अख्ख्या देशातली वीज गेली आणि 4.8 कोटी लोक अंधारात बुडाले

मोठ्या प्रमाणात वीजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये तब्बल 4.8 कोटी लोक अंधारात असल्याचं सांगितलं जात आहे.
 
दोन्ही देशांना वीज पुरवणाऱ्या एका प्रमुख कंपनीने आपण वीज पुरवठा करण्यास सक्षम नाही, असं घोषित केलं आहे.
 
अर्जेंटिनाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी सात वाजता वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे रेल्वेवाहतूक थांबली आणि ट्रॅफिक सिग्नलही बंद झाले.
 
अर्जेंटिनाचे लोक स्थानिक निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी तयारी करत होते, नेमका तेव्हाच वीजपुरवठा ठप्प झाला.
 
इलेक्ट्रिकल इंटरकनेक्शन प्रणालीमध्ये आलेल्या एका मोठ्या अडथळ्यामुळे अर्जेंटिना आणि उरुग्वेमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे, असे वीजपुरवठा कंपनी एडेसूरने स्पष्ट केले आहे.
 
पाच कोटी लोक अंधारात?
दोन्ही देशांची लोकसंख्या जवळपास चार कोटी 80 लाख इतकी आहे. अर्जेंटिनाच्या सांता फे, सेन लुइस, फोरमोसा, ला रियोखा, शूबूत, कोर्डोबा, मेंडोसा प्रांतातील वीज पूर्णपणे गेली आहे.
 
देश अंधारात बुडाला मात्र वीज जाण्याचं कारण समजलं नसल्याचं अर्जेंटिनाच्या ऊर्जा सचिवांनी स्पष्ट केलं. वीज गेल्यानंतर सात-आठ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत होईल, असं नागरिक सुरक्षा मंत्रालयाने सांगितलं होतं.
 
राजधानी ब्यूनॉस आयर्समधील काही भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचं वीजकंपनीने सांगितलं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीच्यानुसार राजधानीतील दोन विमानतळ जनरेटरच्या मदतीने सुरू आहेत.
 
उरुग्वेची ऊर्जा कंपनी यूटीईने काही किनारी प्रदेशांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाल्याचं ट्वीट केलं आहे.
 
अर्जेंटिनामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या एका कंपनीने आपल्या ग्राहकांना पाणी जपून वापरायला सांगितलं आहे. वीज गेल्यामुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती