पुतिनविरोधात बंड करणारे येवगेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू? विमान अपघात की घातपात?
फ्रँक गार्डनर, रॉबर्ट ग्रीनॉल आणि जारोस्लाव्ह लुकीव्ह
रशियातील वॅग्नर आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन प्रवासी यांच्या खासगी विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातादरम्यान विमानात स्वतः येवगेनी प्रिगोझिन हेसुद्धा प्रवास करत असल्याचं वृत्त आहे.
रशियाच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी विमानात 10 प्रवासी होते. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या यादीत येवगेनी प्रिगोझिन यांचंही नाव पाहायला मिळत आहे.
याबाबत बोलताना वॅग्नर ग्रुपशी संबंधित ग्रे झोन नामक टेलिग्राम ग्रुपने प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं. तसंच, प्रिगोझिन यांचं हे विमान रशियाने पाडलं, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, विमान अपघातावेळी प्रिगोझिन हे विमानात होते किंवा नाही याबाबत बीबीसी स्वतः पुष्टी करू शकलं नाही. मात्र, रशियाच्या कुझेनकिनो शहराच्या आकाशात एक विमान कोसळत असल्याचा एक व्हीडिओ बीबीसीच्या हाती लागला असून यासंदर्भात अधिक माहिती घेण्यात येत आहे.
तसंच, हे विमान नेमकं कसं पडलं, याबाबतही अनेक कयास लावण्यात येत असून यासंदर्भात ठोस माहिती मिळाल्यानंतर या बातमीत अपडेट करण्यात येईल.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील तेवेर शहरात विमानाला अपघात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानात त्यावेळी सात प्रवासी आणि चालक दलाचे तीन सदस्य होते. मारल्या गेलेल्या 8 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
प्रिगोझिन यांचा मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या ग्रे झोन टेलिग्राम चॅनेलने म्हटलं, "येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाविरुद्ध गद्दारी केली होती. त्यामुळे त्यांना मारण्यात आलं आहे."
रशियाच्या हवाई वाहतूक विभागाने मृतांच्या यादीत वॅग्नर ग्रुपचे सह-संस्थापक दमित्र अतकिन यांचंही नाव समाविष्ट केलेलं आहे.
सध्या अपघातस्थळी रशियाच्या सुरक्षारक्षकांनी नाकाबंदी केली असून अधिक तपास केला जात आहे.
येवगेनी प्रिगोझिन नावाचे अनेकजण..
सदर विमान अपघातात सकृतदर्शनी येवगेनी प्रिगोझिन यांचं नाव प्रवाशांच्या यादीत पाहायला मिळतं. पण या माहितीवर विसंबून त्यांच्या मृत्यूची पुष्टी करता येऊ शकणार नाही, असं येथील लष्करी तज्ज्ञांचं मत आहे.
ते म्हणतात, “रशियाच्या वाहतूक प्राधीकरणाने प्रिगोझिन यांचं नाव यादीत असल्याचं सांगितलं आहे. तसंच वॅग्नर ग्रुप संदर्भात टेलिग्राम ग्रुपनेही ते मारले गेल्याचं म्हटलं. पण अजूनही प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला, असं स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण त्यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.”
लंडन येथील लष्करी डावपेच तज्ज्ञ किअर गाईल्स यांच्या मते, प्रिगोझिन हे विमानात होते हे आपल्याला सांगितलं जात आहे. पण गेल्या काही दिवसांत अनेकांनी आपलं नाव बदलून येवगेनी प्रिगोझिन असं ठेवलेलं होतं. त्यांना असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी, तसंच त्यांच्या प्रवासाची कुणकुण प्रशासनाला होऊ नये यासाठी प्रिगोझिन यांना मदत म्हणून अनेकांनी आपलं नाव मुद्दामहून बदलून घेतलेलं आहे.
त्यामुळे प्रिगोझिन हेच त्या विमानातून प्रवास करत होते की इतर कुणी व्यक्ती होती, हे समजण्यासाठी त्यांच्या मृतदेहाची ओळख पटणे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे, यानंतर येवगेनी प्रिगोझिन हे आफ्रिकेत असल्याचा एखादा व्हीडिओ समोर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असंही गाईल्स यांनी म्हटलं.
कोण आहेत प्रिगोझिन?
येवगेनी प्रिगोझिन हे वॅग्नर ग्रुप या खासगी लष्करी कंपनीचे प्रमुख होते. जून महिन्यात वॅग्नर ग्रुपने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध केलेल्या बंडानंतर त्याची जोरदार चर्चा जगभरात झाली होती.
खरं तर, वॅग्नर ग्रुपची ओळख सर्वप्रथम 2014 साली झाली होती. त्यावेळी हा ग्रुप युक्रेनमध्ये रशियासमर्थक फुटीरतावाद्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या बाजूने लढाईत उतरला होता.
त्यावेळी हा ग्रुप एक गुप्त ग्रुप म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी तो आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामध्ये सक्रिय होता. त्यावेळी या ग्रुपमध्ये पाच हजार सैनिक होते. त्यातही सर्वाधिक रशियाच्या स्पेशल फोर्सचे सैनिक होते.
यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या युक्रेन-रशिया युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियाच्या बाजूने मैदानात उतरला होता.
सुरुवातीपासूनच रशिया वॅग्नर ग्रुपचे हजारो भाड्याचे सैनिक घेऊन युक्रेनविरुद्ध लढत होता. या सैनिकांच्या मदतीने रशियाने बखमुत शहरात आघाडीही घेतली होती. पण नंतरच्या काळात वॅग्नर ग्रुपने खुद्द व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधातच बंड करून त्यांना जोरदार धक्का दिला होता.
बंडानंतर सुरुवातीच्या टप्प्यात वॅग्नर ग्रुपच्या लष्कराने रशियातील एक शहर ताब्यातही घेतलं होतं. नंतर ते मॉस्कोच्या दिशेने चाल करून गेले होते. पण नंतर पुतीन आणि प्रिगोझिन यांच्यात चर्चा होऊन प्रिगोझिन यांनी आपलं बंड मागे घेतलं होतं.
यानंतर प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यात झालेल्या तडजोडीमध्ये प्रिगोझिन यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले होते. पुढे प्रिगोझिन हे सार्वजनिकरित्या जास्त दिसलेही नव्हते. ते आता आपलं बस्तान बेलारुसमध्ये बसवण्याच्या प्रयत्न करत असल्याची माहिती येत असतानाच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन पोहोचली आहे.
युक्रेन युद्धापूर्वी, रशियन अधिकाऱ्यांनी वॅगनर ग्रुपचं अस्तित्व नाकारलं होतं.
रशियाने जगाच्या इतर भागात आपला प्रभाव वाढवण्यासाठी या भाडोत्री सैनिकांचा वापर केल्याचं नाकारलं आहे. अधिकाऱ्यांनी नेहमीच सांगितलं की, रशियात अशा खासगी संघटनांवर बंदी आहे, आणि अशा संघटनेत सामील होणं हा दंडनीय गुन्हा आहे.
उद्योगपती असलेल्या येवगेनी प्रिगोझिन यांनीच या संघटनेची स्थापना केलीय अशा आशयाच्या बातम्या दिल्यामुळे अनेक पत्रकारांवर खटले भरण्यात आलेत.
2019 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सीरियातील रशियन सैनिकांबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी पुतिन म्हणाले होते की, काही प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज तिथं काम करतायत, रशियन सरकारचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.
2020 मध्ये पुतिन यांना लिबियातील रशियन सैनिकांबद्दल विचारलं असता, त्यावेळीही त्यांनी हेच उत्तर दिलं होतं.
पण रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. रशियन सैन्य युक्रेनमध्ये आपलं उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरलं तेव्हा येवगेनी प्रिगोझिन रशियन सैन्यावर टीका करू लागले. यावेळी त्यांनी वॅगनर ग्रुपशी असलेल्या संबंधांवर उघडपणे भाष्य केलं.
अखेर, 2022 च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनीच या संघटनेची स्थापना केल्याचं मान्य केलं.
युक्रेनचं सोलेदार शहर ताब्यात घेण्यात वॅगनरच्या सैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा दावा त्यांनी केला.
जगभरातून प्रतिक्रिया
दरम्यान, प्रिगोझिन यांच्या मृत्यूंच्या बातम्यांवर जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की प्रिगोझिन यांच्या मृत्यूंच्या बातम्यांवरून मला आश्चर्य वाटत नाही.
या मृत्यूला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन जबाबदार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर देताना बायडन म्हणाले, "रशियात खूपच कमी गोष्टी अशा होतात, ज्यांच्यामागे पुतिन यांचा हात नसतो."
तर, ब्रिटनची गुप्तचर संस्था MI6 चे रशिया विभागाने माजी प्रमुख ख्रिस्तोफर स्टील यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "प्रिगोझिन यांचा शेवट असा होणार, हे ठरलेलंच होतं. हा विमान अपघात एखाद्या उच्च पातळीवरच्या अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर झाला आहे. पुतिन यांनी याला मूक संमती दिलेली असू शकते. काही दिवसांपूर्वीच रशियात प्रिगोझिन यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं."
या प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.