शेतकरी आंदोलन दिल्ली : 'नरेंद्र मोदींचे आम्ही आभारी आहोत त्यांनी झोपलेल्या शेतकऱ्याला जागं केलंय'

सोमवार, 7 डिसेंबर 2020 (15:49 IST)
नीलेश धोत्रे
"तुम्ही आमच्या (शेतकऱ्यांच्या) बाबतीत चांगलं लिहाल की वाईट," बॅटरी रिक्षात माझ्या समोर बसलेल्या त्या महिलेनं खाली उतरताना मला प्रश्न केला. मी उत्तर दिलं "जे सत्य दिसतंय ते लिहिन."
 
आदल्या रात्री चालत सोनीपतच्या सीमेपर्यंत पोहोचल्यानंतर सकाळी मात्र मी बॅटरी रिक्षा किंवा मिळेल त्या साधनाने सिंघू बॉर्डरवर पोहोचायचं ठरवलं होतं.
2 किलोमीटरच्या आंदोलनातून रस्ता काढत काढत पुढे गेल्यानंतर एक बॅटरी रिक्षा मिळाली होती. पुढे थोड्याच अंतरावर एक पंजाबी जोडपं या रिक्षात बसलं. उच्चभ्रू घरातलं हे जोडपं दिसत होतं. मी सहज त्यांना विचारलं. कुठून आलात? त्यांनी 'दिल्ली' असं उत्तर दिलं.
चर्चा केल्यानंतर लक्षात आलं हे जोडपं दिल्लीच्या महत्त्वाच्या भागात म्हणजे ल्युटियन्स दिल्लीत राहाणारं होतं. ल्युटियन्स दिल्लीत देशाचे सर्व मंत्री-खासदार आणि वरिष्ठ अधिकारी राहतात.
 
मी पत्रकार असल्याचं त्यांना सुरुवातीलाच लक्षात आलं होतं म्हणून ते जरा हातच राखूनच बोलत होते. पंजाबमधून आंदोलनात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हे जोडपं आलं होतं.
 
तुम्ही सरकारी अधिकारी आहात का, असा मी सवाल केला तर फक्त मान हलवून त्यांनी होकार दिला. "पण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे त्यासाठी आंदोलनात आली आहे," असं त्यातली महिला सांगू लागली.
मग पोलीस शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, असा सवाल मी केल्यानंतर मात्र ते दोघेही गप्प राहिले. त्यांची बॉंडी लॅंग्वेज काहीशी अवघडलेली होती. त्यांनी त्यांच्याकडे असलेली एक बदामाची पुडी मला देऊ केली. मी नकार दिला.
 
शेवटी त्यांचं इच्छित स्थळ आलं आणि ते दोघेही उतरले आणि उतरताना त्या महिलेनं मला प्रश्न विचारला, "तुम्ही आमच्या (शेतकऱ्यांच्या) बाबतीत चांगलं लिहाल की वाईट?" मी उत्तर दिलं "जे सत्य दिसतंय ते लिहिन."
 
त्या पुढे म्हणाल्या "तुमच्या मनात या आंदोलनाविषयी किंवा कायद्यांविषयी काही शंका असतील तर मी तुमच्याशी चर्चा करून त्या दूर करण्यासाठी तयार आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांविषयी चुकीचं लिहू नका."
 
मी पुन्हा त्यांना "मला जे सत्य दिसतंय ते मी लिहिन," असं उत्तर दिलं. आमचं हे संभाषण सुरू असेपर्यंत मागून ट्रॅक्टर्सवाल्यांचे हॉर्न वाजण्यास सुरुवात झाली होती आणि रिक्षावाल्याने गाडी पुढे घेतली.
पण बॅटरी रिक्षाने बॉर्डरपर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न फार काही सफल होऊ शकला नाही. पुढे 200 मीटरनंतर मला पायीच चालावं लागलं.
 
आजूबाजूच्या गावांची मदत
सकाळची वेळ होती पुरुषांनी तर रस्त्यांवरच त्यांच्या आंघोळी उरकून घ्यायला सुरुवात केली होती. पण या आंदोलनात महिलांचा सहभागसुद्धा दिसून येतो. त्या शेकडो महिलांना मात्र आजूबाजूच्या लोकांनी बरीच मदत केली आहे.
 
आजूबाजूच्या गावातल्या अनेक लोकांनी आंदोलकांच्या आंघोळ आणि प्रातःविधीसाठी सोय केली आहे.
 
आंदोलनात आलेल्या महिलांना गौरसोय होऊ नये म्हणून काही आजूबाजूच्या घरांमध्ये त्यांची रात्री झोपण्याची सोयसुद्धा करण्यात आली आहे. तर काही महिला रात्रीच्या वेळी बुराडीमध्ये दिल्ली राज्य सरकारनं उभारलेल्या तंबूंमध्ये राहाण्यासाठीसुद्धा जात आहेत.
त्यापैकीच एक आहेत डॉ. अनुरितकौर. अमृतसरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनुरित शेतकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी इथं आल्या आहेत. स्थानिक लोकांनी महिलांच्या राहण्याची सोय केल्याचं त्या सांगतात. महिलांना या आंदोलनात अत्यंत सुरक्षित वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
शिखांची धार्मिक फौजही आंदोलनात
सकाळची वेळ असल्याने प्रत्येक डेऱ्यामध्ये लंगर सुरू झाले होते. आंदोलनात रस्त्याच्या दुतर्फा चहा, बिस्कीट आणि वेगवेगळा नाष्टा वाटला जात होता.
 
काही डेऱ्यांमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. काही ठिकाणी मोठ्या तव्यांवर चपात्या भाजण्याचं काम सुरू झालं होतं.
 
पुढे काही अंतरावरच एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या हिरवळीवर काही घोडे बांधलेले दिसले. शीख धर्माची चक्रवर्ती फौज 'गुरु नानकदेव दल'ने इथं डेरा टाकला होता. काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर आमच्या प्रमुखांशी बोला असं त्यांनी मला सांगितलं.
तुम्ही इथं डेरा कशासाठी टाकला असा सवाल मी या दलाचे प्रमुख जत्थेदार बाबा मानसिंग यांना केला.
 
"शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. तसं तर आमची ही फौज वर्षभर देशभरातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गुरुद्वारांचा दौरा करत असते. नांदेड, पटना साहिब, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात असते. पण यंदा आम्ही ते सर्व दौरे रद्द करून इथं डेरा टाकला आहे. जोपर्यंत शेतकरी बांधव इथं आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर इथंच थांबू," असं जत्थेदार बाबा मानसिंग म्हणाले.
 
अखेर हा आमच्या येणाऱ्या पिढ्यांचा सवाल आहे, बाबा मानसिंग पुढे म्हणाले.
 
पण तुम्ही घोडे कशासाठी आणलेत, असं विचारल्यावर घोडे आमच्या फौजेचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
82 वर्षांच्या जत्थेदार बाबा मानसिंग यांच्या दलातल्या एकानंही मास्क घातला नव्हता की सोशल डिस्टसिंगचं पालन केलं जात होतं. त्यावर विचारलं तर आम्हाला कोरोनाची अजिबात भीती वाटत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
 
आंदोलनातला रोजगार
तिथून बाहेर पडून पुढचा रस्ता धरला तोच एका मोजे विक्रेत्यानं मोजे विकत घेण्याचा तगादा लावला. "नामाकिंत ब्रँडचे मोजे स्वस्तात देतो, एक पाकिट तरी घ्या ना," असा तगादा त्याने लावला होता.
 
कुठून आलास विचारलं तर दिल्लीतच राहत असल्याचं त्यानं सांगितलं. पण करण नावाचा हा मोजेविक्रेता मूळचा राजस्थानचा होता.
 
गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतल्या कश्मीरी गेटवर मोजे विकण्याचं काम करतोय. पण सध्या इथं फारशी वर्दळ नसते. म्हणून या गर्दीवाल्या आंदोलनात तरी आपला धंदा होईल या आशेनं तो इथं विक्री करण्यासाठी आला होता.
 
पण इथंही त्याच्या पदरी निराशाच येत होती. दिवसभरात फक्त 100 ते 200 रुपये सुटतात असं तो सांगू लागला. पण इथं खाण्यापिण्यावर पैसे खर्च होत नसल्याने तो थोडा खूषही होता. तुझा फोटो काढू का, असं विचारलं तर फार खूष होऊन तो तयार झाला.
हा काही मोजे विकत घेणाऱ्यातला नाही असं त्याच्या लक्षात आलं होतं, त्यामुळे फोटो काढून होताच त्याने त्याचा मोर्चा दुसरीकडे वळवला.
 
या आंदोलनात करण एकटाच नाही तर अनेक विक्रेत्यांनी त्यांची दुकानं थाटली आहेत. गरम कपडे, कानटोपी, जॅकेट्स अशा वस्तू विकणारेसुद्धा दिसून आले. त्या व्यतिरिक्त इतर वस्तू विकणाऱ्यांना इथं फारसा स्कोप नाही. कारण, महत्त्वाच्या जीवनावश्यक गोष्टी इथं मोफतच वाटल्या जात आहेत.
 
एक गोष्ट सर्वांत जास्त मोफत वाटली जात असल्याचं दिसून आलं ते म्हणजे खाद्यपदार्थ. चहा नाष्टा आणि जेवण तर वेगवेगळ्या लंगरमध्ये वाटलं जात होतंच. पण त्याच्या जोडीला फळं, लाडू, चिक्की, ड्रायफ्रुट्ससुद्धा वाटले जात होते.
आता एवढ्या मोठ्या प्रमाणात गोष्टी मोफत वाटल्यानंतर त्यामुळे कचरा आणि अस्वच्छता तर होणारच. आंदोलनात ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. काही ठिकाणी मात्र कचऱ्याचे डब्बे होते.
 
पण हे आंदोलन आणि तिथं होणाऱ्या कचऱ्यामुळे मात्र शरिफा फार खूष होत्या. शरिफा मूळच्या कोलकात्याच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत कचरा वेचण्याचं काम करत आहेत.
एरव्ही बरीच पायपीट आणि वेळ घालवल्यानंतर हाती पडणारं टाकाऊ प्लास्टिक त्यांना काही मिनिटांमध्ये छोट्याशा अंतरातच मिळत होतं. शक्य तेवढ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या त्यांना गोळा करायच्या होत्या. त्या आंदोलनामुळे खूष होत्या, पण त्यांच्याकडे माझ्याशी बोलायला मात्र फार वेळ नव्हता.
 
भाजप समर्थकांचाही सहभाग
शनिवार-रविवाराची सुट्टी असल्याने दुपारपर्यंत दिल्लीत राहणाऱ्या अनेकांनी या आंदोलनात हजेरी लावल्याचं दिसून आलं. दिल्ली आणि इतर शहरातून आलेल्या तरुणांची गर्दी लक्षणीयरीत्या दिसत होती.
 
विशेष म्हणजे त्यात काही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश होता. मोहालीतून आलेला एक तरूण भाजप कार्यकर्ता मला या आंदोलनात भेटला.
 
भाजप युवा मोर्चाचा तो स्थानिक अध्यक्ष होता. "शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंजाब आणि हरियाणातली सर्व जनता एक आहे. आमच्यासाठी शेतकरी आधी येतो मग पक्ष," असं त्याची ओळख उघड न करण्याच्या अटीवर त्यानं मला सांगितलं.
भूपिंदर सिंग यांचा चंदिगडमध्ये मद्य निर्मितीचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या 2 मित्रांसह आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. सुरुवातीला आम्ही नरेंद्र मोदी यांचे फॅन होतो. पण आता नाही, असं ते सांगतात.
 
आंदोलनात आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आधी त्यांनी मोदींसाठीच मतदान केल्याचं सांगत होते. पण आता करणार नसल्याचंही म्हणतात. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्याविरोधात बराच रोष या आंदोलकांमध्ये दिसून येतो.
 
या आंदोलनात काही तरूण ट्रॅक्टरवरून सतत एका टोकापासून दुसऱ्या टोकावर फिरत असतात. त्यांच्या ट्रॅक्टरवर मोठे भोंगे लावलेले असतात. कधी त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गाणी लावलेली असतात. तर कधी त्यावरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असते. "मोदी सरकार होश मे आओ" ही कॉमन घोषणा सतत ऐकायला मिळते.
डफलीच्या चालीवरसुद्धा काही ठिकाणी आंदोलनगीतं गायली जात होती. अशाच एका जलशामध्ये दिल्लीच्या महिंदर कौर यांनीही सहभाग घेतला होता.
 
माजी लष्करी अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या महिंदर कौर सांगतात, "आमचं मोदींशी काहीच वाकडं नाही. त्यांनी फक्त ते तीन कागद फाडून फेकून द्यावेत आम्ही इथून निघून जाऊ."
 
मीडियावर राग
इथं फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आंदोलकांचा मीडियावर असलेला राग. कुठलंही आंदोलन म्हटलं की टीव्ही मीडियाचा मोठा फौजफाटा तिथं दिसतो. पण इथं मात्र मीडियाची तशी फारशी गर्दी दिसली नाही.
काही लोकल आणि पंजाबी वृत्तवाहिन्या सोडल्या तर फारसे कॅमेरे दिसत नव्हते. आंदोलनात लावण्यात आलेलं एक पोस्टर मात्र सर्वांच लक्ष वेधून घेत होतं. त्यावर आंदोलकांनी काही न्यूज चॅनेल्सला इथं प्रवेश नसल्याचं लिहिलं होतं.
 
मीडियावर असलेल्या रागाचा सामना मलासुद्धा एक-दोन ठिकाणी करावा लागला.
 
कुंभमेळ्याचं स्वरूप
दुपारपर्यंत या आंदोलनाला कुंभमेळ्यासारखं स्वरूप आलं होतं. लोकांची गर्दी, धुरळा आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा पदोपदी होत होता. दिल्लीतून आलेला तरुणवर्ग मात्र काही प्रमाणात मास्क लावून फिरत होता. पण हे प्रमाण शंभरात एक असेल.
 
मोफत मिळणाऱ्या वस्तू घेण्यासाठी आजूबाजूच्या भागातल्या गरीबवस्तीतल्या लोकांची झुंबड उडत होती. ठिकठिकाणच्या लंगरमध्ये लोक जेवणासाठी गर्दी करतानाही दिसून येत होते.
अशा सगळ्या वातावरणात लोकांशी चर्चा करत करत सोनिपतच्या सीमेवरून आंदोलनाच्या स्टेजकडे येण्यासाठी सकाळी सुरू झालेला माझा प्रवास आता संपत आला होता. थंडीमध्ये दिल्लीत दिवस छोटा असतो. त्यामुळे सूर्य मावळतीकडे वळला होता.
 
आंदोलनाच्या मुख्य स्टेजकडे पोहोचताच एकच मोठा जल्लोष ऐकायला येत होता. आधी वाटलं दिल्लीतल्या विज्ञान भवनातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी सकारात्मक बातमी आली असावी. पण पुढे जाऊन पाहिलं तर लक्षात आलं की प्रसिद्ध गायक दलजित दोसांज आंदोलनाच्या स्टेजवर पोहोचला होता.
दलजीतच्या येण्यानं आंदोलकांना आणखी स्फूरण चढलं होतं. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती. तेव्हा गुरुदासपूरहून आलेल्या हरपाल सिंग यांनी आदल्या रात्री सांगितलेलं एक वाक्य आठवलं, "मोदी ने तो ये तीन क़ानून लाकर सोए हुए किसान को जगाया है, हम तो आभारी हैं उनके." (मोदींनी तर हे तीन कायदे आणून झोपलेल्या शेतकऱ्याला जागं केलं आहे, आम्ही तर त्यांचे आभारी आहोत.)
 
समाप्त.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती