उद्धव ठाकरे युतीसाठी प्रयत्नशील होते, राहूल शेवाळ यांचा गौप्यस्फोट

मंगळवार, 19 जुलै 2022 (21:54 IST)
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही उद्धव ठाकरे युतीसाठी प्रयत्नशील होते, असा गौप्यस्फोट राहूल शेवाळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, २१ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक तास चर्चा केली. मात्र ही चर्चा सफल होऊ शकली नाही, असं राहुल शेवाळे म्हणाले. १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला यानिमित्ताने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. 
 
राहूल शेवाळे म्हणाले की, २१ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन तासभर युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर जुलै महिन्यात अधिवेशन झालं. मात्र, या विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. एकीकडे भाजपसोबत युतीच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे भाजपच्या आमदारांचं निलंबन करावं ही भूमिका भाजपच्या नेतृत्त्वाला पटली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे युतीसाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी अनुकूल नव्हते.
 
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी अनेकदा युतीसाठी चर्चा केली. मात्र, भाजपला शिवसेनेकडून नंतर कोणताही पॉझिटीव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे पक्षनेतृत्त्व नाराज झाले. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीतही केला. मी माझ्यापरीने युतीचा प्रयत्न केला असून आता तुम्ही प्रयत्न करा असंही उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बैठकीत सांगितलं. यावेळेस मी स्वतः चार-पाच खासदारांना शिंदेंना भेटलो. देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांनाही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मात्र तरीही भाजपाचे नेतृत्त्व नाराज होते. मी युती करायला तयार आहे पण सहाकार्य मिळत नाही, असं ठाकरेंचं म्हणणं होतं. पण तरीही भाजप नेतृत्त्व नाराज होते म्हणून ही युती होऊ शकली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती