साताजन्माचा वनवास..!

WD
आपल्या आयुष्यात मुंबईच्या उपनगरात भरधाव वेगाने धावणार्‍या लोकल गाड्याप्रमाणे एकामागून एक असे अनेक अविस्मरणीय क्षण येत असतात...परंतु, असे क्षण हाताच्या ओंजळीत थांबले तर मोती...अन् निसटले तर माती...!

तिच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याने मनाच्या पानावर टिपून ठेवले आहेत. 'तिच्या' अशा काही आठवणी त्याने बकुळाच्या फुलाप्रमाणे हृदयाच्या कोपर्‍यात लपवून ठेवल्या आहेत...'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं 'त्याची' व 'तिची' प्रेमाची गोष्ट....

'तो' एका जाहिरात कंपनीत नोकरीला...परीक्षेसाठी त्यानं घेतलेली सुटी संपून ड्यूटीवर रूजू होण्याचा दिवस व 'तिचा' त्याच जाहिरात कंपनीत जॉईन होण्याचा दिवस म्हणजे त्याच्या आयुष्यातले अपघाती वळणच ठरले. ऑफिसात एन्ट्री करत सहकार्‍यांच्या गाठीभेटी घेत असताना त्याचं लक्ष प्रोडक्शन डिपार्टमेंट मधल्या कोपर्‍यातल्या चेअरवर बसलेल्या 'तिच्या'कडे गेलं. अन् 'तूच रूजवला मनात माझ्या अंकुर प्रेमाचा...!' अशाच काही प्रेम कवितेच्या पंक्ती त्याच्या कानात एका मागून एक अशा पिंगा घालू लागल्या.

तरारला कोवळा अंकुर प्रेमाचा...या मनामध्ये,
सारे काही सुंदर झाले आता माझ्या आयुष्यामध्ये...

WD
नोकरीतला तिचा पहिला दिवस...त्यामुळे थोडी गोंधळलेली...मनात असलेली भीती तिच्या कोवळ्या चेहर्‍यावर दिसत होती. प्रथम नाद- प्रथम संधी, म्हणत त्याने त्याची ओळख स्वरचित 'द्विधा प्रेमाची..!' या कवितेतून करून दिली. अशी 'टिपीकल' ओळख करून देण्यामागे 'तो' अजून 'सिंगल' आहे, असा त्या मागचा हेतू असावा. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याने ऑफिसात एक विशिष्ट प्रकारचे वलय तयार केले होते.

'तिला' पाहिल्यापासून त्याच्या आयुष्याचे दिवस मंत्रायला सुरवात झाली होती. काही दिवसातच त्या दोघांमधे गट्टी जमली अन् तिच्या संगतीने त्याने निर्माण केलेल्या वलयास गुलाबी रंग चढायला सुरवात झाला. त्यांच्यातलं एक विशेष म्हणजे 'ती' अन् 'तो' एकाच शहरातले. 30-45 मिनिटाचा तिच्यासोबतचा रेल्वेचा प्रवास...दोघांचं ऑफिसात सोबतच येणं सुरू झालं. 'तो' व 'ती' ऑफिसात यायचे सोबतच मात्र जायचे वेगवेगळे... 'ती' जायची लवकरच अन् तो मात्र उशीरा... तो तिच्या प्रेमात पार घसरलाच....

प्रेम करावे मुके अनामिक
प्रेम करावे होऊनिया तृण
प्रेम करावे असे, परंतु...
प्रेम करावे कळल्याविण !

ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांच्या 'प्रेम करावे असे, परंतु...' ही कविता त्याच्या प्रेमाशी कुठं तरी जुळत होती.

ऑफिसात त्या दोघांची बाकं अगदी समोरासमोर, मात्र 'बीच में काच की दीवार..!' अधून मधून त्याचं तिच्याकडे पाहणं... मनाची तार छेडणं... तिला प्रेमाचे छुपे संकेत पाठवणं... कधी भांडणं तर कधी मनवणं... ऑफिस टायमिंग मधले फुरसतीचे क्षण अक्षरश: वेचणं... त्यानं हाफ डे सुटी मारून ऑफिसल्या कॉर्नरवर तिची वाट पाहणं...अन् शहरातलं बाजारपेठ तुडवणं... 'झेड पी'जवळ असलेल्या मुगाच्या डाळीची भजी, बस स्थानकाबाहेरील ‍झणझणीत मिसळ खाणं... असं 'त्याचं' आणि 'तिचं' नित्याचच झालं होतं. प्रेमात पडल्यावर तमाम प्रेमीयुगलांची गाडी ज्या रूळावरून धावते त्याच रूळावरून त्याची गाडी ही भरधाव वेगाने धावत होती. अन् एके दिवशी गाडी रूळावरून घसरलीच...

WD
तिने एकदा गाडी चुकवली आणि बसून राहीला स्टेशनवरच, त्याची वाट पहात. त्यानंही धापा टाकत रेल्वे स्टेशन गाठलं. प्लॅटफॉर्मच्या बाकावर तिला बसलेलं पाहताच़ त्याला आनंद झाला. तो तिच्या जवळ गेला. ती मात्र शांतच. तिच्या डोळ्यात प्रेमसागर प्रंचड खवळलेला...तिनं त्याला सगळं- सगळं सांगितलं... 'तो' जे अपघाती वळण अनुभवत होता, ते तिच्या आयुष्यात कधीच येऊन गेलं होतं, हे ऐकून तो थबकलाच...तिच्या प्रेमात तो जेवढा घसरला होता. तेवढीच तीही घसरली होती. हे तिनेही मान्य केलं. प्लॅटफॉर्मवर त्यांनी एकमेकांना सावरलं अन् साताजन्मानंतर भेटण्याचं कमिट केलं. 'आठवा जन्म' हा आपला राहणार..!, असे त्याने तिला सांगितलं. याच वळणावर तुझी वाट पाहत राहील असं त्यानं तिला सांगताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रुच्या सरी ओघळू लागल्या. तिचं ते रडणं...साताजन्मानंतरच्या भेटीच्या कमिटमेंटला जणू समर्थनच देणारं होतं. त्यानंतर ते कधीच भेटले नाहीत...किंवा एकमेंकांसमोर अचानक येण्याचा योगायोगही त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत कधी आला नाही.

प्रेम कळायला लागलं की, सगळं-सगळं कळायला लागतं. शब्द वाचून शब्दाच्या पलिकडचं..सातासमुद्रापासून तर साताजन्मानंतरचंही..!

वेबदुनिया वर वाचा