सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा वाद शिगेला, एकाची निर्घृणपणे हत्या

मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (08:24 IST)
दोन महिन्यांपूर्वी मुलांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून हा वाद निर्माण झाला होता. या वादाची परिणती वडीलांच्या खूनात झाली आहे. नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे ही घटना घडली. पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या तीनही आरोपींना अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नहारकर व महातो कुटुंबीय पांढराबोडी येथे शेजारी शेजारी राहातात. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन कुटुंबात किरकोळ वाद झाला होता. मात्र हा वाद आतल्या आत धुमसत होता. त्याची परिणती अशोक संतराम नहारकर वय (४०) यांच्या खूनात झाली. या प्रकरणी भाऊ दिनेश संतराम नहारकर याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चेतन मुन्ना महातो हा प्रमुख आरोपी आहे. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टवरून रितेश नहारकर व चेतन महातो यांच्यात किरकोळ वाद झाला. या दरम्यान रितेशच्या मित्राला चेतन महातो याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मित्र जीव वाचवून तिथून पळून गेला. रितेशला हे माहिती होताच तो जाब विचारण्यासाठी केतन महातोच्या घरी गेला. तिथे चेतनचा भाऊ राम मुन्ना महातो, वडील मुन्ना मोहन महातो एकत्र आले. त्यांच्यात वाद सुरू झाला.
 
दरम्यान रितेश महातोच्या घरी गेल्याचे कळताच त्याचे वडील अशोक संतराम नहारकर हे वाद सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी राम मुन्ना महातोच्या हातात चाकू होता. त्याने चाकूने अशोक नहारकर यांच्यावर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या नहारकर यांना घेऊन मुलगा रितेश व भाऊ दिनेशने हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती