'मला पाडण्यासाठी तालुक्यापासून प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो' : ऋतुराज रवींद्र देशमुख
सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:59 IST)
-श्रीकांत बंगाळे
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात लक्ष वेधलं आहे ते ऋतुराज रवींद्र देशमुख या तरुणानं.
21 वर्षांचा ऋतुराज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभा राहिला आणि जिंकूनही आला.
ऋतुराजनं 38 मतांनी विरोधी उमेदवारावर वियज मिळवला आहे.
इतकंच नाही तर त्यानं निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं आणि तेसुद्धा जिंकून आणलं.
भावी सरपंच?
घाटणे गावात 3 प्रभाग असून इथली ग्रामपंचायत 7 सदस्यांची आहे. ऋतुराजनं ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जणांचा विजय झाला आहे.
मग आता सर्वांत तरुण भावी सरपंच का, असं विचारल्यावर तो म्हणाला, "आपलं पॅनेल निवडून आलंय. सत्ता बसलीय. पण, आरक्षण सोडत निघाल्यानंतर सरपंच पदाची माळ गळ्यात पडेल की नाही ते ठरेल."
यंदा सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
आता नवीन निर्णयानुसार, सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसंच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसांच्या आत राबवण्यात यावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.
आगळावेगळा जाहीरनामा
ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऋतुराजनं गाव विकासाचा तयार केलेला जाहीरनामा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरला होता.
आपलं पॅनेल निवडून आल्यास गावासाठी काय काय उपक्रम राबवणार, याची सविस्तर माहिती त्यानं या जाहीरनाम्यात दिली होती.
याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, "सगळ्यांपर्यंत कमी वेळात पोहोचण्यासाठी मला सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. मी काय करणार ते जाहीरनाम्यात लिहिलं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. याचाच फायदा मला निवडणुकीत झाला."
राजकारणात प्रवेश
ग्रामीण भागात आजही ग्रामपंचायत निवडणूक किंवा राजकाणात उतरायचं म्हटलं की त्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं.
पण, ऋतुराजनं वयाच्या 21 व्या वर्षीच राजकारणात प्रवेश केलाय.
राजकारणात का यावंसं वाटलं, या प्रश्नावर तो म्हणाला, "आमच्या गावात आतापर्यंत काहीच काम झालेलं नाही. अजून पाण्याची टाकीसुद्धा नाही गावात. गावात हापसे आहेत आणि त्यावरून पाणी आणावं लागतं. ना चांगले रस्ते आहेत आणि ना घनकऱ्याचं व्यवस्थापन होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वत: राजकाणात यायचं ठरवलं आणि पॅनेल उभं केलं.
"शिकलेल्या पोरांसाठी विकास महत्त्वाचा आहे, खुर्ची नाही. ही जुनी खोडं खुर्चीला धरून बसायची आणि विकासाच्या नावानं मात्र बोंब होती. तरुण पोरांकडे विकास कसा करायचा याचा दृष्टिकोन असतो म्हणून अधिकाअधिक तरुणांनी राजकारणात यायला हवं."
ऋतुराजचं B.Sc.(रसायनशास्त्र) शिक्षण झालंय आणि सध्या तो ILS Law Collegeमध्ये LLB साठी प्रवेश घ्यायचा विचार करत आहे.