इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक संघाला रिटेन अर्थात संघात कायम राहणाऱ्या संघांची यादी बीसीसीआयला सादर करायची आहे. आज त्याचा अंतिम दिवस आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नावावर 5 जेतेपदं आहेत.
प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार, कोणाला वगळणार, कोणाला लिलावात खुलं करणार हे बुधवार संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणं अपेक्षित आहे.
वैयक्तिक कारणास्तव सुरेश रैनाने दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र रैनाच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला बसला. चेन्नई बादफेरीत पोहोचू शकलं नाही.
अनुभवी स्पिनर हरभजन सिंग आता चेन्नईसाठी खेळताना दिसणार नाही. हरभजनने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. "चेन्नई सुपर किंग्ससंघाबरोबरचा माझा करार संपला आहे. या संघाकडून खेळणं हा सुरेख अनुभव होता. अनेक छान आठवणी माझ्याकडे आहेत. मला अनेक मित्र मिळाले. चेन्नई संघाबरोबरचा प्रवास मला नेहमीच स्मरणात राहील. चेन्नई संघव्यवस्थापन, कर्मचारी, चाहते यांचे मनापासून आभार मानतो", असं हरभजनने म्हटलं आहे.