पाकिस्तानात महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं

गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (15:38 IST)
- फरहत जावेद
पाकिस्तानात महागाईबाबतची तक्रार तशी प्रत्येक सरकारच्या कार्यकाळात हमखास केली जाते.
 
पण गेल्या काही महिन्यात महागाईने अतिशय रौद्र रुप धारण केलं आहे. या महागाईमुळे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे.
 
स्थिती उत्तम असलेले लोकही आता महागाईविरोधात गळा काढताना दिसून येत आहेत.
 
या परिस्थितीमुळे नोकरी पेशातील लोकांना कुटुंब चालवणं म्हणजे तारेवरची कसरत वाटू लागलं आहे.
 
रावळपिंडीच्या राहणाऱ्या खालिदा ख्वाजा म्हणतात, "महागाई ही एक अशी गुहा आहे, जिच्या पोटात काळाकुट्ट अंधार लपलेला आहे."
 
मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून असलेल्या खालिदा यांच्यासमोरील एकमेव दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांचं स्वतःचं घर आहे. शिवाय त्यांच्या मुलांचं शिक्षणही पूर्ण झालं आहे.
 
पण आता मुलांच्या लग्नाच्या काळजीने त्या चिंताग्रस्त दिसून येतात. महागाईने कंबरडं मोडल्याचं भावना त्यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.
 
त्या म्हणतात, "आमच्या घरात लग्न करणं तर लांब पण सध्याच्या स्थितीत आम्ही दुसऱ्यांच्या लग्नातही जाण्याबाबत पुन्हा पुन्हा विचार करत आहोत. सगळं अवघड झालं आहे."
 
खालिदा यांच्या घरातील बजेटची आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानातील महागाईचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.
 
भाज्या, दूध, अंडी किती महागली?
गेल्या वर्षाशी तुलना केली तर पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार, चालू वर्षाच्या जुलै महिन्यापेक्षा यंदाच्या वर्षी महागाई 25 टक्क्यांनी वाढली आहे.
 
डाळीची किंमत 35 ते 92 टक्क्यांपर्यंत वाढली.
कांद्याचा दर सुमारे 60 टक्क्यांनी वाढला.
मटणाचा दरही 26 टक्क्यांनी वाढला.
भाज्यांच्या दर 40 टक्क्यांनी वाढला.
फळांच्या दरात 39 टक्के वाढ झाली.
दूध 25 टक्क्यांनी तर अंडी आणि चहापूड 23 टक्क्यांनी महागले आहेत.
इतर वस्तू किती महागल्या?
केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूंचा दर वाढला, असं नाही. तर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
 
आंघोळीचा आणि कपड्यांचा साबण, काडीपेटी आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा दर 25 टक्क्यांनी वाढला आहे.
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत इंधनाचा दर जवळपास दुपटीने वाढला असून यामुळे सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसल्याचं दिसतं.
 
वीजेच्या दरातही 87 टक्क्यांची भाववाढ करण्यात आली.
 
'आता बिर्याणी बनवणं परवडत नाही'
"आज एका सर्वसामान्य कुटुंबात घर चालवणंही अत्यंत अवघड बनलं आहे", असं खालिदा ख्वाजा सांगतात.
 
खालिदा यांना चार मुलं आहेत. त्यांचे पती एक छोटासा व्यवसाय करतात. तर एका मुलाला नुकतीच खासगी कंपनीत नोकरी लागली आहे.
 
वाढत्या महागाईसोबत उत्पन्नही वाढलं का, या प्रश्नाचं उत्तर देताना खालिदा म्हणाल्या, "सरासरी उत्पन्न तीन वर्षांपूर्वीसारखंच आहे. आवश्यकता तिच आहे. पण खर्च आता वाढला आहे. किराणा दुकानात पाच हजार रुपये नेले तरी पुरेसं साहित्य मिळत नाही."
 
"प्रत्येकवेळी साहित्य विकत घेताना याच्या व्यतिरिक्त आपण जगू शकतो की नाही, याचा विचार मी नेहमी करते. हा विचार करता करता मी त्या वस्तू परत ठेवून देते. सुरुवातीला अत्यावश्यक वस्तू घेते. त्यानंतर काही आवडलं तरच घेते. गेल्या काही दिवसांपासून तर मी बिर्याणी मसालासुद्धा खरेदी करत नाही. कारण हासुद्धा अनावश्यक खर्च आहे," असं मला वाटतं.
 
'बिर्याणीऐवजी वरण-भात बनवते'
खालिदा उपरोधिकपणे म्हणाल्या, "जेवण सोडू शकतो का? तेल, तुप किंवा चपात्या वगैरे खाणं सोडलं जाऊ शकतं का?"
 
चिकन-मटणाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. सुरुवातीला प्रत्येक वेळी ताजं जेवण बनवायचो. आता दुपारचं उरलेलं रात्री जेवून दिवस काढत आहोत.
 
"सुरुवातीला बिर्याणी खूपवेळा बनवायचे. पण आता वरण-भात खाण्याची वेळ आमच्यावर आली आहे. अशा प्रकारे काटकसर आम्ही करत आहोत," खालिदा म्हणतात.
 
वीजेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "वीजबिल तर सगळ्यांचा कहर आहे. आम्ही दोनपैकी एकच एसी वापरतो. तीसुद्धा खूपच जास्त उष्णता वाढली तरच. याशिवाय फ्रिज, वॉशिंग मशीन आठवड्यातून एकदाच वापरतो. पण या महिन्यात वीज बिल 30 हजार रुपये आलं आहे."
 
नातेवाईकांकडे जाण्यासाठी वाढीव खर्च
पेट्रोलच्या वाढत्या दरांचा उल्लेख करताना खालिदा म्हणतात, "महागाईच इतकी वाढली आहे की आता नातेवाईकांकडे आमचं येणं-जाणंही कमी झालं आहे. पुरुष मंडळी बहुतांश दुचाकी वापरतात.
 
पण कुटुंबासोबत कुठे बाहेर जायचं म्हणलं तर कारचा वापर करावा लागतो. पेट्रोलचा खर्च आणि त्यांच्या घरी जाताना रिकाम्या हातांनी जाऊ शकत नाही. अशा प्रकारे वाढीव खर्च होत असल्याने नातेवाईकांकडेही जाता येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती