एक बाटली दारू पिणं किती सिगारेट ओढण्याइतकं धोकादायक आहे?

एका आठवड्यात 750 मिलीलीटर दारू प्यायल्याने कॅन्सरचा धोका तेवढाच वाढतो जेवढा एका आठवड्यात महिलांनी 10 सिगारेट ओढल्या आणि पुरुषांनी 5 सिगारेट ओढल्या तर वाढतो, असं एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
हे संशोधन म्हणजे कमी प्रमाणात दारू पिणाऱ्या व्यक्तींना आपल्या आरोग्याविषयी जागरूक करण्याचा चांगला मार्ग आहे, असं ब्रिटनच्या संशोधकांना वाटतं.
 
अर्थात तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दारू पिण्याच्या तुलनेत सिगारेट ओढणं जास्त धोकादायक ठरू शकतं आणि त्याने कॅन्सरचा धोकादेखील वाढतो.
 
आणि हा धोका टाळायचा असेल तर सिगारेट ओढणं पूर्णपणे सोडणं, हा एकमेव पर्याय आहे.
 
एका सरकारी निर्देशकानुसार महिला आणि पुरुष दोघांनीही एका आठवड्यात 14 युनिटपेक्षा जास्त दारू प्यायला नको. 14 युनिट म्हणजे बीअरचे 6 पाईन्ट आणि वाईनचे 6 ग्लास.
 
पण या संशोधनात असं म्हटलं आहे की आरोग्याच्या दृष्टीने दारू पिण्याचं कोणतंही सुरक्षित प्रमाण नाही. कमी पिणाऱ्यांना पण कॅन्सरचा धोका असतो.
 
'BMC पब्लिक हेल्थ' या आरोग्यविषयक मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात संशोधनकर्त्यांनी सांगितलं की सिगारेट न पिणाऱ्या 1000 महिला आणि पुरुष जर आठवड्याला एक बाटली दारू पीत असतील तर त्यातल्या 10 पुरुषांना आणि 14 महिलांना कॅन्सरचा धोका वाढतो.
 
दारू प्यायल्याने महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर तर पुरुषांमध्ये जठर आणि यकृताचा कॅन्सर होण्याच्या शक्यता वाढतात.
 
या संशोधनात कॅन्सर रिसर्च UKचा डेटा वापरण्यात आला आहे. तसंच या टीमने तंबाखू आणि दारूने कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या डेटाचा वापर केला आहे.
 
ब्रेस्ट कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ. मिनोक शोमेकर यांचं म्हणणं आहे की हे संशोधन अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आणतं. पण तरीही यातल्या अनेक बाबी स्पष्ट नाहीत.
 
'द इंस्टिस्ट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च'मध्ये कार्यरत असणाऱ्या शोमेकर म्हणतात, "कॅन्सरचा धोका कशामुळे वाढतो हे समजणं अवघड आहे. यात अनेक बारीकसारीक गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो. आपण हे लक्षात ठेवायला हवं की हे नवं संशोधन अनेक गृहितकांवर आधारित आहे."
 
दारू आणि सिगारेट प्यायल्याने शरीरावर होणारे परिणाम पूर्णपणे रोखणं अवघड आहे, असंही ते पुढे म्हणतात.
 
या अभ्यासात फक्त कॅन्सरचा विचार केला आहे. सिगरेट तसंच दारू प्यायल्याने इतर रोगांचा धोका वाढतो की नाही याचा काही उल्लेख नाही आहे. सिगरेट ओढणाऱ्या पुरुषांमध्ये हृदय तसंच फुफ्फुसाचे रोग जास्त होतात.
 
या अभ्यासात 2004च्या डेटाचा वापर केला गेला आहे तसंच कॅन्सरच्या इतर कारणांचा यात विचार केलेला नाही.
 
वय, आनुवांशिकता, आहार आणि जीवनशैली या गोष्टीही कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.
 
सिगारेट ओढणं जास्त हानिकारक
नॉटिंहम विद्यापीठाचे प्रोफेसर जॉन ब्रिटन म्हणतात, "मला नाही वाटत की लोक धोक्याचा विचार करून सिगारेट किंवा दारूमधून काही निवडतात.
 
प्रोफेसर ब्रिटन युके सेंटर फॉर टोबॅको अॅण्ड अल्कोहोल स्टडीजचे संचालक आहेत.
 
ते म्हणतात, " या संशोधनानुसार सिगरेट पिण्यापेक्षा दारू पिणं कॅन्सरच्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे, पण इतर रोगांचा विचार केला तर सिगरेट दारूपेक्षा जास्त धोकादायक आहे."
 
"जर सिगारेट पिणाऱ्यांना आपल्या आरोग्याची खरंच चिंता असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी सिगरेट पिणं सोडून द्यावं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती