अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात. बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस पडते ती सर्वात उत्तम तिथी असते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे. गौरी उत्सवाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्यांनी ओटी भरतात.