या तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर धूळ खात पडले

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (09:06 IST)
पुणे येथील शिरूर तालुक्यात दिवसेदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दोन हजार पार झालेला आहे .एकीकडे रूग्णांना बेड मिळत नाहीत तर दुसरीकडे माञ पिंपळे जगताप (ता. शिरुर) याठिकाणी तब्बल सत्तर बेडचे क्वारंटाईन सेंटर उभारून देखील ते धूळ खात पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय यंञनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
तर परिसरातील पिंपळे जगताप आणि केंदूर परिसरात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी अनेक रुग्णांनी कोरोनवर मात देखील केली आहे मात्र अजूनही जवळपास नव्वद ते शंभर रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नसताना देखील क्वारांटाइन सेंटर किंवा शासकीय दवाखान्यात बेड नसल्याने उपचारासाठी खाजगी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
दरम्यान पिंपळे जगताप येथील एका शैक्षणिक संस्थेची इमारत क्वारंटटाईन सेंटरसाठी प्रशासनाने ताब्यात घेउन दीड महीना उलटून गेला असताना देखील अद्यापही या क्वारंटईन सेंटरमध्ये एकाही रुग्णाला उपचार देण्यात आले नाहीत की क्वारंटईन करण्यात आले नाही.त्यामुळे सत्तर बेडचे हे क्वारंटाईन सेंटर फक्त नावपूरतेच उभारून ठेवले आहे का? असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. पिपंळे जगताप येथे उभारलेले सत्तर बेडचे क्वारंटाईन सेंटर कधी सुरू होणार आणि कधी या भागातील रुग्णांना उपचार मिळणार हा ही एक प्रश्न आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती