अलिगढ खून प्रकरण: खरंच काही हजारांसाठी त्या चिमुकलीचा खून करण्यात आला का?

- विनीत खरे
दिल्लीहून जवळजवळ 100 किमी अंतरावर असलेल्या अलीगढ जिल्ह्यातील टप्पल गावात सध्या लोकांमध्ये प्रचंड राग आहे.
 
इथल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कसं कुणी एका अडीच वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून, तिच्या शरीराचे तुकडे करून, त्यावर अॅसिड टाकून तिची हत्या करू शकतं, तेसुद्धा काही हजार रुपयांच्या कथित उधारीसाठी.
 
पायल (नाव बदललं आहे) 30 मे पासून बेपत्ता होती. नातेवाईकांच्या गराड्यात बसलेली तिची आई सांगते, "ती सकाळी घराच्या बाहेर खेळायला गेली आणि थोड्याच वेळात ती बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं."
 
ती अंगणात बसली होती. तिच्या डोक्यावर पदर होता आणि चेहरा भावशून्य... डोळ्यातले अश्रू वाळले होते.
 
कुटुंबीय, मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी टप्पल आणि आसपासच्या परिसरात पायलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा शोध लागला नाही.
 
पोलिसांनी तक्रार दाखल केली मात्र पायलचा शोध थांबला नाही.
 
एका घरातली चिमुकली हरवली आहे याची कल्पना आतापर्यंत गावातील सर्वांनाचा आतापर्यंत आली होती.
 
कुत्री तिचा मृतदेह ओढत होती
30 मे रोजी मुलगी बेपत्ता झाली. 2 जूनला सकाळी सात वाजता छाया (नाव बदललं आहे) लोकांच्या घरातला कचरा उचलून डोक्यावर ठेवून निघाली होती.
 
जिथे कचरा साठला होता, तिथे तीन कुत्री एका लहान बालकाचा मृतदेह ओढत घेऊन जाताना दिसले. हा कचऱ्याचा ढीग पायलच्या घरापासून फक्त 200 मीटर अंतरावर होता.
 
टप्प्लमधील वाल्मिकी वस्तीत राहणाऱ्या छाया सांगतात, "हा कोणत्यातरी बालकाचा मृतदेह आहे, असं म्हणत मी जोरात ओरडले आणि अख्खं गाव गोळा झालं."
 
ज्या-ज्या व्यक्तींनी पायलला त्या अवस्थेत पाहिलं, त्यांचे डोळे पाणावले. पायलच्या एक काकू म्हणाल्या, "तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. तिच्या शरीरावर अॅसिड टाकलं होतं. मी तिच्याकडे पाहू शकले नाही."
 
"तिला ओळखणं शक्य नव्हतं. तिने पिवळ्या रंगाची अंडरवेअर घातली होती. आम्ही त्यावरून तिला ओळखलं."
 
बलात्काराला दुजोरा नाही
पायलची काकू आणि आजीला शेजारच्या महिला आणि नातेवाईक धीर देण्याचा प्रयत्न करत होते. खाली जमिनीवर बसलेली पायलची आजी भिंतीवर वारंवार डोकं आपटत होती. ती धाय मोकलून रडत होती आणि रडत-रडतच ती बोलत होती.
 
"ती खूप खोडकर होती. ती हळू आवाजात बोलायची, पण खूप बोलायची. 'बाबा, मला चहा द्या. बिस्किटं द्या,' असं बोलायची. तिच्या येण्याची आम्ही पाच वर्षं वाट पाहिली होती."
 
वर्षा (नाव बदललं आहे) आणि मुकेश (नाव बदललं आहे) यांनी पायलच्या जन्मासाठी बरेच वर्षं प्रार्थना आणि उपचार केले होते. पायलच्या जन्मानंतर काही महिन्यातच वर्षा यांचा गर्भपात झाला.
 
पायलच्या घराखाली एक मांडव टाकला होता. तिथे उपस्थित लोकांमध्ये संताप होता... 'अडीच वर्षांच्या मुलीबरोबर असं कुणी कसं करू शकतं?'
 
पायलचे आजोबा दोषींना फासावर लटकवण्याची मागणी करत आहे. टप्पल गावात आम्ही ज्या लोकांना भेटलो, ते धक्क्यातच होते.
 
पीडित मुलीचं नाव हॅशटॅग वापरून सार्वजनिक केल्यामुळे अलीगढ पोलीस वादात सापडले आहेत. "अजून बलात्कार झाल्याचं सिद्ध झालेलं नाही," असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
कर्जाचं प्रकरण
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अलीगढचे वरीष्ठ पोलीस अधिकारी मणिलाला पाटीदार यांच्या मते या प्रकरणामागे पैसे परत करण्यावरून वाद असण्याची शक्यता आहे.
 
पोलिसांनी जाहिद आणि अस्लम या दोन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याचा पोलिसांचा विचार आहे.
 
माणिलाल पाटीदार पुढे म्हणाले, "लोकांच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यासाठी आम्ही कागदपत्रं गोळा करण्यास सुरुवात केली आहे आणि आम्ही लवकरच प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवू."
 
अटक झालेले दोन्ही आरोपी पायलच्या घराजवळ राहत असत. पायलचा मृतदेह ज्या कचऱ्याच्या ढीगात सापडला तो या आरोपींच्या घराच्या अगदी समोर आहे.
 
जेव्हा आम्ही जाहिदच्या घरी पोहोचलो तेव्हा घर रिकामं होतं. दरवाज्याला कुलूप लागलं होतं. जाहिदच्या घरासमोर कपडे जमिनीवर पसरले होते. स्वयंपाकघरात कणिक सांडली होती. असलमचं घरही बंद होतं.
 
शेजाऱ्यांच्या मते जाहिदचं वय 28-29 आहे आणि त्याला दोन तीन मुलं आहे. असलमचं वय 40 आहे आणि त्याचा चार मुलं आहेत.
 
परिसरात तणाव
जाटबहुल असलेल्या या गावात मुस्लिमांची संख्या कमी आहे.
 
जाहिदच्या घरासमोर राहणाऱ्या रहीस खान टप्पलच्या बाहेर काम करतात आणि ईदसाठी ते घरी आले होते. ते सांगतात, "हिंदू असो वा मुस्लीम, कुणाबरोबरही असं व्हायला नको."
 
काही लोकांना भीती वाटतेय की आता याचा सूड घेतला जाईल, म्हणून इथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे.
 
आरोपींनी दिली होती धमकी
या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी पायलच्या आजोबांनी जाहिदला दिलेलं कर्ज या घटनेच्या मुळाशी असल्याचा दावा केला जात आहे.
 
कुटुंबातील एक निकटवर्तीय सांगतात, "जवळजवळ पाच वर्षांपूर्वी पायलच्या आजोबांनी जाहिदला पाच हजार रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र त्याने पूर्ण पैसे दिले नाहीत.
 
पायलच्या कुटुंबात तिच्या आजोबांशिवाय कुणालाच या व्यवहाराची कल्पना नव्हती.
 
"पैसे मागितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. जाहिदच्या घरासमोर मुलीचा मृतदेह मिळाल्यावर तो पळायला लागला." ते पुढे सांगत होते.
 
घराबाहेर बसलेले पायलचे आजोबा या कर्जाचं नाव काढल्यावर वैतागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती