मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (09:01 IST)
ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने विपुल पवार (१७) विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बुबळी गावात घडली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, या पध्दतीचा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईल नेटवर्कचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी डोंगरावर, झाडावर, टेकडीवर जावे लागत आहे .
 
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील बाबुळी गावात राहणार विपूल पवारहा विद्यार्थी १२ वीत शिकत होता. सध्या कोरोना काळात सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने त्याचे शाळेचे तास बुडत होते. यामुळे तो मागील १५ दिवसांपासून तणावात होता. त्यामुळे २ ऑगस्टला मध्यरात्री एक ते दिड वाजण्याच्या सुमारास विपूलने घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेवग्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विपुल हा अतिशय हुशार मुलगा होता.याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती