बालाकोट: भारतीय वायुदलाने खरंच जैशच्या तळावरील हल्ल्याचा व्हीडिओ दाखवला का? – फॅक्ट चेक

शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (12:09 IST)
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी "बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा" म्हणून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1:24 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये लढाऊ विमानांचा हल्ला, रडारवरच्या आकृत्या, लक्ष्यावर केलेला बाँबहल्ला दिसत आहे.
 
अनेक प्रसिद्ध माध्यमांनी हा व्हिडिओ 'भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ' म्हणून बराच वेळ चालवला.
 
पत्रकार संजय ब्रागता यांनी "फेब्रुवारी महिन्यात CRPFच्या बसवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यावर #बालाकोटवर IAFने केलेल्या हवाईहल्ल्याचा हा व्हिडिओ" असं ट्वीट केलं आहे.
 
यानंतर बालाकोट हवाई हल्ल्याचं फुटेज म्हणून अनेक लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
 
मात्र हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून तो चुकीच्या संदर्भात वापरण्यात आल्याचं बीबीसीच्या संशोधनात स्पष्ट झालं आहे.
 
व्हीडिओचं सत्य काय?
 
भारतीय हवाई दलाच्या 87व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्ली येथे चीफ ऑफ द एअर स्टाफ, एअर चीफ मार्शल RKS भदुरिया यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
या कार्यक्रमात भदुरिया यांनी 12 मिनिटांचा एक दीर्घ व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये ऑपरेशन राबवणाऱ्या फील्डमध्ये हवाई दलाची क्षमता आणि मिळालेलं यश याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
 
12 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाने पुलावामानंतर बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली आहे, तसंच फायटर जेट्सनी लक्ष्यावर केलेला बॉम्बहल्लाही दाखवण्यात आला आहे, हे फुटेज बालाकोट हवाई हल्ल्याचं खरंखुरं फुटेज असल्याचं अनेक न्यूज चॅनेल्सकडून दाखवण्यात आलं आहे.
 
पत्रकार परिषदेत पत्रकारानं हा बालाकोट हवाई हल्ल्याचा खरा व्हिडिओ आहे का, असं विचारलं होतं. त्यावर एअर चीफ यांनी हा बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ नसल्याचं सांगितलं आहे.
यानंतर एअर चीफ भदुरिया यांना पाकिस्तानातल्या बालाकोट येथे घडवलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ पुरावा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, "सर्व तपशील, सॅटेलाइट चित्र देण्यात आलेले आहेत. यासंदर्भातला वेगळा व्हिडिओ नाही. हवाई दलातर्फे तपशिलांचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर, आम्ही आवश्यक ते सगळे तपशील देऊ."
 
भारतीय हवाई दलाचे बालाकोट ऑपरेशन
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवरून सैन्याची एक बस जात असताना, त्यावर पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे आत्मघातकी बाँबरने हल्ला केला. या हल्ल्यात 46 CRPF कर्मचारी जागीच ठार झाले.
 
26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा कथित कँप उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानने मात्र तिथे कुठलाही दहशतवादी कँप नसल्याचं म्हणत, सगळे बाँब एका निर्मनुष्य स्थळी पडले आणि फक्त काही झाडांचं नुकसान झालं, असा दावा केला होता.
 
MI17 हेलिकॉप्टरवर एअर चीफ म्हणाले
श्रीनगर पोस्ट बालाकोट येथे भारताचे MI 17 हेलिकॉप्टर पाडण्यात आले, या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली असता, एअर चीफ यांनी हेलिकॉप्टरवर चुकून हल्ला झाल्याचे स्पष्ट केले.
 
"कोर्ट इन्क्वायरी पूर्ण झाली असून, आमच्याच मिसाइलकडून हेलिकॉप्टर पाडल्याचे समोर आले आहे. आपलेच चॉपर पाडणे ही फारच मोठी चूक होती. या प्रकरणात प्राधिकरणाची कारवाई झाली आहे आणि दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे."
 
हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, ही लष्करी दुर्घटना मानली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रक्रियेनुसार सर्व लाभ दिले जातील. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती