कोरोना लस : दोन डोस घेण्यात 28 दिवसांचं अंतर का ठेवतात?

गुरूवार, 18 मार्च 2021 (17:27 IST)
भारतात कोव्हिड-19चं लसीकरण सुरू होऊन आता दोन महिने उलटले आहेत. सरकारी आकडेवारी सांगते की आतापर्यंत साधारण 3 कोटी लोकांना लशीचा पहिला डोस दिला गेलाय.
 
खुद्द पंतप्रधान मोदींनीही 1 मार्चला, म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लशीचा पहिला डोस घेतला. पण एक प्रश्न अनेकांना पडला आहे, दुसरा डोस घेण्यासाठी 28 दिवस का थांबावं लागतं?
 
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी हे जाणून घेऊ या की लस संरक्षण कसं पुरवते?
 
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पहिल्या डोसनंतर सावकाशपणे अँटीबॉडी तयार होतात. हा शरीराचा प्राथमिक रोगप्रतिकार असतो.
 
पण दुसऱ्या डोसनंतर ज्याला बूस्टर डोस म्हणतात आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक वेगाने काम करते. यावेळी काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. लस काम करतेय याचंच हे लक्षण आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात फक्त प्रतिपिंड तयार होत नाहीत तर शरीर लिंफ नोड्स तसंच इतर अवयवांना प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करतं.
 
अनेक देशांमध्ये दोन डोसमधलं अंतर दोन ते तीन महिने इतकं ठेवलं गेलंय. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसमध्ये दीड महिन्याचं अंतर ठेवायला सांगितलं आहे.
हे अंतर कमी असावं की जास्त असावं याबद्दल अनेक देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
 
ब्रिटीश मेडिकल असोसिएशन म्हणतं की फायझरच्या लशीच्या दोन डोसमध्ये 6 आठवड्यांचं अंतर असलं पाहिजे, 12 आठवड्यांचं नाही.

फेब्रुवारीत महिन्यात लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात म्हटलं होतं की कोव्हिशील्ड लशीच्या, जिचं उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करत आहे, दोन डोसमध्ये जर 6 आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ती 55.1% परिणामकारक ठरते आणि जर 12 आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर लशीची परिणामकारकता 81.3% इतकी जास्त असल्याचं आढळून आलं.
 
पण भारतात हे अंतर 4 आठवडे ठेवलं गेलंय. याची कारणं काय? लशीच्या दोन डोसमध्ये किती अंतर आहे यावरून तिची परिणामकारकता किती बदलू शकते?
 
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते?
याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक पालन करणं सुरुच ठेवायला हवं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग वगैरे वगैरे.
 
लशीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो, पण तो अत्यंत सौम्य स्वरुपाचा असतो आणि त्यात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.
दुसरा डोस गरजेचा असतो कारण अनेक लशी बूस्टर डोस दिल्यानंतरच पूर्ण क्षमतेने काम करतात.
 
MMR (measles, mumps and rubella) लशीचं उदाहरण घ्या. गोवर, गालगुंड यांची लागण होऊ नये म्हणून लहान मुलांना ही लस दिली जाते. या लशीचे दोन डोस असतात.
 
आकडेवारी सांगते की फक्त पहिला डोस घेतलेल्या 40 टक्के मुलांना या तीन विषाणूंपासून संरक्षण मिळत नाही. पण दोन्ही डोस घेतलेल्या लहान मुलांमध्ये फक्त 4 टक्केच मुलांना हा धोका राहतो.
 
यावरून हेदेखील लक्षात येतं की कोणतीच लस शंभर टक्के परिणामकारक नसते. दुसरा डोस घेतल्यानंतर आपण लस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतलेल्या लोकांपेक्षा सुरक्षित असतो. त्यामुळे लशीचे डोस पूर्ण करणं महत्त्वाचं असतं.
 
भारतात कोणत्या लशी दिल्या जातायत?
भारताच्या औषध महानियंत्रकांनी सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशील्ड लस आणि भारत बायोटेक बनवत असलेली, संपूर्ण भारतीय बनावटीची 'कोव्हॅक्सिन' लस या दोन्ही लशींना मान्यता दिली आहे.
 
एका लशीचा पहिला आणि दुसऱ्या लशीचा दुसरा डोस घेऊन चालेल?
हा प्रश्न अनेकांना आहे. उदाहरणादाखल, कोव्हिशील्डचा पहिला आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला तर चालेल का?
 
तर भारतात तसं करता येणार नाही. एकाच लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे.
 
पण युकेमध्ये दोन वेगवेगळ्या लशींचे दोन डोस दिल्याने परिणामकारकतेवर आणि व्यक्तीला मिळणाऱ्या संरक्षणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण तूर्तास तरी एकाच लशीचे दोन्ही डोस घ्यायला सांगितलं गेलंय.
 
लस घेतल्यानंतर किती काळ संरक्षण मिळतं?
कोव्हिडच्या लशी काही महिन्यांपू्र्वच पूर्णत्वाला गेल्या आहेत, त्यामुळे आत्ताच या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. संशोधन सुरू आहे. सध्याची माहिती असं दाखवते की कोव्हिडचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडी त्यांना काही काळापर्यंत पुन्हा संसर्ग होण्यापासून संरक्षण देतात, पण हे किती काळ टिकतं याबद्दल ठोस माहिती हातात आलेली नाही.
 
कोव्हिडच्या लशी परिणामकारक आहेत का?
कोणतीच लस 100 टक्के परिणामकारक नसते आणि कोव्हिडच्या लशीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे लस घेऊनही प्रतिकारशक्ती तयार झाली नाही असं काही लोकांच्या बाबतीत घडू शकतं.
 
पण कोव्हिडच्या लशी बऱ्याच प्रमाणात परिणामकारक असल्याचं सांगितलं जातंय. कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला गेलाय.
 
मग लस घेण्याची गरज काय?
भारत सरकारने लसीकरण बंधनकारक केलेलं नाही. लस घेणं किंवा न घेणं हा तुमचा निर्णय आहे. लसीकरणासाठी परवानगी मिळालेल्या लशी संसर्गाचा धोका कमी करतात असं म्हणतात. तसंच तुमच्याद्वारे इतरांना संसर्ग होण्याचीही शक्यता कमी होते.
 
जाता जाता हे परत वाचा आणि लक्षात ठेवा, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतरही सर्वप्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही तुम्ही संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित झाला आहात असा समज करून घेऊ नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती