फुटबॉलप्रेमींना खूषखबर, ला लिगा स्पर्धेला मंजुरी

सोमवार, 25 मे 2020 (11:48 IST)
लॉकडाउन काळात घरात बसून कंटाळलेल्या क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मन सरकारने बुंधेश लिगा स्पर्धेला मान्यता दिल्यानंतर, स्पेन सरकारनेही ला लिगा ही फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरु करण्याला संमती दिली आहे. 8 जूनपासून ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळवली जाणार असल्याचे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो शँचेझ यांनी जाहीर केले. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यानंतर स्पेनमधील सर्व महत्वाच्या फुटबॉल स्पर्धा 12 मार्च रोजी स्थगित करण्यात आल्या होत्या.
  
स्पर्धेच्या आयोजकांनी याबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही अध्यक्ष जेविअर टेबस यांनी स्पर्धा लवकरात लवकर सुरु होईल अशी माहिती दिली होती. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व क्लब, खेळाडू, प्रशिक्षक व इतर कर्मचार्यांानी केलेल्या पाठपुराव्याचा हा परिणाम आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्हाला आनंद झाला. पण याचसोबत आरोग्यविषयक सर्व नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न केल्यास ही रोगराई पुन्हा एकदा पसरू शकते आणि आपल्याला ते होऊ द्यायचे नाहीये. टेबस यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन प्रतिक्रीया दिली.
 
ला लिगा फुटबॉल स्पर्धेचा चाहतावर्ग मोठा आहे. स्पनेमध्ये आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत 28 हजार नागरिकांनी आपले प्राण गावलेले आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसाला करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेच आहे. स्पेनमध्ये 56 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. स्पेनने लॉकडाउन हळुहळु शिथील करण्यास सुरुवात केली आहे. माद्रिद, बार्सिलोना या शहरात 10 लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र रस्त्यावर येण्यास मनाई केलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती