दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही - खा. शरद पवार

शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (16:44 IST)
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानावर खा. शरद पवार  यांची जोरदार टीका...
 
काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही...दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, स्वकष्टाने चालवतो...स्वकर्तृत्वाने घर चालवणारे आम्ही लोक आहोत...आम्हाला माहित होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही...आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही...अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांवर करतानाच आपला खराखुरा जो बाप शेतकरी आहे, तोच आपला खरा घटक आहे, त्याच्या मदतीने पुढे जाऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.यावेळी शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचे पक्षात स्वागत केलेच, शिवाय नाशिक आणि नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांचे नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिकच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोदगारही शरद पवार यांनी यावेळी काढले.हिरे कुटंबियांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरुन त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून आता सगळ्या क्षेत्रात नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा आमची साथ कायम राहील, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती