राजदंड पळवला, महापौरांना बांगड्या आणि साडीचोळीचा आहेर

बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (11:03 IST)
नगरोत्थान, दलित वस्ती सुधार आणि जिल्हा नियोजनकडून आलेला निधी याचे असमान वाटप झाल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. निधीत भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विक्रांत गोजमगुंडे यांनी केला. यावरुन प्रचंड गदारोळ उठला. महिला नगरसेविकांनी महापौरांना बांगड्या आणि साडी-चोळीचा आहेर दिला. या सबंध प्रकारामुळं सर्वसाधारण सभा तासाभरासाठी तहकूब करण्यात आली. पुन्हाही गोंधळ चालूच राहिला. नगरसेवक युनूस मोमीन यांनी राजदंड पळवला. तो त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी मोठी झटापट करावी लागली. निधी वाटपात महापौरांनी पक्षपात केला यावर कॉंग्रेस सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. दीपक सूळ, युनूस मोमीन, विक्रांत गोजमगुंडे, अहमदखां पठाण, रवीशंकर जाधव, सचिन बंडापल्ले, सपना किसवे आणि उषा कांबळे यांनी महापौरांच्या डायससमोर ठिय्या मांडला. एक नगरसेवक तर चक्क महापौरांच्या टेबलावरच जाऊन बसले होते. या गोंधळातच महापौरांनी सगळे विषय मंजूर झाल्याचे घोषित करुन टाकले. दुपारी तीन वाजता सुरु झालेली सभा रात्री अकरापर्यंत चालली. गोंधळ आणि विलंबामुळे अनेक नगरसेवक मधेच निघून गेले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती