गणेशोत्सव 2022 : असे मंडळ जे 10 दिवसांत शिवाजी महाराजांवरील नाट्याचे 100 हून अधिक प्रयोग करतात
गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (14:24 IST)
- मानसी देशपांडे
पुण्यात प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे असं म्हटलं जातं आणि गणपती मंडळ देखील याला अपवाद नाहीत. गणपती मंडळच काय पण या मंडळांच्या देखाव्यांना देखील एक परंपरा आहे, इतिहास आहे.
जसं पुणे बदलत गेलं तसे देखावे देखील बदलले. त्यामुळे गणपती मंडळाचे देखावे हा केवळ पाहण्याच नाही तर विचार करण्याचा अभ्यास करण्याचा विषय आहे, असं देखील तुम्हाला एखादा पुणेकर सांगू शकतो.
गणेशोत्सवासोबत प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपातल्या आठवणी जोडलेल्या असतात. हा उत्सव संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.
125 वर्षं उलटल्यावरही पुण्यातल्या गणेशोत्सवाबदद्लची उत्सुकता, कुतूहल आणि अप्रूप कायम आहे. गणेशोत्सवादरम्यान गणपतींचे देखावे बघणे हा भाग ओघाने आलाच. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक येतात.
काही भव्य सजावटीचा सेट उभारतात. काही पुरातन मंदिरं किंवा ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती तयार करुन त्यात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करतात.
तर काही गणेश मंडळं हे हलते देखावे तयार करतात. त्यामध्ये विविध हलणाऱ्या मूर्ती असतात आणि व्हॉइस ओव्हरवरुन एखादी गोष्ट सांगतली जाते. त्याच्या अनुषंगाने मूर्तींच्या हालचाली असतात.
काही गणेश मंडळं तर या पुढे जाऊन जिवंत देखावे सादर करतात. जिवंत किंवा सजीव देखावा म्हणजे 15-20 मिनिटांचं एक छोटंसं नाटक कलाकारांकडून सादर केलं जातं. असे जिवंत देखावे पुण्यातल्या गणेशोत्सवाचा आता अविभाज्य भाग बनले आहेत.
1893 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला.
यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. काळासोबत गणेश मंडळांकडून तयार केल्या जाणाऱ्या देखाव्यांच्या पद्धतींमध्येसुद्धा विविधता आणि नाविन्य आलंय.
तेव्हापासून ते आतापर्यंत सार्वजनिक गणपती देखाव्यांच्या निरनिराळ्या पद्धती तयार झाल्या आहेत. 129 वर्षांत हे बदल कसे होत गेले यावर आपण एक नजर टाकणार आहोत.
स्वातंत्र्याआधीचा गणेशोत्सव
1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. तेव्हा गणपती मंडळांतर्फे मेळे भरवले जात असत. मेळे हे सुरुवातीपासूनच गणेशोत्सवाचं प्रमुख अंग होतं.
स्वातंत्र्य लढ्यासाठी जनजागृती, प्रबोधन, सामाजिक संघटन अशा विविध विषयांवर काव्य लिहिली जायची आणि त्याला चाली लावून ते उत्सवात सादर केले जायचे. अशा काव्यात्मक पदांनी राष्ट्रीय भावनेच्या मराठी कवितांमध्ये फर घातली. शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याच्या इतिहासावरुनही मेळे आणि पोवाडे लिहिले गेले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाबद्दल आनंद सराफ यांनी अधिक माहिती दिली. आनंद सराफ हे पुण्यातील गणेशोत्सवाचे अभ्यासक आहेत.
"गणेशोत्सवाच्या परिवर्तनाची वाटचालीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशी ढोबळमानाने विभागणी होऊ शकते. तर स्वातंत्र्यपूर्व काळात ही स्वातंत्र्याची चळवळ होती. चळवळ म्हटल्यानंतर लोकजागृती आली. परकीय सत्तेविरोधात बंड करणं, त्याच्याविरोधात आंदोलन करुन परकीयांचं आक्रमण मोडीत काढणं हे सगळे विचार स्वातंत्र्यपूर्व काळात होते."
सराफ पुढे सांगतात, "लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व जनतेला, जात-पात धर्म विसरुन एकत्र आणू शकेल असा उत्सव कोणता असा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांच्या समोर गणेशोत्सवाचा प्राधान्याने पर्याय समोर आला. त्याच्या आधी पुण्यातली मंडळी ग्वाल्हेरला गेली होती."
"तिथे मराठी संस्थानाचा गणेशोत्सव त्यांनी पाहिला होता. सर्व जनता एका दिशेने एका विचाराने गणपती बाप्पाचा जयघोष करत जातेय. हाच जनप्रवाह स्वातंत्र्याचा चळवळीकडे वळवता येईल का याचा विचार लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी, घोटावडेकर, खासगीवाले, तरवडे यांनी एकत्र येऊन केला," अशी माहिती सराफ देतात.
ही स्वातंत्र्यपूर्व काळातली चळवळ झाली. गणेशोत्सवातील धार्मिक बाबींना जनजागृती करायची म्हटल्यानंतर स्थानिक भाषेत जी कवणं तयार झाली, त्यालाच नृत्य नाट्य संगीत अभिनय याची जी जोड मिळाली त्यातून मेळ्यांची निर्मिती झाली.
या मेळ्यांमध्ये कलाकारांना भरपूर वाव मिळाला. या कलेचा वापर गणेशोत्सव मंडळांमार्फत जनजागृती आणि परकीय शक्तींविरोधात जनमानस तयार करण्यासाठी समाजधुरिणींनी करुन घेतला.
स्वातंत्र्यपूर्व काळात जे देखावे केले जात होते त्यात प्रामुख्याने मेळे आणि ऐतिहासिक प्रसंगांचा समावेश असायचा. ऐतिहासिक प्रसंग ज्यामध्ये शौर्य पराक्रम आहेत असे प्रसंग दाखवून लोकांना चेतना देण्याचं काम गणेशोत्सवात होत होतं. स्थिर देखावे पण मांडले जायचे.
"आता या देखाव्यांमध्ये काळनुरुप बदल होणं आवश्यक होतं. मग देखाव्यांमध्ये राजे आणि चाकरमानी त्यांचा दिवाणखाना, कुंड्या आणि डेकोरेशन असं साधारणपणे देखाव्यांचं स्वरूप होतं. विशेषतः तत्कालिन प्रसंग, युद्धकालिन, पौराणिक प्रसंग ज्या देखाव्यांमध्ये केला जात होता," असं आनंद सराफ यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यानंतरचा गणेशोत्सव
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवात देखाव्यातून मांडल्या जाणाऱ्या विषयांमध्ये काही बदल झाल्याचं अभ्यासक सांगतात. स्वराज्य मिळालं होतं. सुराज्य आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
अभ्यासक सांगतात की, या काळात हळूहळू सामाजिक प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, तत्कालिन युद्ध यांसारखे मुद्दे देखाव्यांमधून मांडायला सुरुवात झाली.
"हे जे काही देखावे मांडायला सुरुवात झाली त्यात गणेशाची रूपं सुद्धा बदलत गेली. युद्धकाळात गणेशाला भारतीय सैनिकाचा वेष चढवला गेला. नेहरुंच्या वेशातल्या गणेशमूर्तीही आधी देखाव्यात मांडल्या गेलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी उदात्त असे काही प्रसंग घडले ते सुद्धा देखाव्यांमधून मांडले गेले.
विशेषतः कसबा, सोमवार पेठ, रास्ता पेठ या भागांत जाज्वल्य देखावे मांडण्याची परंपरा होती. हे देखावे मात्र स्थिर देखावे होते. कालांतराने या स्थिर देखाव्यांमध्ये चलत चित्राची मांडणी करुन, त्याला हलतं-चालतं स्वरूप देऊन त्यात काही जिवंतपणा आणता येईल का हा विचार होत गेला," असं आनंद सराफ यांनी सांगितलं.
हलते आणि सजीव देखाव्यांची सुरुवात
अभ्यासक सांगतात की, साधारणपणे ऐंशीच्या दशकात चलत देखाव्यांची निर्मिती होत गेली. तंत्रज्ञानातल्या बदलांसोबतच गणेशोत्सवातल्या देखाव्याची पद्धतही बदलली. या विषयी या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांकडून आम्ही अधिक जाणून घेतलं.
विलास मोकाटे हे गेली 36 वर्षं विविध मंडळांसाठी हलते देखावे तयार करण्याचं काम करतात. पुण्यातल्या टिळक रोडवरच्या हत्ती गणपतीसाठी मंडळासाठी 1986 पासून हलता देखावा तयार करण्याचं काम ते आणि त्यांचे सहकारी करतात.
कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सवावर बंधनं होती. यावर्षी कोणतीही निर्बंध नसल्याने विलास मोकाटे परत याच कामात गुंतले आहेत. हत्ती गणपती मंडळाचा हलता देखाव्याच्या सेटअपचं ते काम करत असतानाच आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.
हलत्या किंवा चलत देखाव्यांमधल्या आत्ताच्या मूर्ती हा फायबरच्या असतात. मोकाटे यांनी सांगतिलं की ही पद्धत सुरू झाली तेव्हा मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असायच्या.
"पूर्वी आम्ही दोरीच्या साहाय्याने देखाव्यामधली वेगवेगळी पात्र हलवायचो. आता तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे. आता फायबरच्या मूर्तीमध्ये मोटर बसवली जाते आणि या मोटरच्या मदतीने मूर्तींच्या हालचाली होतात. पूर्वी एकाच मोठ्या मूर्तीला मूव्हमेंट देण्याची पद्धत होती. पण आता हा ट्रेंड बदलला आहे. छोट्या मूर्ती बनवून त्यांना मूव्हमेंट देऊन ती गोष्ट किंवा प्रसंग सादर केला जातो," असं हलते देखाव्यांच्या मूर्ती तयार करणारे कलाकार विलास मोकाटे यांनी सांगतिलं.
हलत्या देखाव्यांमध्येही काळानुरूप बदल होत गेले. त्यामध्ये अधिक वेगळेपण, जिवंतपणा कसा आणता येईल याचा विचार सातत्याने केला गेला.
"स्वातंत्र्यपूर्व काळात देखावे हे मेळ्यांच्या स्वरूपात होते. मग स्थिर मूर्ती हा प्रकार होता. गणपतीच्या मूर्ती भोवती ऐतिहासिक, पौराणिक प्रसंग स्थिर मूर्तींच्या स्वरूपात अनेक वर्षं दाखवण्यात आले. चलत चित्रांचा जेव्हा जमाना आला आणि मूर्तींना जेव्हा हलतं चालतं स्वरूप दिलं गेलं, तेव्हा देखाव्यांना बोलतं करता येईल का, या देखाव्यांमध्ये अधिक तांत्रिक हालचाली वाढवता येतील का, याचा विचार झाला.
"हलते देखावे हे अधिक बोलके झाले त्यात राहूल सोलापूरकर, ऋषीकेश परांजपे, नंदू पोळ या लोकांचं योगदान मोठं आहे. हे देखावे बोलके करायचे म्हटल्यावर त्या त्या मूर्तीमागे असलेल्या व्यक्तिरेखेचा आवाज, त्याचं लेखन इतर साऊंड इफेक्ट असं मिळून देखावे आधी हलते-चालते झाले. मग ते बोलके झाले," असं आनंद सराफ यांनी सांगितलं.
गणेशोत्सवानंतर हे देखावे दुसऱ्या मंडळांना स्वस्त दराने विकलेही जातात.
सजीव देखावे कसे सुरू झाले?
हलत्या देखाव्यांनतर काही गणेश मंडळांनी स्वातंत्र्यआधी असलेल्या मेळ्यांच्या पद्धतीचं एक वेगळं रूप देखाव्यांच्या स्वरूपात पुढे आणलं. ते म्हणजे जिवंत किंवा सजीव देखावे.
आपल्यातलेच काही कलाकार, काही मुलं यांच्याकडून जर आपण जिवंत नाट्य करुन घेतलं तर ते नाटक बजेटमध्ये परवडेल आणि कलाकारांना वाव मिळेल यातून जिवंत नाट्य हा विचार पुढे आला.
"साधारण 1995 नंतर हा विचार प्राधान्याने पुढे आला. त्यामध्ये नाट्य क्षेत्रात काम करणारी मंडळी जसं की दादा पासलकर, त्यांचे सहकारी , वृंदा साठे आणि इतर कलाकारांची नावं घेता येतील. रंगभुमीचा अनुभव असलेले ज्येष्ठ कलाकार, उदयोन्मुख कलाकार यांचा आणि मंडळाचं बजेट वगरे गोष्टींचा मेळ बसवून तीन चार पात्रांचं नाटक बसवले गेले," असं आनंद सराफ यांनी सांगितलं.
साधारणपणे 15-20 मिनिटांचं नाटक आणि बॅकग्राऊंडमध्ये रेकॉर्डिॅगवर वाजणारे संवाद आंणि त्यावर अभिनय करणारे कलाकार असं या जिवंत देखाव्यांचं स्वरूप आहे.
ऐतिहासिक घटना, पर्यावरण, राजकारण, किंवा वाहतूक व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, खासगी शिक्षण, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, वृद्धांचे प्रश्न अशा अनेक गोष्टी या देखाव्यांमधून मांडल्या जातात.
काळासोबतच जिवंत देखाव्यांचे सेट अधिक भव्य आणि आकर्षक करण्याकडेही गणेश मंडळांचा रोख वाढला.
कसबा पेठेतल्या साईनाथ गणपती मंडळ हे 2004 सालापासून जिवंत देखावे सादर करत आहे. पियुष शाह हे साईनाथ गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला.
"नाटक या माध्यमाचं रसायनच असं आहे की, जो मेसेज द्यायचा आहे तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो. त्यात जिवंतपणा असतो. आम्ही आतापर्यंत जे विषय घेतलेले आहेत ते काळाच्या पुढचे विषय घेतले आहेत. ऊदा स्त्री भ्रूण हत्या, लोकसंख्येचा भस्मासूर, पर्यावरण, पावसाचं पाणी जिरवणे, अन्न भेसळ, अवयवदान, शाळेच्या दप्तराचं ओझं. यात स्थानिक मुलांना व्यासपीठ मिळतं. नाटकाचं ड्यूरेशन कमी असावं लागतं," शाह सांगतात.
"कारण लोक बोअर होतात. 16-18 मिनिटं एवढा कालावधी असतो. कमी कालावधी असला की जास्त प्रयोग होतात. लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. आम्ही लार्जर दॅन लाईफ सेट करतो. लोकांना व्हिज्यूअली पण देखावा रिच दिसायला हवा. माझ्याकडे आता 14-16 कलाकार आहेत. त्यात मोस्टली मुली आहेत," असं शाह सांगतात.
"यानिमित्ताने एक कुटूंब मंडळासोबत जोडलं जातं. त्यांचे नातेवाईक येतात. ते प्रयोग बघायलाही येतात. एक चांगलं वातावरण तयार होतं. पुण्यात आता जिवंत देखाव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिले काही मोजकी मंडळं करायची. पण आता हे प्रमाण वाढलं आहे. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. आमचे 10 दिवसांत 100 पेक्षा जास्त प्रयोग होतात," शाह माहिती देतात.
"ज्या दिवशी रात्री बारापर्यंत परवानगी असते त्या दिवशी जास्त शो होतात," असं पियुष शाह यांनी सांगितलं.
जिवंत देखाव्यांसाठी काय तयारी केली जाते?
जिवंत देखाव्यातील संवाद, संगीत यांचे आधी रेकॉर्डिंग केलं जातं. व्हॉइसओवर वर हे देखावे होतात. शेवटच्या माणसापर्यंत हा आवाज पोहोचणं आवश्यक असतं, त्यामुळे हा पर्याय वापरला जातो.
साधारणपणे अंधार पडायला सुरुवात झाली की, देखाव्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होते. जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणात काम करण्याचा हा अनुभव कलाकारांसाठीही वेगळा असतो.
रंगभूमीवर ते नाटक एका दिवसात एकदाच सादर करावं लागतं, पण इथे मात्र एका संध्याकाळीच त्याच नाटकाचे कित्येक प्रयोग होतात. या कामाच्या अनुभवाविषयी कलाकारांना काय वाटतं? हे समजून घेण्यासाठी बीबीसीने अभिनेता-दिग्दर्शक राजेंद्र पालवे यांच्याशी संवाद साधला. ते कसबा पेठेतल्या फणी आळी तालीम मित्र मंडळ या गणेश मंडळासाठी जिवंत देखावा बसवतात.
राजेंद्र सांगतात, "अभिनेता म्हणून मी 2008 पासून काम करतोय. दिग्दर्शक म्हणून 2016 पासून काम करतोय. हा अनुभव सुखावह असतो. एनर्जी टिकवून ठेवावी लागते. प्रेक्षकांसोबत आय टू आय कॉन्टॅक्ट असतो. आवाज आपला नसला तरीही भूमिका तर आपणच करतो ना.
"होतकरू कलाकार, रंगमंच सेट करणारे, लाईट, स्पीकर, मेकअप, ड्रेपरी अशा सगळ्या कलाकारांना वाव मिळतो. कंटेन्टवर बजेट अवलंबून असतं. शिवाजी महाराजांची भूमिका असेल तर तसे कपडे आणि मेकअप करावाच लागेल.
"महिनाभरापासून आधी तालमी सुरु होतात. व्यवस्थित बसवून घेतलं जातं. ओपन स्टेजवर प्रेझेंटेशन असतं. संध्याकाळी 7 पासून जे सुरू होतं ते रात्री 10-10.30 पर्यंत आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये 12 पर्यंत परवानगी असते. तसं करावं लागतं कलाकारांना.
"पुन्हा तोच प्रयोग सादर करावा लागतो. कारण समोरचे बघणारे बदलले असतात. आधीचे प्रयोग बघून पुढे गेलेले असतात. पुन्हा नवीन गर्दी येते. त्यांच्या प्रतिसादाने परत उत्साह वाढतो," असं अभिनेता आणि दिग्दर्शक राजेंद्र पालवे यांनी सांगतिलं.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह आणि औत्सुक्य हे शतक उलटल्यावरही टिकून आहे. काळानुरुप बदल करत जाणे हे या मागचं मुख्य कारण असल्याचं आनंद सराफ यांना वाटतं.
"गणेशोत्सवाची दोन वैशिष्टये आहेत- व्यापकता आणि परिवर्तनशीलता. हा उत्सव इतकी वर्षं झाली तरीही जनमानसात टिकून आहे. जो काळानुरूप बदल करुन घेतो तो उत्सव काय किंवा व्यक्ती काय टिकून राहते," असं आनंद सराफ यांनी सांगितलं.