हैदराबाद ऑनर किलिंगः 'मी विनंती करत राहिले आणि भाऊ माझ्या नवऱ्यावर रॉडने वार करत राहिला'

शुक्रवार, 6 मे 2022 (16:09 IST)
सुरेखा अबुरी
  
मी माझ्या भावाला विनंती करत राहिले. पण माझा भाऊ रॉडने आणि एक व्यक्ती चाकूने नागराजू म्हणजे माझ्या पतीवर लागोपाठ वार करत राहिले. माझ्या पतीला कोणीही वाचवू शकलं नाही. आम्ही प्रेम विवाह केला होता." आपल्या डोळ्यादेखत नवऱ्याची हत्या होताना पाहणारी आसरीन अर्धवट शुद्धीत हा सगळा घटनाक्रम सांगत होती.
 
हैदराबादला बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरुरनगर महापालिका कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गायत्री कॉलनीत भरवस्तीत झालेल्या या हत्येने खळबळ उडाली.
 
नागराजू आणि आसरीन एका शाळेत होते आणि तेव्हापासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. कॉलेजमध्येही त्यांचं प्रेम सुरूच होतं. त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल आसरीनच्या भावाला कळलं. आसरीनच्या भावाचा फळं विकण्याचा व्यवसाय आहे असं पोलिसांनी सांगितलं. आसरीनच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. ती तिच्या भाऊ आणि आईबरोबर राहत होती.
 
नागराजू मागास जातीचा आहे. त्याचे आईवडील विकराबादमध्ये हमालीचं काम करतात. त्याला एक बहीण आहे. आसरीनचा मोठा भाऊ सैय्यद मोबीन हे नातं संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर नागराजू हैदराबादच्या मारुती शो रुम मध्ये कामाला होता. या वर्षांच्या जानेवारी महिन्यात तो आसरीनला पुन्हा भेटला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
मृत्यूच्या भीतीने सोडलं हैदराबाद पण...
आसरीनचे भाऊ या नात्याला संमती देणार नाही याची तिला कल्पना होती. म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरच्यांना तिचा ठावठिकाणा कळू नये म्हणून तिने तिचा मोबाईलही घरीच ठेवला होता.
 
दोघांनी 31 जानेवारीला जुन्या हैदराबादमध्ये आर्य समाज मंदिरात लग्न केलं. आसरीनच्या भावाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार बालानगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी दोघांना बोलावलं तेव्हा त्यांना कळलं दोघंही प्रौढ आहेत आणि दोघांच्याही कुटुंबीयांना बोलावलं आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
 
नागराजूची आई सांगते, "आम्हीसुद्धा पोलीस ठाण्यात गेलो होतो. तिथे मुलीची आई आणि भाऊ आला होता. मी तिच्या आईला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका मलाही मुलगी आहे. मी तिची काळजी घेईन. आमच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आसरीनने फोटोही काढले. तरीही आसरीन म्हणत राहिली की तिचा भाऊ या नात्याचा कधीही स्वीकार करणार नाही."
 
म्हणून घाबरून दोघांनी हैदराबाद सोडलं आणि ते विशाखापटट्णमला राहायला गेले. पाच दिवसांपूर्वी ते हैदराबादला परत आले. त्यांना वाटलं की आता घरच्यांचा राग निवळला असेल.
 
'आधी एक जागा निवडली मग बदलली'
नागराजूच्या वडिलांनी सांगितलं की दोघंही नागराजूच्या नातेवाईकांकडे रहायला गेले. मात्र मोबीन आणि त्याचा नातेवाईक मसूद या दोघांच्या मागावर होते. आधी मलकपेटच्या रस्त्यावरच नागराजूवर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र तिथे गर्दी होती म्हणून ते त्याचा माग काढत राहिले.
 
घटनास्थळावर पोहोचल्यावर नागराजूची गाडी थांबवली आणि याला खाली पाडून त्याच्यावर वार करण्यात आले. आसरीनच्या मते नागराजूने हेल्मेट घालं होतं. मात्र मोबीनने त्याच्यावर रॉडने वार करायला सुरुवात केली. मसूदने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. आसरीन सातत्याने नागराजूला सोडण्यासाठी विनवणी करत राहिली. मात्र नागराजू रक्तबंबाळ होईपर्यंत दोघांनी त्याला सोडलं नाही.
 
आसपासच्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते प्रयत्न अपुरे पडले. पोलिसांना पाचारण करण्यात आलं पण तेव्हापर्यंत नागराजूचा जीव गेला होता. तेव्हापर्यंत या भागात रोजच्यासारखी वर्दळ होती. मात्र या घटनेनंतर तिथे भीतीचं वातावरण निर्माण झालं.
 
हा सगळा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला. आसरीन ने तिच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोही व्हीडिओ व्हायरल झाला.
 
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया हॉस्पिटलला पाठवला. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे आईवडील आले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना आवरणं कठीण होऊन बसलं.
 
"माझा मुलगा बारावीपर्यंत शिकला होता. इथे हैदराबादमध्ये काम करत होता. मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझ्या एकुलत्या एका मुलाला मारून टाकलं. दोघांनी कोणालाही न सांगता लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतर त्याने मला सांगितलं. लग्नाननंतर आसरीनने मला सांगितलं की भावापासून तिच्या जिवाला धोका आहे. माझे नातेवाईक सरूर नगरला राहतात. त्यांनीही जवळच घर घेतलं होतं. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे. पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे."
 
'धर्म हेच मृत्यूचं कारण'
पोलिसांनी दावा केला की 24 तासाच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. उस्मानिया हॉस्पिटलसमोर जातीआधारत संघटनांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय यांनी या घटना दु:खद असल्याचं सांगितलं आहे. धर्माच्या नावावर ही हत्या झाल्याचं ते म्हणाले. सरूर नगरच्या पोलीस उपायुक्तांनी मात्र या आरोपाचं खंडन केलं आहे. पीडितेला पोलिसांकडून मदत मिळण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगितलं आहे.
 
"पीडितेची स्थिती अतिशय नाजूक आहे. तिला या परिस्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल" असं पोलीस उपायुक्त सनप्रीत सिंह म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती