एकनाथ शिंदे बंड : मी काल, आज, उद्या शिवसेनेतच - योगेश कदम
शुक्रवार, 24 जून 2022 (22:45 IST)
मी काल, आज, उद्या शिवसेनेतच आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
योगेश कदम ट्विट करून म्हणाले, "मी काल, आज, उद्या शिवसेनेत. भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही."
"रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल."
तुम्ही कुटुंबप्रमुख ना? मग कधी साधी चौकशी तरी केली का? - भरत गोगावले
तुम्ही कुटुंबप्रमुख आहात ना, पण कधी आमची चौकशी केली का, असा सवाल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई, सूरत, गुवाहाटी येथे वेगाने घटना घडत आहेत. विद्यमान राजकीय परिस्थितीवर नेत्यांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
दरम्यान, बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याशी फोनवर बोलताना भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या मनातलं बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम अजून निघालेलं नाही. मुख्यमंत्री काय म्हणाले यावर पुढे बघू, असं ते यावेळी म्हणाले.
"पाण्यातून मासा काढल्यानंतर त्याचे काय हाल होतात, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती बनलीआहे. पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची सरकार वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. पण काँग्रेसकडून असे प्रयत्न सुरू आहेत का, ते लक्षात घ्या, असंही गोगावले यांनी म्हटलं.
शिवसैनिकांच्या संतापाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की काही ठिकाणी शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणार. पण त्यांना खरी गोम माहिती नाही. नेतेमंडळींनी शब्द योग्य प्रकारे वापरायला हवेत. फटका मारला तर माणूस विसरतो पण शब्द जिव्हारी लागतो, असंही गोगावलेंनी म्हटलं.
निलंबनाविषयी बोलताना त्यांनी म्हटलं, "आमदारांचं निलंबन होणार नाही. कायद्याच्या बाबीत पाहिलं तर त्यांना आम्हाला नोटीस द्यावी लागेल. आमच्या गटाला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करतोय. कायद्यात काय असेल ते होईल. कायदेशीर बाबी व्यवस्थित झाल्या की राज्यपालांच्या पत्राबाबत ठरवू."
मला कॅन्सर झाला तेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारपूसही केली नाही - यामिनी जाधव
मला कॅन्सर झाला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधी विचारपूसही केली नाही, अशा शब्दांत भायखळाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी खंत व्यक्त केली आहे. आमदार यामिनी जाधव यासुद्धा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत.
यामिनी जाधव या सध्या गुवाहाटीत असून तिथूनच एक व्हीडिओ पोस्ट करून त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा सध्याचा संताप आम्ही समजू शकतो. पण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. अखेरचा श्वासही शिवसैनिक म्हणूनच घेणार आहोत, असं जाधव यांनी स्पष्ट केलं. दुर्धर आजाराने पीडित असताना अडचणीच्या काळात पक्षाने आपल्याला साथ दिली नाही, याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं.
मोजके नेते वगळता कुणीही आपल्याला विचारपूस केली नाही, असंही त्यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की - उदयनराजे भोसले
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती होती. त्यामुळे या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.
यावेळी संजय राऊत यांच्याबाबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उदयनराजे म्हणाले, "बेताल वक्तव्य करणाऱ्यांचं नाव घेऊन मला तोंडाची चव घालवायची नाही."
आम्ही पराभव मान्य करणार नाही, आम्हीच जिंकू- संजय राऊत
शिवसेना आणि काही अपक्ष असे 46 आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, तर दुसरीकडे सरकारने या आमदारांविरोधात काही कारवाई करता येते का, याचा विचार सुरू केला आहे.
'हम हार माननेवाले नही है, हम जितेंगे, फ्लोऱ ऑफ द हाऊस पे जितेंगे, जिसको हमारा सामना करना है वो मुंबई आ सकते है., अब टाइम निकल चुका है, उन्होने गलत कदम उठाया है. पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है', अशा भाषेत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे. सकाळी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी या भाषेत बंडखोरांना मुंबईत येण्याचं आव्हानं दिलं.
बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे यांनी आपल्याबाजूने आहे असे म्हटले आहे, यावर तुमचे मत काय आहे असे पत्रकारांनी संजय राऊत यांना आज शुक्रवारी सकाळी विचारले. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ही कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पाहू काय होतं ते. त्यांनी एक निर्णय घेतलाय. बहुमत हा फक्त चर्चेला. ते मुंबईत येतील तेव्हा बाळासाहेबांवरील भक्तीची शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागेल. महाविकास आघाडीच्या बाजूनेच आमदारंचा कौल असेल."
आता महाराष्ट्रातील जनतेला मात्र यापुढे नक्की काय होणार, हे सरकार टिकणार की जाणार, गेले तर नवे सरकार कोणाचे असेल असे प्रश्न पडले आहेत.
नेतेपदी एकनाथ शिंदे
गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात गुरुवारी 23 जून 2022 रोजी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलीय. त्याची माहिती देण्यासाठी शिंदेच्या कार्यालयातून काही फोटो आणि व्हीडिओ जारी करण्यात आले आहेत.
त्यावेळी जे काय सुखदुःख आहे ते आपल्या सर्वांच एकच आहे. काही असेल त्याला आपण एकजुटीने सामोरं जाऊ. विजय आपल्याच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे सांगतानाच त्यांनी भाजपचं नाव घेतलं नाही पण त्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांचा त्यांना कसा पाठिंबा आहे हे विषद करून सांगितलं आहे.
शरद पवारांची भाजपावर टीका
एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांना भाजपची साथ असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंच्या व्हीडिओत त्यांना एका राष्ट्रीय पक्षाची मदत असल्याचा उल्लेख आहे. कोणता राष्ट्रीय पक्ष शिंदेंसोबत आहे, हे सांगायची गरज नाही. देशात भाजप, बसपा, काँग्रेस, सपा, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस हे अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे मग यात कुणाचा हात आहे, हे सांगायची गरज नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"आमदार परतले की वस्तुस्थिती स्पष्ट करतील. सगळे आमदार परत येतील याची मला खात्री आहे. त्यानंतर गुवाहाटीला जाण्याची कारणेही समोर येतील. बंडखोरांना इथं विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल. आता विधानसभेत लढाई होईल. इथं आल्यावर भाजप बंडखोरांना मार्गदर्शन करेल असं वाटत नाही. मतदारसंघातही त्यांना तोंड द्यावं लागेल," असंही पवार म्हणाले.
झिरवळ म्हणतात.....
एकनाथ शिंदे यांच्या गटानं 34 आमदारांच्या सहीचं एक पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना लिहिलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना गटनेता तर भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पण असं कुठलंही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं नसल्याचं झिरवळ यांनी सांगितलं आहे. गुरुवारी सकाळी झिरवळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
तसंच या कथित पत्रात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांची सही खोटी असल्याचं कळवलं आहे. त्यांची सही ते इंग्रजीत करतात पण या पत्रात मात्र त्यांची सही मराठीत अल्यातं त्यांनी कळवल्याचं झिरवळ यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अजय चौधरी यांना गटनेता आणि सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नेमण्याचं पत्र मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट करत त्यांनी त्यांची नियुक्ती केल्याचं सांगितलं आहे. गटनेता पक्ष प्रमुख नेमतो आणि गटनेता प्रतोदाची नियुक्ती करतो असं कायद्यानुसार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.