लहानपणापासून साखळदंडानं बांधून ठेवलेल्या मुलांनी जन्मदात्यांना केलं माफ
सोमवार, 22 एप्रिल 2019 (14:00 IST)
वर्षानुवर्षं साखळदंडानं बांधून, उपासमार घडवणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांनी माफ केलं आहे. या पालकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
"आपला छळ झाला असला तरी आपलं अजूनही आई-बाबांवर प्रेम आहे," असं या मुलांनी कोर्टात सांगितलं. डेव्हिड आणि लुईस असं त्यांच्या पालकांचं नाव आहे.
या दोघांना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 13 मुलांना त्यांनी घरात डांबून ठेवल्याचं उघड झालं होतं. या मुलांमध्ये 2 वर्षांच्या मुलापासून 29 वर्षांच्या मुलापर्यंत मुलं होती. एका मुलीने घराबाहेर पडून ही माहिती पोलिसांना दिली होती. त्यांनंतर त्यांच्या पालकांना अटक झाली होती.
मुलांचं म्हणणं
यापैकी चार मुलांनी दिलेला जबाब ऐकल्यानंतर डेव्हिड आणि लुई यांना रडू कोसळलं. "मी माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम करतो," असं एका मुलानं यामध्ये लिहिलं होतं. "आम्हाला मोठं करण्यासाठी त्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले नसतीलही परंतु त्यांच्यामुळेच आज मी आहे."
आपल्याला लहानपणात भोगाव्या लागलेल्या यातनांबद्दल एका मुलीने भावना व्यक्त केल्या. "आमच्या सगळ्यांवर गुदरलेला प्रसंग शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही, असं ती म्हणाली. मला आणि भावंडांना साखळदंडाने बांधून ठेवणं, मारहाण केली जाणं याची आजही स्वप्नं मला पडतात."
"तो सगळा भूतकाळ होता आणि आता आपण वर्तमानात आहोत. मी आईबाबांवर प्रेम करते. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल मी त्यांना माफ करते," असंही ही मुलगी त्या जबाबात म्हणते.
मात्र सर्वच मुलांनी अशी माफीची भाषा वापरलेली नाही. त्यांची एक मुलगी म्हणाली, "माझ्या पालकांनी माझं आयुष्य हिरावून घेतलं. आता मी ते परत घेत आहे. मी लढवय्या आहे. मी कणखर आहे. आता मी माझं आयुष्य रॉकेटसारखं वेगानं पुढे नेणार आहे.
"माझ्या वडिलांनी माझ्या आईमध्ये परिवर्तन घडवून आणलेलं मी पाहिलं. माझ्यातही परिवर्तन त्यांनी घडवलं होतं, पण काय होतंय ते माझ्या लक्षात आलं होतं," एकीने म्हटलं आहे.
पालक काय म्हणतात?
मुलांची माफी मागत डेव्हिड आणि लुईसुद्धा न्यायालयात रडले. "मुलांना घरात शिकवणं आणि शिस्त यामागे चांगला हेतू होता," अशी भूमिका डेव्हिडने मांडली आहे. "मुलांना इजा व्हावी असा माझा कधीच हेतू नव्हता. मी माझ्या मुलांवर प्रेम करतो. आणि त्यांचंही माझ्यावर प्रेम असावं, असं मी मानतो."
आपल्या कृत्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो, असं त्यांच्या आई लुईने सांगितलं. "माझं मुलांवर खूपच प्रेम आहे. एके दिवशी मला त्यांना पाहाता येईल, त्यांना कवटाळता येईल आणि त्यांची माफी मागता येईल," अशी आशा तिने व्यक्त केली.
न्यायाधीश काय म्हणाले?
या दांपत्याने मुलांना 'स्वार्थी, क्रूर आणि अमानवी' पद्धतीने वागवल्याबद्दल न्यायाधीशांनी त्यांची खरडपट्टी काढली. तेव्हा या दांपत्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. न्यायाधीश बर्नार्ड श्वार्त्झ् म्हणाले, "ज्या मुलांना तुम्ही या जगात आणलं त्या मुलांशी तुम्हाला संवाद साधता येणार नाही. माझ्या मते तुम्ही अगदी सुरुवातीलाच गुन्हा कबूल केला, म्हणून तुम्हाला थोडी सौम्य शिक्षा देण्यात येत आहे."
कुपोषित मुलं अन् गलिच्छ घर
सुटका झालेल्या एका मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, या आई-वडिलांनी तिच्यासहीत 13 बहीण-भावांना बांधून ठेवलं होतं. "ती मुलगी 10 वर्षांची असावी आणि ती खूपच अशक्त वाटत होती," असं पोलिसांनी तेव्हा सांगितलं होतं.
काही मुलांना तर काळवंडलेल्या, घाणेरड्या बेडरूममध्ये खाटेला साखळी-कुलुपाने बांधून ठेवलं होतं. त्यांच्यापैकी काही मुलं 18 वर्षं आणि 29 वर्षांचे प्रौढ होते, हे पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.
"ते घर खूपच गलिच्छ होतं आणि सर्व मुलं कुपोषित होती," असं पोलिसांनी पुढं सांगितलं. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले.