जाहीरातीतून फडणवीस गायब झाले ही शिंदेंची मोठी झेप मानावी लागेल

मंगळवार, 13 जून 2023 (20:22 IST)
कोणत्याही जाहीरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असायचे परंतू जाहिरात बघून आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे जाहीरातीतून फडणवीस गायब झाले ही शिंदेंची मोठी झेप मानावी लागेल असा खोचक टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. भाजप शिंदे गट आम्ही एक आहोत असे जरी म्हणत असले तरी, मन तर दुखावले जातात असेही ते म्हणाले.
 
वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. या जाहीरातीवरून राज्यातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, जाहिरात बघून मलाही आश्चर्य वाटले. अनेकदा जाहीरातीत पंतप्रधान मोदी, अमित शहा, आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. एकदमच उपमुख्यमंत्री फडणवीस गायब झाले. फक्त राज्यात शिंदे आणि हिंदुस्थानात मोदी ही शिंदेची मोठी झेप आहे. बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे म्हणतात अन त्यांचाच फोटो यात नाही. फडणवीसांना तर विसरले पण बाळासाहेबांनाही विसरले. जाहीरातीत मांडण्यात आलेली आकडेवारी कोणी काढली मला माहित नाही. हा सर्व्हे कोणी केला माहित नाही. एक मात्र खरय की, जरी दोन्ही गटाकडून वाद समोर आला नाही. तरी, मन तर दुखावली जातात ना.
 
आता बघा ना लोकसभेच्या जागेवरून वाद समोर येत आहेत. मलाही राजकारणात पन्नास, पंचावन्न वर्षे माझा कुठे फोटो नसला तरी, कार्यकर्ते लगेच येऊन सांगतात इतके कार्यकर्ते सजग झालेले आहेत. फडणवीसांचेदेखील फॉलोअर्स आहेत त्यामुळे उघडपणे कोणी बोलले नाही तरी, मन तर दुखावले गेलेच असतील असेही भुजबळ म्हणाले. जाहिरातीच्या खर्चावरून त्यांनी टोला लगावला.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 50 लाख जाहिरातीसाठी खर्च करणे खूप मोठी गोष्ट नाही. किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे दिले तरी फरक पडणार नाही अशी टीका त्यांनी केली.
 
कटटर हिंदुत्ववादी संघटना ज्या काही काम करत आहेत. केरला स्टोरीमध्ये सुध्दा ३० हजार मुली गेल्या सांगतात नंतर दोन तीन मुलींवर आले. ४०० धर्मांतरे झाली म्हणून सांगतात. हे फक्त लोकांना फसविण्यासाठी अन मुस्लिमांच्या विरूध्द उभे करण्यासाठी असले प्रकार करतात. यातून आम्ही हिंदूत्वाचे मसिहा आहोत हे दाखवून मतांचे धृवीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
 
भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण राज्यात संपर्क अभियान सुरू केले आहे याविषयी बोलतांना भुजबळ म्हणाले, भाजपचे सर्व मंत्री, नेते फार सक्रिय झालेले आहेत. ज्यावेळी आपल्याला लक्षात येते आपली बोट बुडायला लागली आहे तेव्हा सगळे सक्रीय होतात असा टोलाही त्यांनी लगावला. प्रचाराचा तो भाग आहे निवडणुका जवळ येत आहेत. ऑक्टोबरनंतर कदाचित निवडणुका होतील. त्यामुळे काय केले ते सांगा काय विकले तेही सांगा असे त्यांनी सांगितले. 
 
कृषीमंत्र्यांच्या पीएवरून वाद सुरू आहे. खताच्या दुकानांवर लूट सुरू आहे. कृषी अधिकारी यांना विचारले की, खत कमी आहेत का? तर ते म्हणतात की, अजिबात नाही. एका अर्थाने लूटालूट सुरू आहे. शेतकरी अडचणीत आहे, त्यात अशी अडवणूक करणार्‍यांवर पोलिस व कृषी अधिकार्‍यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने देखील लक्ष देणे गरजेचे आहे असे  भुजबळ यांनी स्पष्ट केले. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती