स्वराज्याचे प्रेरणापीठ : राजमाता जिजाऊ

शनिवार, 12 जानेवारी 2019 (15:02 IST)
राजमाता जिजाऊ यांना फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील लखूजीराजे जाधव हे निजामशाहीतील अत्यंत मातबर सरदार होते, तर फलटणचे प्रसिद्ध निंबाळकर घराणे हे त्यांचे आजोळ होते. वेरुळचे मालोजीराचे हे नामवंत सरदार होते. त्यांचे पुत्र शहाजीराजांबरोबर जिजाऊंचा विवाह झाला. छत्रपती शिवाजीराजांसारखा लोककल्याणकारी राजा घडविण्याचे ऐतिहासिक कार्य जिजाऊंनी केले. आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर म्हणतात, 'स्वराज्य स्थापनेची कल्पना आणि आरंभ याचे सर्व श्रेय केवळ जिजाबाई मातुश्रीस आणि शहाजीराजांस दिले पाहिजे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वा. सी. बेंद्रे म्हणतात, जहागिरीची सांभाळणूक वगैरेतील शिक्षणानुभव शिवाजी महाराजांस त्यांच्या मातेकडूनच मिळाले होते आणि मोठे झाल्यावरही शिवाजी महाराज आपल्या मातेच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करीत होते. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती, युद्धकला आणि उदात्त ध्येयाची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी दिली, असे अनेक वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासक सांगतात. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाऊंची भूमिका महत्त्वाची आहे. अफजलखान भेटीच्या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. पन्हाळावेढ्याच्या प्रसंगी जिजाऊ शिवरायांची सुटका करण्यासाठी स्वतः हाती शस्त्र घेऊन निघाल्याचे वर्णन समकालीन असणारा कवींद्र परमानंद शिवभारतात करतो. आग्रा कैदेच्याप्रसंगी स्वराज्य राखण्याचे महान कार्य राजमाता जिजाऊंनी केले. राज्यभिषेकप्रसंगी जिजाऊ शिवबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. 
 
राजमाता जिजाऊ स्वतः उत्तम न्यायाधीश होत्या. त्यांनी पुणे परगण्यात स्वतः काही न्यायनिवाडे केलेले आहेत. बालशिवबाला शेजारी बसवून सज्जनांचे रक्षण करणारा आणि दुर्जनांना जरब बसविणारा न्यायनिवाडा जिजाउंनी शिकविला. जिजाउंचे स्वतःचे गुप्तहेर खाते होते, त्याद्वारे त्यांनी स्वराज्यातील सर्व माहिती मिळवून शिवरायांना नेहमी
सावधगिरीच्या सुचना दिलेल्या आहेत. शिवपुत्र संभाजीराजांच्या मातेचे (सईबाईंचे) अकाली निधन झाल्यानंतर संभाजीराजांना विविध भाषांचे, राजनीतीचे आणि युद्धकलेचे शिक्षण राजमाता जिजाऊंनी दिले.
 
राजमाता जिजाऊ हे स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ आणि विद्यापीठ आहे.
 
जशी चंपकेशी खुले फुल जाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई॥
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्विपाला॥
करी साऊली माऊली मुलाला॥
 
जिजाऊंच्या कर्तृत्वाने आणि समजदारपणामुळे त्यांची कीर्ती संपूर्ण भारतखंडावर पसरलेली होती. जिजाऊंच्या मायाळू आणि कर्तृत्वाच्या सावलीखाली सज्जन लोक आश्रयाला येत असत. 
 
जिजाऊ प्रेमळ होत्या, तशाच त्या करारी होत्या, त्या जशा लढवय्या होत्या तशाच त्या बुद्धिमान होत्या. परंपरेच्या अभिमानी होत्या, तशाच त्या विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, सर्व जातीधर्मातील मावळ्यांना आपल्या शिवबाप्रमाणेच माया दिली, त्यामुळेच अनेक मावळे स्वराज्यासाठी पुढे आले. मराठा इतिहासाचे महान अभ्यासक डॉ. बाळकृष्ण म्हणतात, She (Jijau) had the head of a man over the shoulders of a women she remained a guide, philopher and friend to Shivaji throughout her life. 
 
राजमाता जिजाऊ या शिवरायांच्या मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि खर्‍या मित्राप्रमाणे राहिल्या. त्या मुत्सद्दी, करारी, शूर, निर्भीड, महाबुद्धिमान, पराक्रमी, राजनीतीकुशल, धुरंद्धर, कर्तृत्ववान, न्यायी, समतावादी, विवेकी, बुध्दिप्रामाण्यवादी होत्या. शिवरायांना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ होत्या. त्यांच्या जीवनचरित्र्यातून हा बोध घ्यावा, याच जिजाऊ जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती