कोरोना लॉकडाऊन : शरीर बेचते हैं... पर जान प्यारी है- रेड लाइट एरियातली अगतिकता कॅमेऱ्यात टिपताना...

शनिवार, 13 जून 2020 (17:08 IST)
देवदत्त कशाळीकर
कोरोना व्हायरस हा शब्द आपल्या आयुष्यात आला आणि ठाण मांडून बसला. लॉकडाऊनमुळे अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. हाताला काम नसल्याने आणि जेवणाची भ्रांत असल्याने लाखो स्थलांतरित कामगारांनी घरचा रस्ता धरला.
 
परंतु सगळ्यांनाच हे पर्याय खुले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाणार हे लक्षात आल्यावर लॉकडाऊन लागू करण्यात आला. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातल्या रेड लाईट एरियात कोरोनामुळे 'धंदा' पारच बसला. छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी या भागाला भेट देत तिथल्या विदारकतेला कॅमेऱ्यात कैद केलं.
 
पत्रे लावून पुण्यातील रेड लाईट एरिया सील होताना पहिला होता. तिकडे कोरोना पॉझिटिव्ह केस आढळल्याचं मी तरी ऐकलं नव्हतं. मग एरिया सील का केला असावा? असा विचार मनात आला आणि लक्षात आलं की, शरीराचा शरीराशी थेट संबंध असतो इथे. अशावेळी कसलं आलंय सॅनिटायझर, मास्क आणि कसलं सोशल डिस्टन्सिंग? झर्रकन सर्व चित्र डोळ्यासमोरून तरळलं.
 
तब्बल सव्वा दोन महिने झाले तरीही पत्रे घालताना पलीकडे उभ्या असलेल्या 'त्या' बायका ,लहान पोरं आणि आणि त्यांचे चेहरे डोळ्यासमोरून जात नव्हते. पण प्रत्यक्ष बोलायला आणि विषय समजावून घ्यायला त्या ठिकाणी जायची हिंमत होत नव्हती. बरं तिथं जावं तर कोणाकडून तरी माहिती मिळेल अशा आशेवर मी होतो. पण तिथं गेल्यावर कुणी आपल्याला फोटो काढू देईल का हा प्रश्न होताच.
मग मित्राच्या मुलाबरोबर बोललो. त्याने तिकडच्या एका समाजसेवकाची गाठ घालून दिली, मग ठरलं आणि पोहोचलो. तिथे देवदासी महिला आणि वेश्यांसाठी तळमळीने अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रकाश यादव यांना भेटलो.
 
त्यांनी मला या ठिकाणची अख्खी ''सिस्टीम'' समजावून सांगितली. एकवेळ घरातले लोकही काळजी घेणार नाहीत, एवढी हा माणूस गेली अनेक वर्षं इथल्या महिलांची आणि त्यांच्या लहानग्यांची काळजी घेतोय.
 
हमीदभाई उर्फ हमीद सलमानी नावाचे गृहस्थ मला इथेच भेटलं. रेड लाईट एरिया मध्ये एचआयव्हीबाधित महिलांसाठी व टीबीची लक्षणं असणाऱ्या सर्व महिलांसाठी सर्वस्व पणाला लावून काम करणारा हा माणूस.
 
प्रिया नावाच्या एका समाजसेविकेने मला वस्तीमधील काही घरं दाखवली. पुढे दोन दिवसांनी सकाळीच मी रेड लाईट एरियामध्ये पोहोचलो. तिथं पाहिलं तर मुख्य रस्त्यावरच दोन बायका एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या. त्यांचा आविर्भाव पाहून पुन्हा विचार आला आता जाऊ की नको... पण मित्राचा मुलगा तेवढ्यात आला व आम्ही आत गेलो .
 
माणूस चालू लागला तरी दोन्ही खांदे भिंतीला घासतील असे अंधारे बोळ, त्यात असंख्य सिगारेटची थोटकं, मध्येच डोकावणारे उंदीर आणि त्यातून जाणाऱ्या पाईपलाईनमध्ये गडद अंधार. आतली घरं कशी असतील या कल्पनेने हादरलो होतो मी. माणसं शरीर सुखासाठी इथे येतो... या कल्पनेनेच शहारलो.
 
पाच सहा बायका असलेल्या एका घरात गेलो तर तिथली मालकीण पडद्याच्या आतून माझ्याशी बोलत होती. तिचे फक्त सॅंडल दिसत होते व हाताची बोटं.
तिला विचारलं, "आता पुढे कसं जगणार?" ती म्हणाली "मर्द भूखे नही रहेंगे, जिनको आना है यहा वो जरूर आयेंगे, पर कोरोना की वजह से हमने दो महिने से जादा वक्त हुआ, एक भी ग्राहक नहीं किया, सबने मिलके तय किया की गिऱ्हाईक नहीं करेंगे.
 
मी विचारलं, "और कितने दिन घर चलाओगे ऐसेही?" ती म्हणाली, "शरीर बेचते है... पर जान प्यारी है ! जिस दिन ये चालू होगा कस्टमर को नहलाके साफ-सुथरा करके अंदर लेंगेऔर हर बार खुदको साबुन के पानी से साफ करेंगे."
 
विचार केला तर तिचं बरोबर होतं, पण येणारी माणसं त्यावेळी बहुतांशी माणसं राहिलेली नसतात. जनावरं झालेली असतात. त्यांना कुणी डोक्यावरून आंघोळ कर म्हणालं तर ऐकतील का?
 
एवढी सोय प्रत्येकीकडे आहे का? इथे राहायची मारामार, मग कसली आंघोळ अन् काय... यासाठी लागणारा संयम, लागणाऱ्या जास्तीच्या वेळेचा पैसा तो पुरुष खर्च करेल का?अपेक्षेप्रमाणे याचं उत्तर कुणाकडेही नव्हतं. हमीदभाई व प्रियासारख्या माणसांना इथे पहारा देऊनही शेकडो घरात कोण काय करतंय हे समजणं शक्य नव्हतं.
 
शरीराचा शरीराशी जिथे थेट संबंध येतो तोही अर्धा तास, अशा सहा बाय चारच्या खोलीत कसले सोशल डिस्टन्सिंग आणि कसलं काय? कुठल्याही स्थितीत याला मार्ग काय हे समजत नव्हतं. 2000 च्या आसपास महिला आणि 250च्या आसपास लहान मुलं यांना आता या समस्येतून कोण सोडवू शकेल का, असा विचार मनात येऊन गेला. कारण शरीरसंबंध हाच व्यवसाय,तेच उदरनिर्वाहाचं साधन. त्यामुळे ही माणसं आता काय करतील हे एक कोडं होतं.
 
हळूहळू माझ्यावर विश्वास बसू लागला व त्यांनी फोटो घेऊ दिले, कुठेही त्यांची ओळख कळणार होणार नाही अशा पद्धतीने मी मास्क असताना काही फोटो घेतले.
 
सुगंधा म्हणाली (नाव बदललं आहे) माझं बाळ आता चार महिन्याचं झालंय अशा अवस्थेत मला खायला तेव्हाच मिळेल व चार पैसे गाठीला असतील जेव्हा माणसं यायला लागतील.
 
त्या खोलीत व्हेंटिलेशनचा कुठेही पत्ता नव्हता, हवा यायला एक इंच पण जागा नव्हती.सहा बाय चारच्या त्या खोलीत बिछाना हेच जग आणि बिछाना हेच सर्वस्व मानणारी 'ती' बोलताना अगतिक वाटत होती.
 
दुसऱ्या घरात एका खोलीत उद्याची काळजी न करता 'झक मारके मर्द तो आयेंगे' असं म्हणत तिथल्या मुलीने आपल्या बाळाशी खेळताना 'अब तो सब भगवान भरोसे' असंही म्हणताना डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसत होती.
 
मदत म्हणून मिळालेली दुधाची पिशवी त्या पिशवीवरचा रंग जाईपर्यंत चोखणारा वस्तीतील लहानगा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. काही झालं तरी शेवटी हाडामांसाची माणसंच ती...
 
राकट राक्षसी वृत्ती, ते वास आणि माणूस म्हणायची लाज वाटावी अशी भुकेली शरीरं आजवर या बायकांवर किती वेळा तुटून पडली असतील. पण तरीही उद्याची आशा बाळगत सर्व सहन करणाऱ्या या सर्वजणी आता मात्र, मुळापासून हादरल्या आहेत.आताशी त्यांचा संयम सुटू लागलाय.
 
कुणीही कितीही म्हणाले की त्यांचे पुनर्वसन करा त्यांना मुख्य प्रवाहात आणा, तर तो प्रवाह याना सामावून घेण्याएवढा विशाल आहे का? हा प्रवाह कोरोना दरम्यान खूप भरकटला आहे. कोरोनाने त्यांचं विश्व बेचिराख केलंय.
 
बहुतांशी अशिक्षित व घर खूप दूर राहिलेल्या या दोन हजारजणी व तिथली जवळपास अडीचशे मुले यांची फरफट आता कुठल्या सीमा पार करणार आहे हे कळत नव्हतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती