गार्लिक यांनी निवेदनात म्हटलं.
 
आपल्याला जोखलं जात असल्याची भावना यामुळे कमी होईल आणि "या बदलामुळे लोक लाईक्सवर कमी लक्ष देत आपली गोष्ट सांगण्याकडे जास्त लक्ष देतात का हेही समजेल," त्या म्हणतात.
 
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी सांगतात, "कॅनडामध्ये जेव्हा पहिल्यांदा याची चाचणी घेतली तेव्हा यामागचा उद्देश होता पोस्टला मिळणाऱ्या लाईक्सवरून युजर्समध्ये चालणारी स्पर्धा कमी होईल आणि परिणाम ऑनलाईन पोस्ट करण्यातला तणाव कमी होईल."
 
"इन्स्टाग्रामवर आपल्याला किती लाईक्स मिळतात याची चिंता करणं कमी करून लोकांनी त्यांच्याविषयी आपुलकी असणाऱ्यांशी संवाद साधावा, असं आम्हाला वाटतं. तेच आम्हाला हवंय," मोसेरींनी तेव्हा सांगितलं होतं.
 
एखाद्या पोस्टला किती लाईक्स मिळतात यावरून इन्स्टाग्रामवरचं यश आणि लोकप्रियता मोजली जाते.
 
आपण शेअर केलेल्या गोष्टीला ताबडतोब मिळणाऱ्या प्रतिसादामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढतो. पण तितकासा प्रतिसाद वा लाईक्स मिळाले नाहीत तर आत्मविश्वास कमी होत असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. लोकांच्या विशेषतः तरुणांच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांमध्ये म्हटलं आहे.
 
एखाद्या व्यक्तीच्या पोस्टला किती लाईक्स मिळतात, याला इन्स्टाग्रामवर व्यावसायिक महत्त्वही आहे. कारण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ते पोस्ट करत असलेल्या कन्टेन्टसाठी त्याला मिळणाऱ्या लाईक्सनुसार पैसे मिळतात.
 
याच महिन्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामने ऑनलाईन बुलींग (Bullying) थांबवण्यासाठीही नवीन फीचर्सच आणली आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती