मुंबईतल्या या 8 रेल्वे स्थानकांच्या नावांचा हा इतिहास वाचून थक्क व्हाल

बुधवार, 13 मार्च 2024 (14:48 IST)
मुंबई उपनगरातील काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव, बुधवारी (13 मार्च) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार कॉटन ग्रीन, करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स अशा 8-10 रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाण्याची शक्यता आहे.
 
मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,
 
"भारतीय पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावंदेखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती म्हणून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या वतीने या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. या मागणीनुसर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावं लवकरात लवकर बदलण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत."
 
कोणत्या स्थानकांची नावं बदलली जाणार?
खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये मुंबई उपनगरातल्या 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
 
ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स, चर्नी रोड हार्बर रेल्वे मार्गावर असणाऱ्या कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्स सर्कल या स्थानकांची नावं बदलण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या नावांचा इतिहास आणि नवीन नावांचा अर्थ
यासोबतच मुंबई सेंट्रल या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचं नाव बदलून नाना जगन्नाथ शंकर शेठ असं ठेवण्याचा प्रस्तावही दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
 
पहिल्यांदा 2017ला या रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी करण्यात आली होती. आता राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
 
या सगळ्या नावांची एक वेगळी गोष्ट आहे, मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावाला एक इतिहास आहे. त्यामुळे आता या रेल्वे स्थानकांची नावं बदलली की जुन्या नावांची गोष्ट विस्मरणात जाऊ नये म्हणून केलेला हा प्रयत्न.
 
1. मुंबई सेंट्रल
मुंबईच्या मधोमध असल्यामुळे 1930 साली बांधण्यात आलेल्या या स्थानकाला 'मुंबई सेंट्रल' हे नाव पडलं होतं. मुंबईच्या दळणवळणाचं हे मध्यवर्ती केंद्र असणार होतं म्हणूनच या स्थानकाला हे नाव देण्यात आलं.
प्रस्तावित नाव : नाना जगन्नाथ शंकर शेठ रेल्वे स्थानक.
जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. 19 व्या शतकातील समाजसुधारक आणि व्यावसायिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
 
2. मरीन लाईन्स :
19व्या शतकात या भागात असलेल्या ब्रिटीशकालीन मरिन बटालियनच्या बॅरेक्सवरून या स्टेशनचं नाव देण्यात आलं होतं. नंतर या बटालियनच्या इमारतीचं रूपांतर वायुदलातील सैनिकांच्या सदनिकांमध्ये केलं गेलं.
प्रस्तावित नाव : मुंबादेवी
मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता म्हणून मान्यता आहे. दक्षिण मुंबईत मुंबादेवीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि याच मंदिराच्या नावावरून या मरीन लाईन्सचं नाव बदलून मुंबादेवी ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
3. चर्नी रोड
18 व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत भरपूर मोकळी जागा होती, आज जे दिसतं ते काँक्रिटचे जंगल त्याकाळी नव्हतं.
त्यामुळे मुंबईत मोठ्या संख्येने पशुपालक राहत असत. ब्रिटिशांनी सार्वजनिक ठिकाणी गुरे चरण्यासाठी कर लावला तेव्हा बहुतेकांना तो कर परवडणारा नव्हता.
त्यामुळे मग सर जमशेटजी जीजीभॉय यांनी या परिसरात जनावरांना चरण्यासाठी एक मोठा भूखंड खरेदी केला आणि लवकरच हा परिसर चर्नी रोड या नावाने ओळखला जाऊ लागला.
प्रस्तावित नाव : गिरगाव
मलबार हिलच्या तळाशी मुंबईतलं गिरगाव आहे. त्यामुळे या यावरून चर्नी रोडचं नाव बदलून गिरगाव असं ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
4. करी रोड
1865 ते 1875 पर्यंत बॉम्बे-बडोदा आणि मध्य भारतीय रेल्वेचे एजंट असलेल्या चार्ल्स करी यांच्या नावावरून या स्थानकाला करी रोड असं नाव देण्यात आलं.
प्रस्तावित नाव : लालबाग
या नावाच्या इतिहासाबाबत दोन गोष्टी सांगितल्या जातात. पहिली म्हणजे 14 व्या शतकात इथे हजरत लाल शाह बाबा किंवा लाल शाह साबचा दर्गा होता म्हणून या भागाला लालबाग असं नाव देण्यात आलं.
 
दुसरी गोष्ट म्हणजे या भागात असणाऱ्या सूतगिरण्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा लाल होता आणि म्हणून या भागाला लालबाग असं नाव पडल्याचं सांगितलं जातं.
 
5. सँडहर्स्ट रोड
सँडहर्स्ट हे कुणाचंही नाव नाहीये ती एक पदवी आहे. 1895 ते 1900 दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेल्या विल्यम मॅन्सफिल्ड यांच्या नावावरून या स्थानकाला सँडहर्स्ट रोड असं नाव देण्यात आलंय. विल्यम मॅन्सफिल्ड हे पहिले विस्काऊन्ट सँडहर्स्ट (1st Viscount Sandhurst) होते.
प्रस्तावित नाव : डोंगरी
डोंगर या शब्दावरून डोंगरी हे नाव मिळालं आहे. डोंगरी नावाचा एक परिसर या स्थानकाच्या जवळ आहे म्हणून या स्थानकाला डोंगरी हे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.
 
6. कॉटन ग्रीन
'कॉटन ग्रीन' हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. इथूनच भारताचा कापसाचा व्यापार सुरु झाल्याचं मानलं जातं. ब्रिटिशांच्या काळात या भागात कापसाची मोठमोठी गोदामं होती. या भागात कॉटन एक्सचेंजची एक इमारत आजही उभी आहे.
आर्ट डेको शैलीत बांधलेल्या या इमारतीला हिरवा रंग देण्यात आला होता, कारण आजूबाजूचा परिसरही हिरवागार होता. त्यामुळे या स्थानकाला कॉटन ग्रीन असं म्हटलं जाऊ लागलं.
प्रस्तावित नाव : काळाचौकी
काळाचौकी पोलीस चौकीवरून हे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.
 
7. डॉकयार्ड रोड
या स्थानकाजवळ असणाऱ्या नौदलाच्या तळावरून याला डॉकयार्ड रॉड असं नाव मिळालं. ब्रिटिश काळात जहाजबांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी वापरलं जाणार बॉम्बे डॉकयार्ड इथून जवळ आहे.
प्रस्तावित नाव : माझगाव
मुंबईतल्या माझगाव नावाच्या परिसरावरून हे नाव मिळालं आहे.
 
8. किंग्ज सर्कल
किंग जॉर्ज पाचवे यांच्या नावावरून किंग्ज सर्कल हे नाव पडलं.
प्रस्तावित नाव : तीर्थंकर पार्श्वनाथ
या स्थानकाच्या परिसरात असलेल्या पार्श्वनाथ मंदिरावरून हे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती