आर्यन खान: प्रभाकर साईल यांचा अचानक मृत्यू कसा झाला? वकील म्हणाले...

शनिवार, 2 एप्रिल 2022 (09:48 IST)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे एक प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मुंबईत मृत्यू झालाय.
 
शुक्रवारी संध्याकाळी प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती, त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
 
आर्यन खानच्या अटकेनंतर प्रभाकर साईल यांनी NCB चे माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडेंवर 8 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यामुळे प्रभाकर साईल चर्चेत आले होते.
 
प्रभाकर साईल यांच्या मृत्यूबाबत नार्कोटिक्स कंट्रोल विभाग आणि मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या काही वक्तव्य केलेलं नाही.
 
प्रभाकर साईल यांच्या मृत्यूचं कारण काय?
शनिवारी सकाळी प्रभाकर साईल यांच्या धक्कादायक मृत्यूची बातमी आली. साईल यांचा मृत्यू अचानक झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मुंबई पोलिसांनाही साईल यांचा मृत्यू झाल्याची माहिती नव्हती.
 
बीबीसी मराठीने प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे यांच्याशी संपर्क केला.
 
तुषार खंदारे म्हणाले, "शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली."
 
प्रभाकर साईल यांचं मुंबईत स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे चेंबूर भागातील माहुल परिसरात ते भाड्याच्या घरात रहात होते.
 
तुषार खंदारे पुढे म्हणाले, "त्यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे."
 
प्रभाकर साईल यांच्या आई मुंबईतील अंधेरी परिसरात रहातात. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी बीबीसीशी बोलताना म्हणाले, प्रभाकर साईल यांच्या मृत्यूची माहिती मिळालीये. या प्रकरणी नक्की काय झालंय. याची माहिती आम्ही घेत आहोत.
 
कोण होते प्रभाकर साईल?
36 वर्षांचे प्रभाकर साईल आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे एक प्रमुख साक्षीदार होते.
 
मुंबई बंदरावर 2 ऑक्टोबरला 2021 ला कॉर्डिलिया क्रूजवर NCB छापेमारी केली होती. या कारवाीत NCB ने बॉलीवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यनना ड्रग्ज प्रकरणी अटक केली. या कारवाईत प्रभाकर साईल यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोसाठी साक्षीदाराचं काम केलं होतं
 
कॉर्डिलिया क्रूजवर प्रवासी येण्यापासून ते आर्यन खानच्या अटकेपर्यंत प्रभाकर साईल एनसीबीच्या पथकासोबत कारवाईत होते.
 
पण, आर्यन खानच्या अटकेनंतर दोन दिवसांनी साईल यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक व्हीडिओ जारी केला. त्यात त्यांनी NCB चे माजी झोनल डिरेक्टर समीर वानखेडेंवर 8 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप केला. समीर वानखेडेंवर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे प्रभाकर साईल चर्चेत आले होते.
 
NCB च्या एका प्रमुख साक्षीदाराने समीर वानखेडेंवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केल्यामुळे, आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं होतं.
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा एक साक्षीदार किरण गोसावी यांचे बॉडीगार्ड म्हणून प्रभाकर साईल काम करत होते.
 
प्रभाकर साईल यांची चौकशी का झाली?
समीर वानखेडेंवर खंडणी मागण्याचा आरोप केल्यामुळे आर्यन खान प्रकरणाला राजकीय वळण मिळालं.
 
आर्यन खानला या प्रकरणी खोटं गुंतवण्यात आल्याचे आरोप करण्यात येत होते. त्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या एक साक्षीदाराने थेट समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यामुळे, हे प्रकरणी मोठं चर्चेत आलं.
 
प्रभाकर साईल यांच्या खळबळजनक आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आर्यन खान प्रकरणी खंडणी मागण्यात आली होती का, याची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम बनवण्यात आली. या टीमने प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवून घेतला होता.
 
दुसरीकडे समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी एनसीबी दिल्लीच्या पथकाने सुरू केली. NCB च्या व्हिजेलंस टीमने प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून एनसीबी दिल्लीच्या पथकाकडे देण्यात आला होता.
 
साईल यांनी वानखेडेंवर काय आरोप केले होते?
2 ऑक्टोबरला सकाळी किरण गोसावी यांचा फोन आला. त्यांनी मला CST ला पोहोचायला सांगितलं. लोकेशन NCB ऑफिसचं होतं. मी गेलो तर गोसावी यांची वर मीटिंग सुरू आहे, असं मला सांगण्यात आलं.
 
सकाळी पावणे दहाच्या NCB चे अधिकारी खाली आले. ते इनोव्हामध्ये बसले. त्यानंतर समीर वानखेडे आणि इतर अधिकारी बसले व सरकारी गाडीतून निघून गेले.
 
नंतर सव्वाबाराच्या सुमारास गोसावी खाली आले. आम्ही ग्रीन गेटकडे गेलो. तिथं गेल्यावर मला कळलं की इथूनच क्रूझकडे जाण्यासाठी प्रवेश दिला जातो. आम्ही विमानतळावर जातो, त्याप्रमाणे बोर्डिंगच्या ठिकाणी गेलो. तिथं सगळे अधिकारी बसले होते.
 
मला ग्रीन गेटकडे उभं राहण्याची सूचना दिली. आम्ही काही वेळाने फोटो पाठवतो. ती व्यक्ती आत आली की ओळखून मला सांगायचं असं ते म्हणाले. गोसावी यांनी मला काही फोटो पाठवले. मी सर्च करू लागलो. मास्कमुळे अडचणी येत होत्या. पण दरम्यान पांढरा टीशर्ट घातलेल्या एका व्यक्तीला मी ओळखलं. त्याची माहिती मी त्यांना दिली. नंतर आम्ही पकडलं आहे, असा मेसेज मला आला. व नंतर 13 जणांना पकडल्याचा मेसेज मला केला.
 
संध्याकाळी मी काही वेळ बाहेरच थांबलो रात्री साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास मी पुन्हा आत गेलो. त्यावेळी मला समीर वानखेडे दिसले. केबिनमध्ये मला आर्यन खानही दिसला. त्याच्यासोबत आणखी 7-8 जण होते. मी गुपचूप आर्यन खानचे फोटो काढले.
 
साडेअकरा-पावणेबाराच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो. किरण गोसावी आर्यन खानसह गाडीत बसून NCB च्या कार्यालयात गेले. मीसुद्धा चालत तिथं गेलो.
 
पावणे एकच्या सुमारास मला वर बोलावून पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही करण्यास सांगितलं.
 
वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर मला सही करायला लावली. 8-10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेण्यात आली. माझं आधारकार्ड मी व्हॉट्सअॅपवर पाठवून दिलं.
 
अडीच पावणेतीनला मी खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावी यांना सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. त्यांची डिल सुरू होती.
 
हाटे साडेचार वाजता गोसावी आणि सॅम एका गाडीत आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे लोअर परेलला एका पुलाखाली थांबलो. तिथं आमच्या मागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. त्या गाडीत शाहरूख खानची मॅनेजर बसली होती.
 
तिघांमध्ये मिटिंग झाली. त्यात काय झालं मला कळलं नाही.
 
गाडीतून त्यांनी फोन केला. त्यावेळी 25 चा बॉम्ब टाक. 18 पर्यंत डन करू. 8 वानखेडे साहेबांना जातील. 10 आपण वाटून घेऊ, असं त्यांचं संभाषण झाल्याचं मी ऐकलं. त्यानंतर सुमारे साडेपाचच्या सुमारास आम्ही तिथून निघालो.
 
मंत्रालयाच्या समोर जाऊन आम्ही उभे राहिलो. नंतर पूजा फोन नही उठा रही है असं म्हणून सॅमचा फोन आला. जाऊदे आम्ही घरी जातो म्हणून गोसावी यांनी म्हटल्यानंतर आम्ही तिथून निघालो. मी आंघोळ केली. रात्रभर झोपलो नव्हतो.
 
सरांनी मला कॉल करून पुन्हा महालक्ष्मीला जाण्यास सांगितलं. तिथं एक गाडी येईल, त्यामधून तुला 50 लाख रुपये घ्यायचे आहेत, असं मला गोसावींनी सांगितलं. पांढऱ्या रंगाच्या त्या गाडीतून पैसे घेऊन घरी गेलो. तिथं त्यांची बायको होती. मी बॅग दिली. ते बॅग घेऊन निघून गेले. मला घरीच थांबायला सांगितलं.
 
त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मला वाशी ब्रिजकडे पुन्हा बोलावलं. इनॉर्बिट मॉलजवळ पुन्हा माझ्या हातात पैशांची बॅग दिली. चर्चगेटला जाऊन पुन्हा सॅम यांना ते पैसे दे, असं ते म्हणाले.
 
आतमध्ये 38 लाख रुपयेच होते. मला त्याबाबत काहीही माहीत नसल्याने मी गोसावींशी बोलून घ्या, असं म्हणालो. सॅम आणि गोसावी यांच्यात बोलणं झालं. बाकीचे 12 लाख दोन दिवसांत देतो, असं गोसावींनी सांगितलं.
 
त्यानंतर मी माझ्या घरी निघून आलो. नंतर मी गोसावींचे व्हीडिओ पाहिले. पुण्यातले प्रकरण वगैरे.. आज मी हा व्हीडिओ तयार करत आहे, कारण समीर वानखेडे यांची मला भीती वाटू लागली आहे.
 
कारण माझ्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तिला पोलिसांचे चौकशीसाठी फोन गेले होते. माझ्या कुटुंबाला काही झालं तर मी कुणासाठी जगायचं. समीर वानखेडे यांची मला भीती वाटत असल्यामुळेच मी हे सगळं तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती