रोजच्या दारू पिण्यानं आयुष्य होतंय कमी

गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (11:25 IST)
अॅलेक्स थेर्रीन
"संसारास उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू," हे वाक्य अनेकदा इकडे-तिकडे वाचायला-ऐकायला मिळतं. अनेकांचं याला प्रत्युत्तर तयार असतं - "पण आम्ही तर सिंगल. आणि थोडीच तर घेतोय, कसला काय संसार? बिनधास्त प्या."
 
सावधान! आता एका नव्या संशोधनातून असं कळतंय की दारू प्यायल्याने तुमचं आयुष्य कमी होत चाललंय.
 
केंब्रिज विद्यापीठाच्या एका मोठ्या अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे की, एका आठवड्याला 10 ते 15 ड्रिंक्स घेणाऱ्याचं आयुष्य एक-दोन वर्षांनी कमी होऊ शकतं. अल्कोहोल घेण्याचं प्रमाण जसं वाढेल तसं आयुष्य कमी होण्याचं प्रमाणही वाढेल.
 
आठवड्याला 18 पेक्षा जास्त ड्रिंक्स घेणारे आपल्या आयुष्याची मोलाची चार पाच वर्षं गमावत आहेत.
 
'द लॅन्सेट' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात 19 देशांमधल्या सहा लाख मद्यप्राशन करणाऱ्यांच्या अभ्यास करून काढण्यात आला आहे.
 
पण 'लाईट-लाईट' घेणारे, म्हणजेच कमी प्रमाणात दारू पिणारेही या धोक्यातून बाहेर नाहीत. कमी प्रमाणात दारू पिणं या संकल्पनेलाच धक्का बसल्याचं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
 
वैज्ञानिकांनी 19 देशातल्या अल्कोहोल घेणाऱ्यांचा यासाठी अभ्यास केला. त्यांच्या आरोग्य आणि दारू पिण्याच्या सवयी यांच्यातली त्यांनी तुलना केली. एखाद्या माणसानं वयाच्या 40व्या वर्षापासून पुढच्या उरलेल्या आयुष्यापर्यंत दारू घेतली तर त्याचं आयुष्य किती कमी होईल, याचा अभ्यास या वैज्ञानिकांनी केला.
 
आठवड्याला साडेबारा ग्लासहून अधिक दारू घेतल्यास मृत्यूचा धोका वाढतो. बिअरचे 5 ग्लास आणि वाईनचे 175 मिलीलीटरचे 5 ग्लास घेणाऱ्यांनाही हा धोका कायम असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. तसंच, यातलं कोणतंही पेय जास्त प्रमाणात प्यायल्यास हृदयविकाराचा धोका बळावण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी स्पष्ट केली आहे.
एका आठवड्यात अल्कोहोलचा समावेश असलेले साडेबारा ग्लास एखाद्यानं प्यायल्यानं पुढील धोका उद्भवू शकतो;
 
स्ट्रोकची शक्यता - 14 टक्के
मृत्यूस कारणीभूत ठरू शकतील असे तणावाशी निगडीत आजार - 24 टक्के
हृदयविकाराची शक्यता - 9 टक्के
शरीरातल्या मुख्य धमनीला धोका - 15 टक्के
पूर्वी दारू पिणं कमी धोकादायक असलेल्या हृदयविकाराशी जोडलं जायचं. पण, आता जास्त दारू पिण्यानं हृदयाशी संबंधित गंभीर विकार वाढीस लागले असल्याचंही वैज्ञानिक सांगतात.
 
तसंच, रेड वाईन घेतल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, असा एक मतप्रवाह पूर्वी कायम चर्चेत असायचा. मात्र, हा केवळ गवगवा आहे, असंच वैज्ञानिक सांगतात.
 
"दारू पिण्यानं कोणताही फायदा होत नाही हे या अभ्यासामुळे सिद्ध झालं आहे," असं मत या अभ्यासात सहभागी नसलेले, युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डमधले कार्डिओवॅस्क्युलर मेडीसिन विषयाचे प्रा. टीम चिको यांनी व्यक्त केलं.
 
पुरुष आणि महिलांनी एका आठवड्यात 14 ग्लासहून अधिक दारू घेऊ नये, याबाबतची नियमावली UKनं 2016मध्ये घोषित केली होती. या नियमावलीची पाठराखण करणारा हा अभ्यास आहे. इटली, पोर्तुगाल, स्पेन इथे या मर्यादा यापेक्षा 50 टक्क्यांहून अधिक आहेत. तर, अमेरिकेत ही मर्यादा पुरुषांसाठी यापेक्षा दुप्पट आहे.
 
याबाबत, या अभ्यासासाठी अर्थसहाय्य केलेल्या ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या आहारनियंत्रण तज्ज्ञ व्हिक्टोरिया टेलर सांगतात की, "UK मधले बहुतांश नागरिक घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक दारू पितात. अल्कोहोल पिण्यासाठीची मर्यादा ही अंतिम मर्यादा असून ते अंतिम लक्ष्य असू नये हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या मर्यादेपेक्षा कमीच अल्कोहोल घेतला पाहिजे."
 
या अभ्यासासाठी विशेष मेहनत घेतलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजच्या डॉ. अँजेला वुड सांगतात, "या अभ्यासातून एक गोष्ट पुढे आली की, तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल तर अत्यंत कमी प्रमाणात दारू घेणं हेच योग्य ठरेल. या कमी पिण्यानं आयुष्य कदाचित परिपूर्ण जगण्यासाठी मदत होईल आणि हृदयविकार होण्याचं प्रमाण कमी होईल."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती