देवेंद्र फडणवीस: शिवसेनेने हिंदुत्व का सोडलं? #5मोठ्या बातम्या

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (19:12 IST)
1) शिवसेनेने हिंदुत्व का सोडलं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
'हिंदुत्व भाजपची मक्तेदारी नाही. पण, शिवसेनेने हिंदुत्व का सोडलं', असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
 
लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्त्वाची मक्तेदारी भाजपकडे नाही. सद्यस्थिती पहाता लोकांना पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असं म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
 
"हिंदुत्त्व कुणाची मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्त्व जगावं लागतं. केवळ भाषणातून बोलून चालत नाही. ज्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरू होते तेव्हा अशाप्रकारचं वक्तव्य द्यावं लागतं. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही. पण, तुम्ही हिंदुत्व का सोडलं, एवढंच सांगावं", असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
 
2) शिवकालीन पावनगडावर सापडले शेकडो तोफगोळे
कोल्हापूरच्या पन्हाळगडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावर शेकडो शिवकालीन तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः हा गड बांधून घेतला होता. पावनगडावर गेल्या आठ दिवसांपासून माहिती देणारे फलक लावण्याचं काम सुरू होतं.
 
हे काम सुरू असताना आज सकाळीच गडावरील महादेव मंदिराच्या समोर तोपगोळे सापडले. त्यामुळे आणखी खोदकाम केलं असता आतापर्यंत 400 च्या वर तोफगोळे सापडले आहेत, असं एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या ठिकाणी हजारो तोफगोळे असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेकडोंच्या संख्येने तोफगोळे सापडण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना असल्याचं खोदकाम करणाऱ्या टीम पावनगडचं म्हणणं आहे. आतापर्यंत तोफगोळे कोठारांमध्ये आढळले होते. मात्र,यावेळी जमिनीत पुरून ठेवलेले तोफगोळे सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणखी उत्खनन केल्यास हजारो तोफगोळे सापडू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
 
3) ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं काल दुपारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. सगळे त्यांना राघवेंद्र अण्णा म्हणून ओळखत. 'गौरी', 'सखी', 'ब्लॅक अँड व्हाईट', 'कुठे कुठे शोधू मी तुला' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.
 
झपाटलेला चित्रपटातली त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली. ओम फट् स्वाहा म्हणणारे राघवेंद्र कडकोळ बघितले की सगळ्यांना धडकी भरायची.
 
ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या राघवेंद्र कडकोळ यांनी मराठी सिनेमे, नाटक, मालिका यासोबतच 'छोडो कल की बातें' या हिंदी सिनेमातही काम केलं होतं.
 
बालगंधर्व परिवारातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
 
4) गावाला जायला गाडी मिळाली नाही म्हणून चोरली एसटी
लातूरमधल्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातून काही तरुणांनी चक्क एसटी बस पळवल्याचा प्रकार घडला आहे. लोकमतने छापलेल्या वृत्तानुसार तीन-चार मद्यधुंद तरुण रात्री उशिरा एसटी स्थानकावर आले. मात्र, गावाला जायला रात्री बस नसल्याने त्यांनी स्थानकात उभी असलेली बसच पळवली. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.
 
बसचे चालक आणि वाहक रात्री झोपले होते. पहाटे जाग आली तेव्हा गाडी गायब असल्याचं त्यांना कळलं आणि त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बसचा शोध सुरू केला. तेव्हा बस स्थानकापासून काही अंतरावर शेळगी गावात आढळली.
 
या बसने विजेच्या दोन खांबांना धडक दिली होती. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या. तसंच एक खांबही पडला होता. मद्यधुंद तरुणांनी बस चालवून वीजेच्या दोन खांबांना धडक दिल्याने जवळपास 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.
 
5) कोमामध्ये असताना दिला बाळाला जन्म, दोन महिन्यांनंतर झाली बाळाची भेट
अमेरिकेतेल्या विस्कॉन्सिनमध्ये केल्सी टाउनसेंड या महिलेला गरोदर असताना कोव्हिड-19 ची लागण झाली आणि बाळाला धोका नको म्हणून केल्सी कोमात असताना तिची डिलिव्हरी करण्यात आली. तब्बल 75 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या माय-लेकींची भेट झाली. न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
 
कोव्हिड-19 आजाराची लागण झालेल्या केल्सीची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवावं लागलं. आईची प्रकृती बघता पोटातल्या बाळाला धोका होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला.
 
ती कोमात असताना डॉक्टरांनी तिची प्रसुती केली. हा मेडिकली इन्ड्युस्ड कोमा होता. मेंदुला दुखापत होऊ नये, यासाठी रुग्णाला कोमा स्टेटमध्ये ठेवतात. यालाच मेडिकली इन्ड्युस्ड कोमा म्हणतात. डिलिव्हरी झाल्यानंतर केल्सी पुढे तब्बल 75 दिवस लाईफ सपोर्ट सिस्टिम आणि लंग्ज सपोर्ट सिस्टिमवर होती. अखेर केल्सी कोव्हिड-19 आजारातून बरी झाली आणि 75 दिवसांनंतर तिची आणि बाळाची भेट झाली.
 
केल्सी म्हणते, "मी बाळाला भेटले तेव्हा आम्ही इतके दिवस वेगळे होतो, हे जाणवलंच नाही. लुसीनं मला बघताक्षणी जणू मी कोण आहे, हे ओळखल्यासारखं मला मोठं स्माईल दिलं. ते बघून मला इतका आनंद झाला की मी शब्दात सांगू शकत नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती