काऊ हग डे: गायीला मिठी मारल्याने मन शांत होतं का

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (08:13 IST)
14 फेब्रुवारी हा दिवस 'काऊ हग डे' म्हणून साजरा करावा, असं आवाहन केंद्रीय पशू कल्याण मंडळाने नुकतेच केलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
 
शरीर आणि मन सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेलनेस ट्रेंडविषयी आपण ऐकत असतो.
 
'Goat Yoga' म्हणजे शेळ्यांच्या सानिध्यात योगासनं करणं किंवा 'Sound Bath' म्हणजे वेगवेगळ्या ध्वनींच्या सानिध्यात तासनतास घालवणं, हे अगदी अलीकडच्या काळातले वेलनेस ट्रेंड्स आहेत.
 
यात भर पडली आहे नेदरलँडमधून आलेल्या एका नव्या ट्रेंडची. डच भााषेत याला 'Koe knuffelen' म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो 'गायीला मिठी मारणे'. काही तास गायींच्या सानिध्यात घालवले की मन शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते, असा दावा केला जातो.
 
प्राण्यांच्या सानिध्यात मन प्रसन्न होतं, या मूळ गृहितकावर ही थेरपी आधारलेली आहे.
 
'Cow cuddling' थेरपी कशी करतात. तर सर्वात आधी भरपूर गायी असलेल्या शेताचा फेरफटका मारतात. त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या गायीसोबत पुढचे दोन ते तीस तास त्यांच्यासोबत निवांत घालवायचे.
 
गायींचं उबदार शरीर, संथ गतीने चालणारे हृदयाचे ठोके आणि माणसापेक्षा मोठा आकार या सर्वांमुळे त्यांना मिठीत घेणं किंवा त्यांच्या अंगावरून हात फिरवणं, यातून चित्त शांत होऊन आनंदाची अनुभूती होते.
 
इतकंच नाही तर गायीच्या पाठीवरून हात फिरवणं, तिच्यावर रेलून बसणं इतकंच नाही तर गायीचं चाटणं, हे सगळं उपचारांचाच भाग आहे.
 
गायींना कुरवाळल्याने शरीरात ऑक्सिटोसीन संप्रेरक (हार्मोन) स्रवतात. या संप्रेरकामुळे ताण कमी होऊन सकारात्मकता वाढते.
 
कुठल्याही पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवल्याने मन शांत होतं. मात्र, आकाराने मोठा प्राणी असेल तर त्याचा परिणामही जास्त असतो, असं मानलं जातं.
 
निवांत वेळ घालवण्यासाठी गायींना मिठी मारण्याची ही पद्धत आपल्यासाठी नवीन असली तरी नेदरलँडमधल्या ग्रामीण भागात जवळपास दशकभरापूर्वीच त्याचा उदय झाला आणि आता तर लोकांना निसर्गाच्या आणि ग्रामीण जीवनाच्या अधिक जवळ आणण्याच्या व्यापक चळवळीचा तो एक भाग बनला आहे.
 
बरं गायींना कुरवाळल्याने आपल्यालाच त्याचा लाभ होतो असं नाही. तर गायींनासुद्धा ते आवडत असतं. 2007 साली Applied Animal Behaviour Siience या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार गायींच्या मान आणि पाठीवर हाात फिरवल्याने त्याही रिलॅक्स होतात.
 
भारतीय संस्कृतीतसुद्धा गायी, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, ऊंट अशा पाळीव प्राण्यांना फार महत्त्व आहे. पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात मनावरचा ताण कमी होतो, याची प्रचिती आजही गावाखेड्यात गेल्यावर येते.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती