साप्ताहिक राशीफल 02 डिसेंबर ते 08 डिसेंबर 2024

रविवार, 1 डिसेंबर 2024 (17:38 IST)
मेष : एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल.  
 
वृषभ : तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही. 
 
मिथुन : हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसायउद्योगातील आकर्षक योजनांतून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना असेल. कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पाहा. नोकरीमध्ये जे काम आवडत नाही त्यात विनाकारण वेळ जाईल. सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होतील. 
 
कर्क : कामाच्या वेळी काम आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा राहील. व्यापारात एखादी कल्पना महागडी असली तरी भविष्यात उपयोगी पडणारी असेल तर त्याविषयी माहिती घ्याल. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठ चांगली साथ देतील. अवघड कामातही प्रगती होईल. बेकार व्यक्तींनी तडजोड करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल. मुलांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. 
 
सिंह : व्यक्तिगत इच्छाआकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल. पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळच मिळणार नाही. व्यवसायउद्योगात काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल. खर्च भागवण्याइतकी आर्थिक स्थिती बरी असेल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल. त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये मित्रमंडळींची वर्दळ राहील. 
 
कन्या : एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करण्याची तुम्हाला सवय आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यापारधंद्यात जे काम कराल त्यात बुद्धिकौशल्य आणि कलात्मकता दिसून येईल. जाहिरातीचे नवीन तंत्र आत्मसात करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरामधील एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. घरगुती समारंभाच्या निमित्ताने वेगळ्या स्थळाला भेट देण्याचा योग येईल. 
 
तूळ : मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील. व्यापारउद्योगात विविध मार्गानी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल. त्याचा फायदा उठवावा. चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील. पण कामाचे प्रमाणही वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल. 
 
वृश्चिक : ग्रहमान तुमच्या इच्छापूर्तीला पूरक आहे. व्यापारउद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण, जागा बदल किंवा व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील. प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर कराविशी वाटेल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खुश होऊन वरिष्ठ विशेष सवलत देतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल. 
 
धनू : एकंदरीत या सप्ताहाचे ग्रहमान खर्चिक आहे. पण सर्व खर्च चांगल्या कारणाकरता असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही. कारखानदारांना उत्पादनक्षमता वाढविण्याकरता नवीन मशीनरी खरेदी कराविशी वाटेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची प्रचीती येईल. एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील. तरुणांनी हात राखून खर्च करावा.
 
मकर : ज्या वेळी भरपूर पैसे हातात असतात त्या वेळी तुमची कळी खुलते. सध्याचे ग्रहमान त्यादृष्टीने प्रसन्न आहे. प्रत्येक सुख तुम्हाला हवेसे वाटेल. व्यापारधंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल. रात्र थोडी सोंगं फार अशी तुमची अवस्था राहील. नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल. त्याकरता तुमची विशेष बडदास्त ठेवली जाईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल. 
 
कुंभ : एकाच वेळी कर्तव्य पार पाडायचे आणि मौजमजाही कराविशी वाटेल. दोन्ही डगरींवर व्यवस्थित नियोजन करून पाय ठेवू शकाल. व्यवसाय उद्योगात विनाकारण लांबलेल्या कामांना मुहूर्त लाभेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी उपलब्ध होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. मात्र तेथील वातावरण आणि कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा. 
 
मीन : अडथळ्यांची वाट संपून प्रगतीचा मार्ग आता खुला होण्याची लक्षणे दिसू लागतील. तुमचा उत्साह वाढू लागेल. व्यापारात तांत्रिक कारणांमुळे अडून राहिलेली कामे आता गती घेतील. तुमचे प्रयत्न आणि हितचिंतकाची मदत यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन वर्षांतील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळा. नोकरीत वेगळ्या कामाकरता निवड होण्याची शक्यता आहे. बेकार व्यक्तींना काम मिळेल, पण त्यांनी अतिचिकित्सा करू नये.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती