लशीत डुकराचे मांस नाही, नपुंसक होण्याची भीती नाही-डॉ. रमण गंगाखेडकर

बुधवार, 6 जानेवारी 2021 (13:24 IST)
कोरोनावरील लसीवर अनेक अफवा पसरत आहेत. सर्व अफवा आणि दावे निराधार आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. भारत सरकारने मंजुरी दिलेल्या कोरोनावरील दोन्ही लशींमध्ये डुकराच्या मांसाचे अंशही नाहीत आणि नपुंसक होण्याची शक्यता नाही असं आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.  
 
कोरोना लशीशी संबंधित सोशल मीडियावरील मेसेज सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
 
"लस मंजूर करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली गेली आहे हे नागरिकांना समजलं पाहिजे. सखोल विचार केल्यावरच त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही लस घेण्यास नकार देणाऱ्यांनी असा विचार करावा. केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यांचे नातेवाईक आणि मित्रही अडचणीत येऊ शकतात", असं त्यांनी सांगितलं.
 
"आतापर्यंत जगभरात सुमारे एक कोटी नागरिकांना लस देण्यात आल्या आहेत. पण यामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. काही जणांना त्रास झाला. पण या अडचणींवर मात करण्यात आली. पण लोकांनी अशा घटना लक्षात ठेवल्या तर त्यांना समस्या उद्भवतील असं ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती