पीएम नरेंद्र मोदी रिलीज तारीख ठरली: मोदींच्या बायोपिकमध्ये दाखवलेले प्रसंग खरंच घडले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी सिनेमा अखेर मतमोजणीनंतर म्हणजे 24 मे रोजी रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता.
 
ऐन निवडणुकीच्या हंगामात नरेंद्र मोदींवरचा सिनेमा का रिलीज करण्यात यावा, असा आक्षेप अनेकांनी या बायोपिकवर घेतला होता. त्यानंतर यावरची याचिका सुप्रीम कोर्टात गेली होती, जी कोर्टाने आधी फेटाळून लावली होती. त्यानंतर कोर्टानं याबाबतचा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलावला होता.
 
कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा पोहोचेल, असा सिनेमा मतदानादरम्यान प्रदर्शित होऊ नये, असं म्हणत निवडणूक आयोगाने या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणली होती. अखेर निर्मात्यांनी हा सिनेमा 24 मे, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर लगेचच प्रदर्शित करण्याची तयारी दर्शविली आहे. "प्रथमच एखादा सिनेमा फक्त 4 दिवस प्रमोट केला जाईल. पण आम्ही अपेक्षा करतो की आता तरी याचं रिलीज सुरळीत पार पडेल," असं निर्माते संदीप सिंह यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
नेमकं काय आहे या सिनेमात
"भारत दहशतवादाला घाबरणार नाही, दहशतवाद भारताला घाबरेल."
 
बर्फाच्छादित काश्मिरमध्ये सैनिकांच्या तुकडीसोबत एक व्यक्ती हातात तिरंगा घेऊन चालत आहे. या संवादाआधी काही कट्टरपंथी त्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात. सैनिक या हल्ल्याला प्रत्युत्तर देतात. यावेळी ती व्यक्ती गुडघ्यांवर कोसळते. मात्र हातातला तिरंगा खाली पडू देत नाही. एका चित्रपटाच्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधलं हे सगळ्यांत प्रभावी दृश्य आहे आणि हातात झेंडा घेतलेली व्यक्ती आहे नरेंद्र मोदी.
 
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच चित्रपटामुळे सध्या देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नियोजित तारीख 5 एप्रिल होती. मात्र काँग्रेस पक्षानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला. या चित्रपटाची निर्मिती भाजपनंच केली आहे आणि यातून भाजपचं राजकारण किती खालच्या स्तरावर गेलंय हे दिसून येतंय, असं काँग्रेसचं म्हणणं होतं.
 
अर्थात, चित्रपट निर्मितीशी भाजपचा काहीही संबंध नाहीये. मात्र नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारणार अभिनेता विवेक ओबेरॉय भाजप समर्थक आहेत आणि त्यांनी भाजपसाठी निवडणुकांमध्ये प्रचारही केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना विवेक ओबेरॉयनं "मोदी है तो मुमकिन है" ही घोषणा दिली होती. चित्रपट प्रमोशनाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती दिसून येते.
या चित्रपटामुळं आचारसंहितेचं उल्लंघन होतंय का, याची पडताळणी निवडणूक आयोगाकडून केली. या चित्रपटाच्या निर्मितीत आपले पैसे गुंतून पडल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. चित्रपटाचे लेखक आणि निर्माते संदीप सिंह यांनी एका इंटव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की ते एका 'महान व्यक्तिमत्त्वा'ची गोष्ट देशाला सांगू इच्छितात, जेणेकरून लोकांना त्यापासून प्रेरणा घेता येईल.
 
संदीप सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "राजकारण, राजकीय नेते किंवा कोणत्याही पक्षाशी मला काहीच देणंघेणं नाहीये. जर त्यांना (विरोधक) एका चित्रपटाची धास्ती वाटत असेल, तर देशात आणि राज्यात त्यांनी जे काम केलंय त्यावर त्यांचा विश्वास नाहीये का?"
 
चरित्रपट की प्रचारपट?
आता चित्रपटाचा फक्त ट्रेलरच प्रसिद्ध झाला आहे. मात्र त्यातील दृश्यांच्या आधारेच हा प्रचारकी पद्धतीचा चित्रपट आहे, अशी टीका करण्यात येत आहे.
 
हिंदुस्तान टाइम्सचे चित्रपट समीक्षक राजा सेन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी जी वेळ निवडलीये, त्यामुळे निर्मात्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. जानेवारीत चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि एप्रिलमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. निवडणुकीपूर्वी चित्रपट प्रसिद्ध करण्यामागे मोदींची प्रतिमा अधिक मोठी करण्याचा प्रयत्न दिसून येतो."
 
नरेंद्र मोदी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे, असं सांगितलं जातं. तिथून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. ते उजव्या विचारसरणीची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित होते. 13 वर्षं ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांची वैयक्तिक लोकप्रियता आणि कट्टर हिंदू राष्ट्रवादी नेत्याच्या प्रतिमेनं भाजपला सत्ता मिळवून दिली. अनेक टीकाकारांचा ट्रेलरमधल्या अजून एका दृश्यावर आक्षेप आहे. नरेंद्र मोदी 2002 साली झालेल्या गुजरात दंगलींनंतर व्यथित झाल्याचं या दृश्यात दाखवलं आहे. गुजरात दंगलीच्या वेळेस नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री होते. दंगल थांबविण्यासाठी योग्य ती पावलं न उचलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गुजरात दंगलीनंतरच अमेरिकेनं मोदींना व्हिसा द्यायलाही नकार दिला होता. अर्थात, मोदी नेहमीच हे सर्व आरोप फेटाळून लावतात.
काल्पनिक घटनाक्रम
पत्रकार आणि 2013 मध्ये मोदींचं 'नरेंद्र मोदीः द मॅन, द टाइम्स' हे चरित्र लिहिणारे नीलांजन मुखोपाध्याय सांगतात, "हा चित्रपट मोदींच्या आयुष्याचं काल्पनिक चित्रण आहे." ते सांगतात की नरेंद्र मोदी सैनिकांसोबत हातात तिरंगा घेऊन कट्टरपंथीयांना सामोरं जाण्याचं दृश्य म्हणजे पक्षाच्या सध्याच्या राजकीय भावनेला त्यांच्या भूतकाळाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
 
1992 मध्ये तत्कालीन पक्षाध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत काढलेल्या यात्रेत मोदी भाजप कार्यकर्ता या नात्यानं सहभागी झाले होते. या यात्रेचा समारोप काश्मिर खोऱ्यात तिरंगा फडकविण्यापासून झाली होती. या यात्रेतील सदस्यांवर एकदा गोळीबार झाला होता. मात्र हा गोळीबार पंजाबमधील शीख कट्टरपंथीयांनी केला होता.
 
ते सांगतात, की पाकिस्तान विरोधी भावना आणि काश्मिरसंबंधीचं कठोर धोरण मोदी तसंच भाजपच्या निवडणूक मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. अशावेळी पंतप्रधानांना काश्मिरमधील कट्टरपंथीयांविरोधातील लढाईत अग्रभागी दाखवण्यामुळे देशातील अनेक लोकांवर परिणाम होऊ शकतो. "वर्तमानाच्या संदर्भात दाखविण्याच्या उद्देशानं चित्रपटात मोदींचा भूतकाळ बदलला गेलाय."
 
या चित्रपटातील घटनाक्रम सत्य प्रसंगांवर आधारित आहे, मात्र प्रसंगांना काहीसं काल्पनिक रुप देण्यात आल्याचं निर्माता संदीप सिंह यांनी मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं, "प्रेक्षकांना परिस्थिती, दृश्य, चित्रपट आणि व्यक्तिरेखा कशा आवडतील हेही आम्हाला पहायचं होतं."
 
राष्ट्रवादी प्रतिमेचं उदात्तीकरण
हा चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध केला जाऊ नये, असं काँग्रेस आणि अन्य पक्षांनी म्हटलं आहे. या चित्रपटासोबतच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म इरोज नाऊवर 'मोदीः जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही १० एपिसोड्सची सीरीजही एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. वेब सिरीज आणि पीएम नरेंद्र मोदी या दोन कलाकृतींव्यतिरिक्त राजकारण आणि मतांच्या गणितावर प्रभाव टाकणारे अन्य चित्रपटही गेल्या काही काळात प्रदर्शित झाले आहेत.
 
मोदी यांच्या आधी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा चित्रपटही याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर प्रचंड टीकाही झाली होती. काही जणांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाल्याचं म्हटलं होतं. 'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात भारतानं 2016 मध्ये केलेल्या लष्करी मोहिमेचं नाट्यरुपांतर दाखविण्यात आलं होतं.
 
या देशभक्तीपर चित्रपटाचा हेतूही मोदींची राष्ट्रवादी नेता ही प्रतिमा ठळक करणं हाच होता. 'उरी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दीडच महिन्यात पुलवामा इथं CRPF च्या जवानांवर हल्ला झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानमधील बालाकोट इथं हवाई हल्ले केले.
 
भाजप समर्थकांमध्ये आता 'सर्जिकल स्ट्राइक' ही एक घोषणाच बनली आहे. गेल्या गुरूवारी आपल्या एका सभेत बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं, की आपल्या सरकारमध्येच जमीन, हवा आणि अंतराळात सर्जिकल स्ट्राइक करण्याचं धाडस होतं.
 
अर्थात, सर्वच चित्रपट निर्माते सत्ताधाऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहेत, असं नाही. 'माय नेम इज रागा' हा चित्रपट मोदी यांचे प्रमुख विरोधक आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कमबॅकची एक 'प्रेरणादायी कथा' म्हणून राहुल गांधी यांच्या चरित्राकडे या चित्रपटाचे निर्माते पाहत आहेत.
 
गेली काही दशकं भारतातील चित्रपट सृष्टीवर सेन्सॉर बोर्डाचं नियंत्रण होतं. सेन्सॉरच्या कात्रीमुळं राजकीय चित्रपटांच्या निर्मितीची संख्या अतिशय कमी होती. मात्र गेल्या काही महिन्यांत अचानकपणे राजकीय चित्रपटांच्या निर्मितीचं वाढलेलं प्रमाण हे 'अतिशय आश्चर्यकारक' आहे, असं सेन यांनी म्हटलं आहे.
 
'पीएम नरेंद्र मोदी' सारख्या चित्रपटांची शहरी प्रेक्षक भलेही खिल्ली उडवत असतील किंवा माध्यमावरही त्या चित्रपटांमधून टीका होत असेल, पण केवळ ट्विटरवरच मतदान केलं जात नाही, असा टोलाही सेन यांनी लगावला.
 
सेन सांगतात, "निम-शहरी भागांतील किंवा जिथं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी राहणारे लोक अतिशयोक्ती किंवा लार्जर दॅन लाइफ चित्रपट दृश्यांनी प्रभावित होऊ शकतात."
 
"जी गोष्ट वास्तवात नाही, ती चित्रपटात दाखवली जाऊ शकत नाही अशी आजही लोकांची धारणा आहे," असं सेन यांचं म्हणणं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती